
Yuti's Hub Library
June 14, 2025 at 10:32 AM
*छावा*
*लेखक - शिवाजी सावंत*
*भाग-६५*
🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
दिवसफुटीवर महाराज रायगड सोडून शिरकाणात उतरण्यासाठी सज्ज झाले. पाचाडपागेत पाच हजार घोडा आणि पावलोक सिद्ध झाला होता. पेशवे निळोपंत, रामचंद्रपंत, खंडोजी, चांगोजी, राया-अंता अशा मेळासह शिर्क्यांशी हत्यारझोंबी वेळ पडली तर घ्यायची; म्हणून ते सिंहासनचौकातील सिंहासनासमोर आले. हेच ते सिंहासन होते, ज्याच्यावर बसणे सोपे होते, पण त्याची जोखीम पेलणे फार-फार अवघड होते. ‘याच सिंहासनाच्या प्रतिष्ठेसाठी खुद्द आबासाहेबांनी आम्हास आरोपित म्हणून पेश घेतलं होतं. पेलेल ही जोखीम आम्हास?’ विचारच विचार मनी भरून आलेल्या महाराजांनी सिंहासनासमोरच्या चरणासनाला हात भिडवून तो कपाळी नेला. निरोपासाठी ते येसूबाईंच्याकडे चालले. एकलेच. सोबतचा माणूसमेळ सिंहासनचौकातच थांबला.
काही भले-बुरे घडू नये म्हणून जगदंबेला मनोमन साकडे घालून येसूबाई देवमहालातून बाळराजे व भवानीबाई यांच्यासह नुकत्याच खासेमहालात आल्या होत्या. स्वारी समोर येताच त्यांना म्हणाली, ‘‘गडावर जातीनं देख ठेवा. आम्ही नाही इथं.”
घरच्या झगड्याने केवढे रामायण घडते, कर्ते पुरुष कसे घायाळ होतात, हे जिजाऊच्या तोंडून कैकवार ऐकलेल्या येसूबाई ‘‘सांभाळून असावं,’’ म्हणत तळहाती पदरशेव घेऊन तिबारीचा नमस्कार आपल्या कुंकुबळाला करू लागल्या. महाराजही त्यांचे बोल ऐकताच गंभीर झाले. काही न बोलताच समोरच्या श्रीसखीला डोळाभर निरखताना त्यांना स्पष्ट दिसून गेले की, त्यांच्या हातात बाळराजांच्या जन्मावेळी गांगोलीत दिलेली पुखरखड्याची अंगठी दिसत नव्हती! त्यांना दिलासा यावा म्हणून ते म्हणाले, ‘‘निर्धास्त असा. शिर्क्यांशी कमी-अधिकाचं नाही वागणार आम्ही. पण... पण अंगठी दिसत नाही हाती तुमच्या आम्ही दिलेली?’’
‘‘जी. टवळ्याचं नेजं उचकटलंय तिच्या. घडाईला टाकलेय ती सोनारशाळेत.”
‘‘येसू, बिघडले तर अलंकार टाकता येतात नव्या घडाईला. माणसाचं काय? जाऊ द्या. तुम्ही खूप हुशारीनं असा गडावर. औरंगच्या फौजा फिरताहेत चौफेर, येतो आम्ही.’’ महाराजांनी बाळराजांचे पाठवान थोपटले. येसूबाईंनी दिले भवानीचे तीर्थ ओठांआड करताना आपल्या भवानीबाईंना ते हसत म्हणाले, ‘‘तुमचं तीर्थ घेतो आहोत!’’ भवानीबाई लाजल्या. येसूबाईंनी बाळराजे आणि भवानीबाई डावे-उजवे बिलगते घेतले. सिंहासनचौकातील माणूसमेळ संगती घेऊन महाराज रायगड उतरले.
खेळण्याच्या बालेकिल्ल्यात कुलेश महाराजांना शिर्क्यांचा तपशील देऊ लागले. ‘‘शिर्के नहीं मानते आपको स्वामी!’’
‘‘विचार काय आहे त्यांचा कविजी?’’ महाराजांनी कुलेशांना विचारले.
‘‘जी। शिर्के खुदको औरंग के नामजाद, शिरकानके ‘राजा’ मानते है। सुना है, रामराजाको हाथ लेकर बगावत करनेका इरादा है उनका।’’
‘‘काय...?’’ आठ सालांपूर्वी ज्या बाबीने घडू नये, ते घडल्याचे बघायला मिळालेल्या महाराजांना तीच बाब आता पुन्हा ऐकायला मिळत होती.
‘‘कौनसे भी ताकतपर तुले है शिर्के! बातचीतमें हमसे झगडा हुआ। – हथियार लेकर हमपर टूट पडे। खेलना लौटना पडा।’’
‘‘कविजी, खुद्द आम्हीच चालून जाऊ शिरकाणावर! त्यासाठीच सोडला आहे आम्ही रायगड. तुम्ही आमच्या फौजेची जातीने देखभाल बघा.’’ राजे निर्धारी बोलले.
दोन दिवस महाराज खेळण्यावर विचारात होते. त्यांच्या येण्याची चाहूल शिर्क्यांनाही लागली होती. गणोजी, कान्होजी, सारे शिर्केबंधू शिरकाण बांधून तयारच होते. महाराजांच्या मनात पिलाजींच्या अनेक आठवणी फिरत होत्या.
ज्या शृंगारपुरात जामात म्हणून इतमामाने जावे, तिथे तिसऱ्या दिवशी सैन्यबंदीने चालून जावे लागले राजांना. औरंगला मिळालेले शिर्के तयारच होते. खूप अटीतटीची लढाई झाली शिरकाणात. शिर्क्यांची शिकस्त झाली. गणोजी, कान्होजी तर फौज टाकून कोल्हापूरच्या रोखाने पळूनच गेले. पिलाजी कुठे गायब झाले तेही कळले नाही. आबासाहेबांनी याच पिलाजींना ते सुर्व्यांकडे असताना त्यांची नेक मर्दानगी बघून जवळ केले होते. शृंगारपूरतर्फेला जोडून दिले हाेते खुद्द महाराजही आबासाहेबांनंतर पन्हाळ्याहून रायगडी गेले, तेव्हा रायगड पटात घेण्याचे पाठबळ दिले होते पिलाजींनी. या सर्वांहून ते श्रीसखी – येसूबाईंचे वडील आहेत, या जाणिवेने मनाचे पान कातरले राजांच्या. शिरकाणाच्या बंदोबस्तासाठी शिबंदी ठेवून ते खेळण्याकडे निघाले.
खेळण्यावर येताच कुलेशांसह गडफेर टाकताना शिरकाणावर नजर ठेवणारा खेळणा डागडुजीला आलाय हे फार जाणवले त्यांना.
‘‘डागडुजी करून घ्या पुऱ्या गडाची, कुलेश.’’ राजाज्ञा म्हणून ते बोलून गेले. पण... ‘प्रसंगी गडाची करता येते डागडुजी. पण गणोजींसारख्या आप्तेष्टांची कशी करावी?’ हे मनात आलेले ते बोलणार होते तरी कुणाला?
‘‘इथे राहूनच शिरकाणावर चोख नजर ठेवा कविजी. आम्ही निघतो पन्हाळा, बत्तीस शिराळा, सातारा वाईमार्गे महाड घाटानं रायगडाला.’’ असे कुलेशांना सांगून एक मुक्काम करून महाराज खेळण्यावरून पन्हाळ्याला आले.
तो हाच पन्हाळा होता ज्याच्याशी राज्यांच्या कैक आठवणी जखडल्या होत्या. या इथेच आबासाहेबांची अखेरची भेट झाली होती. शिवपिंडीचे दर्शन करून बालेकिल्ल्याच्या सदरेवर आल्या छत्रपतींच्या आठवणींबरोबर पायफेर चालू होता. नुकत्याच झालेल्या शिर्क्यांच्या लढाईचा आठव फिरत होता. येसूबाईंना कधी आणले नाही, या कोटरासारख्या गडावर याची बोच लागली त्यांना.
‘‘कृष्णाजी कोन्हेरे आल्यात भेटीसाटनं.’’ गडातर्फेचे सरनौबत म्हलोजीबाबा म्हणाले. राजांनी त्यांच्याकडे चमकून बघितले. त्यांच्या शेजारी त्यांचे ऐन भरातले संताजी व बहिरोजी हे घोरपडे बंधू उभे होते. आझमशहाच्या बंदोबस्तासाठी राजांनीच पन्हाळ्याला पाठविलेले न्यायाधीश प्रल्हादपंत होते. ते म्हणाले, ‘‘महाजनकीची काही तक्रार आहे कृष्णाजींची.”
राजांनी रुकाराचा हात उठविला. कृष्णाजी कोन्हेऱ्यांची तक्रार तपशिलात ऐकून घेतली. ‘‘योग्य वाटेल तो निवाडा करा कृष्णाजींचा. त्यासाठी प्रांतमजकुराचे – देसक, नायकवाडी, देशकुलकर्णी यांची अगोदर मजालस भरवा न्यायाधीश.’’ प्रल्हादपंतांवर कान्होऱ्यांच्या महाजनकीची बाब त्यांनी सोपवली.
‘‘प्रल्हादपंत, चला सज्जाकोठीवर जाऊ.’’ काही बेताने त्यांनी न्यायाधीशांना बरोबर घेतले. सदर सोडून ते सर्वांसह सज्जाकोठीवर आले.
‘‘पंत – शिर्क्यांच्या बाबीनं बेचैन झालोत आम्ही. तुम्ही बरेच दिवस आहात या प्रांती. काय बेत आहे त्यांचा?’’
पंत चमकले; प्रश्न ऐकताच... कोरडच पडली त्यांच्या तोंडाला. ‘‘बाब घरची आहे स्वामी – काय बोलावं आम्ही?’’ त्यांनी जाब दिला कसातरी. ते खरेच होते. कुणीच काही बोलू-करू शकत नव्हते.
उंच कोठीच्या गच्चीवर जाण्यासाठी सारे गच्चीचा जिना चढू लागले. पांढरट गलमिश्यांचे म्हलोजी तर राजांच्या पाठोपाठच तरातर जिने चढले.
सज्जाकोठीच्या गच्चीवरून दिसणारा कोल्हापूर, जोतिबाचा परिसर बघताना राजांनी विचारले, ‘‘कोल्हापुरात कोण मुगल ठाण देऊन?’’
‘‘शेख – निजाम कुतुबशाही म्हनतेला! गोवळकोंड्याचा ‘मुकर्रबखान’ किताबत देऊन नामजाद केलंय बादशानं त्येला विजापूर पडल्यावर. पन्नाळ्यावर लई डोळा ठिऊन हाय.’’ म्हलोजींच्या गलमिश्या गडवाऱ्यावर फरफरत होत्या.
‘‘भिडतो का गडाला?’’
‘‘जी. अधनं-मधनं टाकतो झॅप. पन आम्ही हाय न्हवं डोळ्यांत तेल घालून.’’ म्हलोजींनी गलमिश्यांवर हात फिरवला.
शृंगारपुराहून पळालेले गणोजी आणि कान्होजी याच मुकर्रबखानाच्या तळावर येऊन त्याला भेटून गेले असतील, याची कल्पना राजांना किंवा म्हलोजींना अर्थातच नव्हती. सायंकाळचा गार मावळवारा चढीला पडला. त्यावर राजांच्या अंगचा जामा फरफरू लागला. टोपातील मोतीलग हिंदकळू लागली. गडाची सांज नौबत दुडदुडली. छातीशी हात नेत तिला मान देताना त्यांना पाचाडसदरेवर घणघणणारी थोरल्या आऊंची घाट याद आली. पन्हाळगडाचे पाच-दरवाजा, तीन-दरवाजा सर्व दरवाजे बंद होत होते. कोठीखाली गडपायथ्याच्या वाडीत घरट्याघरट्यांत दिवल्या पेटत होत्या. शांत, निसूर अशी ती पन्हाळी सांज उरात भरून घेत महाराज सज्जाकोठीचा कठडा सोडून जायला म्हणून वळले. एवढ्यात कोठीचे जिने झापा टाकतच चढलेला, धापा टाकणारा पन्हाळ्याचा किल्लेदार लगबगीने म्हणाला, ‘‘...रायेगडाला ...गडाला ...गलिम ...गलिम ...एतिकादखानाचा घेर पडला ...राबत्या बाजूने धनी!’’ त्याला धड बोलवतही नव्हते. रिवाज द्यायला तर तो विसरलाच होता. शिवारावर गोफण फिरावी तसे विचार फिरले राजांच्या मनात. येसूबाई, बाळराजे, रामराजे, चांगोजी, जोत्याजी... चर्याच चर्या फिरल्या त्यांच्या उघड्या, विस्फारल्या डोळ्यांसमोर. रायगडाला राबत्या बाजूचा घेर!
वर्मी तीर बसलेले, शिकारीतले जनावर, आडव्या येणाऱ्या झाडझाडोऱ्याची पर्वा न करता झेपावत सुटते, तसे ते कुणाकडेही न बघता झपाझप कोठी उतरू लागले.
अर्ध्या घंट्यात धावणीची फौज सिद्ध झाली. तिला रायगडाच्या रोखाने दौडते सोडून निवडक असामींनिशी पन्हाळा सोडताना ते म्हलोजींना म्हणाले, ‘‘काळीज टाकू नका म्हलोजी. धीरानं असा. लागली गरज तुमची तर हारकारा देऊ. चढ्या रिकिबीनं पाठोपाठ या.’’
म्हलोजी, संताजी, प्रल्हादपंत यांनी दिलेले मुजरे आपले करत – पाठीवर पन्हाळी सांज आणि मनी रायगड घेऊन चंद्रावताला टाच दिली गेली. पन्हाळा मागे पडला. बत्तीस शिराळा, वाई-महाड मार्गावर, औरंगच्या फौजी राहुट्या पडल्या होत्या. खेळणा, संगमेश्वर मार्गाशिवाय दुसरा रस्ताच नव्हता रायगड जवळ करायला. राजांचे सैन्य त्या मार्गाने दौडू लागले.
खेळण्याच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थ बेचैन फेर घालणारे छत्रपती कुलेशांना म्हणाले, ‘‘आम्ही तातडीनं कूच करणार आहोत, रायगडाकडं कविजी. तुमच्या प्रांतीचा जमेल तितका धारकरी संगती घेणार आहोत. आता क्षणाचाही उसंत नाही कसलाही विचार करायला.’’ किल्ल्याच्या सदरी दालनात त्यांच्याभोवती उभे राहिलेले कुलेश, किल्लेदार, राया-अंता सारेच चिंताक्रांत होते. औरंगचा रायगडाला घेर – याचा मतलब पुरते जाणून होते सारे.
‘‘कौनसी भी जोखीम हो, हमको हुकम देना स्वामी!’’ कुलेश निर्धाराने म्हणाले. पण त्यांच्या मनीही राजांच्या कानी घालावी, अशी कुठलीतरी बाब घोटाळत होती. ‘‘संगमेश्वराला हरकारा द्या कुलेश. आम्ही येतो आहोत.’’
‘‘जी.’’ सवयीने कुलेशांनी रुकार दिला. पण त्यांचे मन कशाततरी गुंतले होते.
भागच होते म्हणून त्या दिवशीचा मुक्काम खेळण्यावर टाकून राजे पहाट धरूनच निवडीच्या धारकऱ्यांची शिबंदी पाठीशी घेत संगमेश्वराकडे निघाले. पूर्वकड धरून नव्या दिवसाचा सूर्य डोकावत उगवत होता. दौडत्या घोड्यावर राजांच्या मनात विचारांच्या टापा थडथडत होत्या. त्यांना बगल धरून दौडणाऱ्या कुलेशांना, पाठीशी दौडणाऱ्या एकाही स्वाराला कल्पनाच नव्हती की, रात्रभर कोल्हापूरच्या तळावर मुकर्रबखानाला, छत्रपती कुठे आहेत, दिमतीला माणसे किती आहेत, या साऱ्याची खडान्खडा माहिती पुरवून तळाबाहेर पडलेले गणोजी, कान्होजी शिर्के आणि नागोजी माने शिवरात्र तोंडावर आल्याने कोल्हापूरच्या अंबाबाईचे पहाटदर्शन करून परतत होते!
संगमेश्वराची वेस आली. हे दोन नद्यांच्या संगमाचे ठिकाण होते. संगम काठाला शिवालिंगाच्या राउळाने गावाच्या नावाला साजेसा अर्थ दिला होता. कधी मनाचा भार असह्य झाला की, याच संगमावरच्या शिवालयात राजे दर्शनासाठी येत होते. आज ते संगमेश्वर दौडीच्या वाटेवरच होते. गावठाणातून संगमावर घोड्यांना पाणी दावून मोतद्दारांची एक तुकडी पागेकडे परतताना वेशीत घुसल्या महाराजांच्या सामने आली. मोतद्दार खाशांना रिवाज देण्यासाठी पटापट उतरू लागले. तिकडे ध्यानही नसलेले महाराज त्या पथकातील जनावर, उजाडताच सामने आलेले बघून चंद्रावताचे कायदे खेचून जागीच थांबले. जनावर ‘ऐबी’ होते ते!! त्या पुऱ्या काळ्याशार जनावराच्या आघाडीच्या खुरांना पांढरे फटफटीत चांदवे होते.
महाराजांच्या मनी ते जनावर बघताना शकाची टिटवी केकाटत फडफडून गेली, ‘रायगडावर काही बरंवाईट तर....’
राजांनी संगमावर जाऊन शिवदर्शन घेतले. समोरच्या शिवपिंडीला हात जोडून ते मनोमन म्हणाले, ‘आम्हाहून आबासाहेबांस प्यारा असलेल्या रायगडास धक्का लागू नये. त्यासाठी हयातीचं बेलपान करून वाहू तुमच्या या पावन पिंडीवर.’
शिबंदीसह राजे संगमेश्वराच्या सरदेसाई आणि कऱ्हाडहून आलेले अर्जाेजी- गिर्जाेजी यादव वाड्यात जमले होते. सज्जनगडाहून आलेले रंगनाथस्वामी गोसावी महाराज संगमेश्वरात आले आहेत, याची खबर मिळाल्याने दुपारच्या थाळ्यानंतर भेटीसाठी सरदेसायांच्या वाड्यावर आले. भेटीसाठी आलेल्या गोसाव्यांनी ‘जयऽ जयऽ रघुवीर समर्थ’ अशी नांदी उठवताच बैठकीवरून उठून महाराजांनी त्यांच्या चरणांवर आपला माथा टेकला. रंगनाथस्वामींनी त्यांच्या राजटोपावर तळहात ठेवून आशीर्वाद देताना त्यांच्या तोंडून समर्थबोल निसटले.
‘‘जरी पाटांतील तुंब निघेना,
तरी मग पाणीच चालेना,
तैसे जनांच्या मना,
कळले पाहिजे!’’
‘‘आम्ही निघतो राजे... वाघापुरीला जायचं आहे.’’ नांदी उठवून खडावांची चटपट करीत रंगनाथस्वामी बाहेर पडले.
राजांच्या मनात समर्थांनी लिहिलेल्या पत्रातील बोध फिरला... ‘अवघे लोक एक करावे। गनिमा निपटून काढावे। चढती वाढती कीर्ती। पावाल येणे।।’
‘अवघे लोक एक करावे... कसे? समर्थ हे कैसे व्हावे? हवस पेटल्याने नेकी भुललीत माणसे! फंदफितुरीने धारकऱ्यांची बुजगावणी झालीत. सामने येणाऱ्या असामीच्या नेकीचा मागमूसही लागू नये, एवढी आतबाहेर दुटप्पी झालीत माणसे. ओंजळीत मिळेल तेवढाच शिधा शिजवून खाणारे, वणवण करीत मुलूखभर मावळ वाऱ्यासारखे पायीच भटकणारे तुम्हासारे संत कुठे! ‘कीर्तिरूपे उरावे’ म्हणालात. ते तरी असते का माणसाच्या हाती? आबासाहेब उरले... कीर्तिरूपे उरले. ते – तुम्ही ‘माणसे’ कशी म्हणावी? ‘देवमाणसे’ तुम्ही. जगदीश्वराच्या मंदिरातील हमचौकातील दगडी कासवाचे तरी भाग्य मिळेल आम्हास? की पडतील नुसतेच कदम पाठीवर येणाऱ्या प्रत्येक दर्शनभक्ताचे? नाही झाला हा मुलूख एक दिलाचा, एक जिवाचा तर? फिरविली जर अकरा दिशांना तोंडे तुम्ही स्थापन केलेल्या अकरा हनुमंताच्या मूर्तींनी आपली तर?
‘ – मग जाणावे फावले गनिमांसी!’ समर्थांच्या बोलांनी छत्रपतींच्या समोर जिकडे-तिकडे मुगल फौजा दौडताना दिसू लागल्या. खूप कोशिश केली त्यांनी; पण औरंगची चर्या काही केल्या नजरेसामने येईना त्यांच्या. समर्थ ‘गनीम-गनीम’ म्हणून गर्जून सांगताहेत तो ‘गनीमच’ दिसेना त्यांना. त्यांनी मनोमने भोवतीच्या खंडोजी, रायाजी, रामचंद्रपंत, कुलेश सर्वांशी ते औरंगसारखे दिसतात का, याचा पडताळा पाहिला. नाही! ‘औरंग’ काही स्पष्ट होईना त्यांच्या नजरेसमोर. मनातले विचारच त्यांनी रंगनाथस्वामींच्या पादुकांच्या रुजाम्यावर उमटलेल्या ठशांवर ठेवले. मन शांत, स्थिर करून घेतले.
सदरेबाहेर शिरकाणातील मौजे मसूचा हरबा देसाई येऊन खाशांच्या भेटीसाठी केव्हाचा खोळंबला होता. त्याची विठोजी शिर्क्यांची भावजय काशीबाई हिच्या खिलाफ मौजे कोतळुक आणि मसू या गावच्या मोकाशाबद्दल तकरार होती. हा गाव ‘बाधेरीतीने’ म्हणजे पूर्वीचा वारसा-हक्क रद्दबातल होऊन हरबाकडे आला होता. राजांनीच त्याचे मोकासे, शिर्के हरघडी लष्करी कामाचे म्हणून शिर्क्यांना दिले होते. त्यानेच शिर्के माजोर झाले होते. शिर्क्यांचे धारा वसूल करणारे ‘दाणेकरी’ भरल्या खळ्यावरून बलात्कारे दाणे उचलून नेत होते. त्याने कातावून देसायांच्या माणसांनी शिर्क्यांची पागाच मुळे मोडून काढली होती. हरबाला मौजे मसूचे सरकारी शिक्के- मोर्तबाचे मोकासे पाहिजे होते, म्हणून कुलेशांनी हरबाला पेश घेतला होता.
‘‘धनी, मौजे मसूचं मोकासं द्यावं आता आमास्नी. लई कट्टाळलाव. सरकारास्नी मानत न्हाईत, तर आमास्नी काय मानतील शिर्के! भरल्या खळ्यावयनं दाबजोरीनं दाणा काय नेत्यात! कातावून पागाच मोडून काडली आमी त्यांची. कागुद करून दिला की, आमी चाकरीला हावंच धन्यांच्या.’’ रिवाज देताना हरबा देसाई नरड्याला चिमट लावून म्हणाला.
महाराजांच्या डोळ्यांसमोर फिरत होता – एतिकादखानाने घेर टाकलेला रायगड! आणि समोर आला होता, एका मौजाच्या मोकाशाचा कथला! हरबाला कुडीभर न्याहाळत छत्रपती म्हणाले, ‘‘पागेच्या रखवालदार धर्मा कवठेकराची काय बाब?’’ तो वर्माचा सवाल ऐकून हरबा चरकला. शिर्क्यांच्या पागेचा रखवालदार धर्मा याला देसायाच्या माणसांनी जीवे मारून पेंढ्यात घालून डाग दिला होता! धर्मा महार होता.
‘‘जी. लई झ्यायली क्येली त्येनं पागेवर.’’ हरबा चाचरत कसातरी म्हणाला.
त्याला माहीत होते, राजांच्या दिमतीला जासूद-चाकरीला बहिर्जी, विश्वास असे पट्टीचे रामोशी खबरगीर होते.
‘‘खामोशऽ! जबान कशी उठते इमानदार चाकराच्या जिवास नख लावून मोकास मागावयास?’’ शंभूतेज कडाडले, ‘‘कुलेश, अमानत करून टाका मौजे मसू, कोतुळक, तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात!’’
हरबा देसाईला फेकून देणारी आज्ञा सुटली. थप्पड खाल्ल्यागत हरबा गुमान बाहेर पडला. खाशांचा राजसंताप सुमार होईपर्यंत कुलेश काही क्षण कसे बोलावे म्हणून थांबले. त्यांनाही रायगडाची चिंता लागली होती. धैर्याने ते म्हणाले, ‘‘रायगड जानेके पहले....’’
‘‘बोला कविजी.’’ महाराज आपल्याच विचारात होते.
‘‘शिवजीका एक अनुष्ठान संपन्न किया, तो सबका अरिष्टका कुछ तो निवारण होगा। शिवरात्री आयी है इसलिये...’’ शिवभक्त असल्याने कुलेश म्हणाले.
“केवढ्या धावपळीची ही हयात कविजी! शिवरात्र तोंडावर आली आहे हेही भुलून गेलो आम्ही! आबासाहेबांनी हर किल्ल्यात सही हाताला शिवपिंडीची घुमट उठवली. का? तर गड चढताच पिंडीचे दर्शन घेता यावे म्हणून! आज त्यांचाच रायगड संकटात पडला आहे. आमच्या हातांनी त्यांचा म्हणून लावा शिवास कौल. पाचाडपागा आम्ही जाईतो नाही द्यायची दाद छाप्यांना.’’ प्रत्यक्ष रायगडाचा उपराळा करण्यासाठी जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. मन कशाचेतरी पाठबळ मागत होते त्यांचे, रायगडाचा घेर तर उठविणेच भाग होते. तिथली पिछाट तर काळीजच कुरतडणारी होती.
‘‘खेळणा, पन्हाळा, विशाळगड-पागांना वरकड पावलोक रायगडाच्या वाटेस लावायला खलिते द्या. तुम्ही जातीनं अनुष्ठानाची जोडणी लावा. सकाळ, दुपार, संध्याकाळ औरंग न चुकता नमाज पढतो हे ऐकून आहोत आम्ही.’’ वरवर शांत दिसणारे राजे अंतर्यामी, कुणालाच उकल न होणाऱ्या खोलवटात शिरले होते.
संगमेश्वराचा वाडा हलू लागला. माणसे शंकराच्या अनुष्ठानासाठी खपू लागली. संगमाच्या एकमेकींत मिसळलेल्या नद्या शांत वाहत होत्या. भोवतीचे उंच डोंगरकडे ताठ खडे होते. त्यांना घेरून कोकणचा हिरवाकंच झाडझाडोरा माजला होता.
मलकापूर, खेळणा, संगमेश्वर भागाचे व्युत्पन्न ब्राह्मण कुलेशांनी संगमेश्वरात पाचारण केले. सरदेसायांच्या वाड्यातील हमचौकात शिवाच्या अनुष्ठानासाठी यज्ञकुंड सिद्ध झाले. देसायांच्या देवघरातील शिवपिंडीवर अभिषेकपात्र संततधार बरसवू लागले. त्याचा थेंब-थेंब जसा पुटपुटत होता, ‘‘रायगड-रायगड.’’ कुंडात पडल्या समिधांच्या धुराने वाडा कोंदून जात होता. धार्मिक विधी होताच राजे सदरेवर येत होते. अनुष्ठानाचे दोन दिवस झाल्यावर सदरेवर आल्या छत्रपतींना कुलेश म्हणाले, ‘‘अब रायगड कूच करना है। मलकापूर, पन्हाळा, संगमेश्वर की जिम्मेदारी है हमपर! इसलिये...’’ खेळण्यापासून मनात असलेली बाब महाराजांच्या कानी घालायला बेचैन झालेले कुलेश अडखळले.
‘‘तुम्हास तर आम्ही संगतीच घेणार आहोत. आता हा प्रांत नाही तो ठेवा डोळ्यांसमोरस, रायगडचा. इथली जोखीम तर हमेशाचीच.’’ महाराज म्हणाले.
‘‘रायगडके लिये ये बोलनाही पडेगा की... न्यायदेवता पलट गयी है! खुद्द न्यायाधीश – न्यायाधीशने -” कुलेश पुन्हा चाचरले.
‘‘मतलब?’’ महाराजांच्या कपाळीचे गंध आक्रसले.
‘‘खुद्द न्यायाधीशने षड्यंत्र की चाल रखी है, स्वामी के खिलाफ!’’
‘‘कऽविजीऽ!’’ बसले महाराज अंगावर उकळते करंजेल तेल पडावे, तसे ताडकन उठले. उभे अंग शहारले त्यांचे. संताप, एकलेपणा, कोंडी, चमत्कारिक भावनेने ते जागीच थरथरू लागले. ‘‘कुणावरही अदावत घेऊ नका छंदोगामात्य! भूल असेल तुमची, कुलएखत्यारीच्या अधिकाराने केलेली! न्यायाधीश... आणि षड्यंत्र? आईने मुलाचा कडेलोट केल्याची बात ऐकवतसुद्धा नाही आम्हास. पुरावा काय यास?’’ न्यायाधीश प्रल्हादपंतांना पहिल्या कटावाच्या अदावतीतून इतमामाने मुक्त केल्याचे छत्रपतींना आठवले. ‘‘पुन्हा असली गफलत करू नका. नाही सोसणार ते आम्हास.’’ अशी त्या वेळी दिलेली समजही याद आली. रायगडाच्या महाद्वारात ठोकलेल्या खिळ्यांगत त्यांनी आपली नजर कुलेशांच्या डोळ्यांत रोवली. एवढे कुलेश! पण तेही हबकले ती बघताना.
‘‘बोला, कुलएख्त्यार, पुरावा बोला.’’
‘‘जी.’’ अंगभर थरकलेल्या कुलेशांनी कमरेच्या कनोजी शेल्यातून खेचून प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हादपंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्क्याला लिहिलेला खलिता लटलटत्या हातांनी महाराजांसमोर धरला. तो खोलून महाराज वाचू लागले. शब्दाशब्दांतून जसा डोळ्यांवाटे उतरत शिसरसासारखा थेंबथेंब ठिबकू लागला त्यांच्या काळजावर. स्वारीशिकारीसाठी मुलूखभर दौडणारे, गोऱ्यांच्या दरबारात दौलतीची हेजिबी करणारे प्रत्यक्ष न्यायाधीश आरोपिताच्या पिंजऱ्यात जाऊन बसताना गणोजीला म्हणत होते, ‘‘रामराजे एकले आहेत. त्यांनाच हातास धरून गादीवर बसविले तर कुलएख्त्यारी तुम्हासच मिळेल. कोण कुठचा कनोजा! कानामागून येऊन साऱ्यांस तिखट झाला आहे. राजे तर त्याच्या सांगीशिवाय कुणाचंच मानीत नाहीत.’’ या आशयाचा तो नमुनेदार निवाडा होता. हातचा खलिता वाचून होताच छत्रपतींनी गपकन डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या, व्याकूळ डोळ्यांसमोर प्रल्हादपंतांच्या मुद्राच मुद्रा फेर धरून गेल्या.
डोळे मिटूनच संतापाने थरथर कापत, कुलेशांना; पण स्वत:च द्यावी तशी त्यांनी आज्ञा दिली, ‘‘खलिताच द्या धाडून हा पन्हाळ्यावर. म्हलोजींना सांगा न्यायाधीशांसच वाचू दे हे, आरोपपत्र. त्यांच्याच लिखावटीचं – त्यांच्याच खिलाफ. दस्त करा त्यांना असतील तिथं, मिळतील तेव्हा! आणि... आणि बंद करून टाका तुमचं अनुष्ठान – रायगडासाठी शिवाला कौल घालणारं!’’ मान खाली घातलेल्या कुलेशांच्या अंगावर खलितावळी फेकून महाराज आपल्या दालनाकडे तरातर निघून गेले. पुरते घायाळ झालेले; सर्वार्थाने एकांती. पुरते एकले होण्यासाठी.
मोठ्या मिनतवारीने बांधल्या अनुष्ठानाची सांगता तरी करून निघावे, यासाठी महाराजांना कुलेशांनी तयार केले. सांगतेचा दिवस संगमेश्वरावर उजाडला. आज तर पुरते संगमेश्वर सरदेसायांच्या वाड्यावर येऊन यज्ञकुंडात समिधा वाहून गेले. सगळे गाव सांगतेच्या भोजनाने हात ओले करून तृप्त झाले.
टळत्या दुपारला कऱ्हाडहून आलेले अर्जाेजी यादव महाराजांच्या सामने आले. संगमेश्वरात आल्यापासून मनात घोळणारी एक बाब त्यांनी महाराजांना पेश घातली. अर्जाेजी बांधकाम कारखान्याचे नामजाद प्रमुख होते. त्यांचे भाऊ गिर्जाेजी यांनी तर राणीसाहेब दुर्गाबाई यांचा माग काढत बऱ्हाणपूर, खुल्दाबाद पावेतो पायपीट केली होती. यादवांची दौलतीच्या पायी खूप चाकरी रुजू झाली होती. थोरल्या महाराजांनी यादवांना कऱ्हाड व औंधचे वतन देऊ, अशी जबान दिली होती. पण त्या समयाला त्यांचाच काळ झाला होता. यादवांची बाब आठ वर्षे तशीच पडली होती.
‘‘आमच्या कऱ्हाड-औंधच्या सरकारी कागदांचं आता मनावर घ्यावं धनी. मिरज भागाला शहजाद्याच्या फौजा जोराचा तळ धरून हाईत. आम्ही परतावं तिकडं म्हनताय.’’ अर्जोजींनी आपली बाब धन्यांच्या समोर ठेवली. रायगडाच्या पायथ्याला पाचाडात येसूबाईंच्या शब्दासाठी राजमंदिर उठविणाऱ्या अर्जोजींना महाराजांनी अंगभर निरखले.
‘‘अर्जाेजी, केवढ्या घरोब्याचे तुम्ही आबासाहेबांपासून. पण तुम्हाकडेही ध्यान देणं आम्हास फावलं नाही. नाराज झाला असाल तुम्ही.’’
सरदेसायांच्या चिटणिसास काही विचाराने बोलावून घेऊन, कऱ्हाड-औंधचे यादवांच्या नावे कागदपत्र सिद्ध करण्याची आज्ञा महाराजांनी त्यांना दिली. सिद्ध झाल्या वतनपत्रांवर दस्तुर करून ते चिटणिसांना म्हणाले, “शिक्कामोर्तब करून द्या हे अर्जाेजींना. आणि अर्जाेजी, तुम्ही मोर्तबी कागदपत्र मिळताच कऱ्हाड फाट्यास तुमच्या जमावानं कूच व्हा.’’
सांगतेसाठी आलेले ब्राह्मण कुलेशांच्या हातून दक्षिणा घेऊन, राजांना अभीष्ट चिंतून गावोगाव परतू लागले. आता हा शेवटचाच मुक्काम होता संगमेश्वरात. सरदेसायांच्या वाड्यालगत पागेत मोतद्दार जिने खुंटाळ्यांवर ठेवून घोड्यांना खरारा बंदी करू लागले. संगमेश्वराच्या बायाबापड्या रात्री खर्चासाठी लागणारे पाणी कळश्यांनी आपापल्या घरट्याकडे नेऊ लागल्या. पाखरे कोटरांकडे परतत होती.
याच वेळेला गणोजी मुकरर्बखानाच्या कानाडी तोंड देऊन दबक्या आवाजात म्हणाला, ‘‘पाचशे घोडा आहे संगमेश्वराला. भवत्यानं खड्या चढणीचं कडं हाईत. कुमक करायला मातब्बरीचं ठाणं न्हाई आसपास. पन्हाळ्याचा घोरपडयाच जरा दबीत ठेवाय पायजे. माजोर दस्त कराया नामी मोका हाय. फत्ते झाली की मातर आमच्या शिरकाणाचं बादशहास्नी सांगावा विसरू नका खानसाब.’’
कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रावळात सांज आरती चालू होती. घाटेच्या आवाजात गणोजींचे इमानदार शब्द विरून जात होते. लगोलग दीड हजार कडव्या हशमांची फौज बांधून मुकर्रबखान निघाला. कोल्हापुराहून आंबा घाटमार्गे संगमेश्वराकडे.
दीड हजार हत्यारबंद हशमांचे घोडापथक खडखडत्या टापांनी कोल्हापुराहून निघाले. आघाडीला होते मुकर्रबखान, त्याचा मुलगा इखलासखान आणि त्यांना दौडीचा, पन्हाळा बगलेला टाकून जवळ आणि बिनघोरी माग दावायला उजवे गणोजी आणि कान्होजी, डावे नागोजी माने. घोडी आंबाघाटाच्या रोखाने खाडखाड दौडत असतानाच शक आलेल्या इखलासने मोठ्याने ओरडून आपल्या बापाला विचारले – ‘‘हाथ नहीं आया काफर और जंगमें जानपे बिती तो आब्बाजान?’’
‘‘डरपोक, शहिद हो जाएंगे आका जानके नामपर। फतेह हुई तो मालेमाल कर देंगे हजरत गौरसे।’’ मुकर्रबखान जिवाच्या कराराने दौडत होता. गणोजी, कान्होजी, नागोजी त्याला, ‘‘डावरीकडं – सही हाताला’’ म्हणत हात उठवून माग देत होते. ओढे, वहाळ, पांदी सपासप मागे पडत होत्या. पुरते सांजावले तसे खिनभर फौज रुकली. पलोते पेटवले गेले. मशालजी घोडाहशमांनी ते एका हाती तोलत आघाडी घेतली. काही फौजफळीत पांगले. एक पेटता जिहादी लोळ पुढे सरकावा, तशी जिद्दी फौज टापांवर पडली.
पन्हाळ्याच्या कोकणदरवाजावर पहारा देणाऱ्या मेटकऱ्याने पलोत्यांची ती रांग दौडताना बघून बालेकिल्ल्याकडे धावत झेप टाकली. सरनौबत म्हलोजी घोरपड्यांना तो धपापतच म्हणाला – ‘‘घात जाला घोरपडेबाबा. कोल्हापूरचा तळ संगमनेरच्या रोखानं दौडतोय. घोडा कितसा हाय माग न्हाई रातीचा घावला.’’
पन्हाळ्यावर पाठोपाठीने सटासट हुकूम सुटले. म्हलोजी आपले चिरंजीव संताजी, बहिर्जी यांच्या जोडीने पागेसमोर आले. पाचशे घोडा हां-हां म्हणता जीनबंद झाला. त्याला पाठीशी घेत म्हलोजी कोकणदरवाजाने पन्हाळा उतरले. विशाळगडाच्या रोखाने. आडवाट धरून संगमेश्वराकडे दौडू लागले. ‘घोर’ पडलेल्या मराठी दौलतीला प्राणबाजीने वाचवायला, झाल्या उमरीचे घोरपडे दोन बांड्या मुलांसह दौडू लागले.
‘‘आबा, गाठू आम्ही संगमेश्वर वेळेवर?’’ थोरल्या संतीजीने शकाने विचारले.
‘‘आरं, निस्तं पोहोचून काय कामाचं? वेळ पडली तर शिर काटून ठिवाय लागेल शिवाजीऱ्हाजाचा अंकुर जपाय!’’ म्हलोजीच्या पांढरघोट गलमिश्या वाऱ्यावर फरफरून गेल्या.
एकीकडून म्हलोजी आणि दुसऱ्या वाटेने मुकर्रबखान आणि त्यांचे साथीदार संगमेश्वर जवळ करण्यासाठी ऊरफोडीने दौडू लागले. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या व जोतिबावर नित्याच्या घाटा घणघणून गेल्या. काळरात्र पळापळाने चढू लागली.
या वेळी संगमेश्वर गाढ सुख झाले होते. सरदेसायांच्या वाड्यावर हत्यारी, गस्ती पहारे फिरत होते. वाड्याच्या सुखदालनात मंचकावर लेटलेले छत्रपती मध्येच कूस पालटत होते. झोप साधत नव्हती. आदिलशाही, कुतुबशाही घशात घालून अकलूजला ठाण झाला औरंग, गावोगावचे फितवेखोर, दरिया गिळायला बसलेले फिरंगी, हबशी – चित्रांमागून चित्रे त्यांच्या मनी गस्त घालीत होती. येसूबाई, आबासाहेब, थोरल्या आऊ, धाराऊ, समर्थ, सती गेलेल्या आऊसाहेब, कुठेतरी खुल्दाबादेत कोठीत पडलेल्या दुर्गाबाई, राणूआक्का अशा मुद्रा त्यात मिसळत होत्या. वाड्याच्या पागेतली घोडी मध्येच नाकपुड्या झटकून फुरफुरत होती.
मध्यरात्र टळली तसा खाशांचा डोळा लागला. पळे पावलापावलांनी पुढे सरकू लागली. रात्रीची कूस फोडून उगवण्यासाठी नवा दिवस धडपडू लागला. उत्तररात्र धरून वाड्याची शांतता भेदत दोन घोडाईत हमचौकात उतरले. तीरासारखे वाडयात घुसले. खिदमतगाराला त्यांनी कुलेशांना बिगीबिगी उठवायला सांगितले. महाराजांच्या सुखदालनाशेजारच्या कोठीत झोपलेल्या कुलेशांना खिदमतगाराने आत जाऊन उठवले. डुईवर पगडी नसलेले कुलेश भयशंकेने तसेच बाहेर आले.
“क्या है?’’ मुजरा करणाऱ्या घोडाईतांना त्यांनी शंकेने विचारले.
‘‘राना-पांदीनं, आडवाटेनं गनीम संगमेश्वर जवळ करतोय. महाराजांना उठवा चटशिरी. कानी घालू द्या त्येंच्या ह्ये.’’ खबऱ्या घोडाईतांपैकी एक इकडे-तिकडे बघत थरकापून म्हणाला. खांद्यावरून लोंबते उपरणे दोन्ही हातांच्या मुठीत गपकन पकडून कुलेश सुखदालनाकडे धावले. आत जाऊन मंचकाशेजारी उभे होत तत्परतेने म्हणाले, ‘‘स्वामी, स्वामी उठिये।’’
‘‘कोऽण?’’ म्हणत महाराज मंचकावरून उठते झाले. बाहेर संगमेश्वराच्या घरट्याघरट्यांत कोंबडी आरवत होती.
‘‘वकुत न्हाई. घोडा फेकत एक फौज रानातनं दौड घेतीया. खाशांनी चढे घोडे व्हावं आन् खिनभरबी न थांबात याच वख्ताला संगमेश्वर सोडावं.’’
‘‘इथल्या पागंपरास दौडीत लय घोडा हाय. तड न्हाई लागायची.’’ दोन्ही खबरे घोडाईत एका पाठोपाठ एक म्हणाले.
हात पाठीशी बांधून सुखदालनात इकडे-तिकडे झपाझप फेर धरणाऱ्या छत्रपतींकडे ते घोडाईत उत्सुक डोळ्यांनी बघू लागले. कोनाड्यात पेटत्या टेंभ्याकडे बघत एकदम थांबून राजे कुलेशांना म्हणाले, ‘‘शिर्क्यांची –
शिर्क्यांची माणसं आहेत ती. कोल्हापूरशिवाय तळ नाही गनिमाचा जवळपास. बिशाद नाही त्यांची एवढ्या गचपणात घाटा-पांदीतून रात्रीच संगमेश्वरावर चालून येण्याची! कुलेश यांची व्यवस्था करा!’’ खबऱ्यांच्याकडे हात करत महाराजांनी कुलेशांना आज्ञा केली. विचार करत, कुलेश आणि मुजरा करत, चुटपुटत खबरे बाहेर पडले. महाराज पुन्हा फेर घेऊ लागले. थोड्या वेळाने येऊन मंचकावर लेटले. काही केल्या झोप येईना त्यांना. मनी शिर्क्यांची भिंगरी घुमत फिरू लागली.
‘आता रायगडी गेल्यावर श्रीसखींना कसं सांगायचं त्यांच्या पाठराख्या भावांना हुसकून लावणं पडलं शिरकाणातून? काय हा शिर्क्यांचा आमचा ॠणानुबंध? काय मिळालं श्रीसखींना आमच्या नावे मळवटी बाशिंग बांधून?’ राजांच्या मनी विचार आले.
तबकात ठेवलेल्या राजटोपाकडे ते बघू लागले. टेंभ्याच्या मंद उजेडात त्याची कलाबूत झगमगत होती. त्यांना जाणवले आबासाहेबांचा राजटोप उभ्या माटाचा होता. आपला बसक्या माटाचा – मोगली किमॉशागतच! आमच्या आजोबांचाही तसाच! त्यांनी निदान निजामशाही, आदिलशाही सतत जरबेत ठेवल्या. आम्ही? राखू ही मराठशाही?
इकडे संगमेश्वराच्या वेशीत घुसलेले म्हलोजीबाबा आपले घोडालोक संगमेश्वरभोवती पांगते फेकून, त्याला कडं टाकून संगमेश्वर राखायला खडे ठाकले. आडवाटेने जिवाची पर्वा न करता घोडे फेकल्याने ते वेळेवर पोहोचले होते. त्यांच्या पांगत्या शिबंदीने नरड्याच्या घाटा फोडून उगवत्या पहाटेला थरकावून टाकणाऱ्या किलकाऱ्या उठविल्या, “हरऽ हरऽ म्हाद्येऽव.’’ त्या विरायच्या आत बेभान, बेलाग, दौडत्या हशमांची जिहादी फौज पाठीशी घेत मुकर्रब, इखलास धुराळ्याचा लोळ उठवीत संगमेश्वराच्या वेशीत घुसले. उगवता दिवस त्या धुळीच्या लोळाने पुरता झाकाळून गेला. ‘‘धीऽन... धीऽन’’च्या आरोळ्यांनी संगमेश्वर दणाणले. कालवाच कालवा झाला. देसायांच्या वाड्यात तो कानावर पडताच ताडकन उठलेले महाराज दरवाजाकडे झेपावले. बाहेरून, भयकातर झालेले धावत येणारे कुलेश त्यांना धडकायचेच थांबले. राया-अंता तर कुणाचंही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. आज सगळा रिवाज बाजूला ठेवत राया तर थेट छत्रपतींच्या दंडाला धरून गदगदा हलवत म्हणाला, ‘‘इळभर थांबू नगासा. घात झालाय. हत्यार घ्या नि भाईर पडा – निघा... निघा.’’
गर्रकन वळून दालनातल्या तबकातील टोप मस्तकावर ठेवून, म्यानातली तलवार बाहेर खेचून म्यान तसेच फेकत राजांनी डाव्या हाती ढाल तोलली. आपल्या दालनातून हाती ढाल-हत्यार घेतलेले कुलेशही बाहेर आले. सगळ्या वाड्यातले माणूस मिळेल त्या जागेचे हत्यार घेऊन ‘‘चला, भाईर व्हा. गाव येरगाटलंय. गनीम आला.’’ म्हणत बाहेर पडू लागले. कालवाच कालवा उडाला वाडयावर. राया- अंता, कुलेश, अर्जाेजी यांच्यासह महाराज दरवाजाबाहेर पडले. वाड्याच्या पागेतून बाहेर काढलेली घोडी धरून मोतद्दार डोळ्यांत जीव आणून टकमक दरवाजाकडेच बघत होते. म्हलोजींची फळी फोडून वाड्यापर्यंत घुसलेले दहा-वीस हशम हत्याराने फेकले की, जवळची घोडी ते महाराजांच्या मांडाखाली देणार होते. क्षणक्षण डोंगरागत छाताडावर असह्य झाल्याने मोतद्दार आपल्या जिवापेक्षाही घोडी मोलाची मानून दरवाजातल्या झोंबाझोंबीकडे सरकले. एवढ्यात शे-पाचशे हशमांचे ‘धीनऽ धीऽन’ गर्जणारे, जंग अंगभर सरसरलेले, बेभान भिरे घेऊन इखलासखान आपल्या हातची तेग नाचवत दरवाजातच येऊन भिडला. सगळा जीवच महाराजांच्यात अडकल्याने मुकर्रबखानाच्या पथकाचे वार हटवत-हटवत म्हलोजीही, संताजी- बहिर्जीसह त्याला आडवे होत मोठ्या निकराने दरवाजापाशीच आले. दरवाजासमोरच आता कुरुक्षेत्र पेटले, मोतद्दारांनी आणलेली जनावरे राजे, कुलेश, अर्जाेजी, राया- अंता यांनी अटीतटीने मांडाखाली घेतली होती. म्हलोजींनी आपला घोडा धन्याच्या जवळ काढला होता. भिंगरीसारखा तो त्यांच्या घोड्याभोवती फिरवत म्हलोजी झाले वार झेलताना, वार करतानाच ओरडत होते, ‘‘भांगा काडा धनी. नावडी जवळ करा. व्हडक्यात बसून इथनं निघा. जिवाची बाजी लावू आमी.’’ म्हलोजींच्या रूपाने मराठी दौलतच आक्रोशत होती. जागजागी मावळे-हशमांची जंगी हत्यारी-मारामारी जुंपली होती. खणखणाट, आरोळ्या, टापा, वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळ्या यांचा कोलाहल माजला होता.
भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटलेले छत्रपती संभाजीराजे गोफण फिरवावी तसे हातचे हत्यार सपासप फिरवत भांगा मिळेल तिथे मांडाखालचा चंद्रावत घुसवू लागले. म्हलोजी, कुलेश, संताजी, बहिर्जी, अर्जाेजी असे कुर्बान पटाईत वादळातून दिवली जतून न्यावी, तसे त्यांना नावडीच्या रोखाने भांगा देण्यासाठी, कडे टाकून पणाला पेटले. जसा महाराजांचा पांढरा चंद्रावत सरकत होता, तसा इखलासही मधल्या लढत्या मावळ्यांना बगलेला टाकत सरकू लागला. आता महाराज वाड्यापासून नावडीच्या बरेच जवळ आले होते. पहाट सरती असूनही लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि हशमांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आपल्या लोकांना चेतना देताना म्हलोजी, कुलेश – मुकर्रब, इखलास कोरड पडावी, अशा किलकाऱ्या देऊ लागले. गर्दीतून बाहेर पडलेल्या काही मावळ्यांनी नदीच्या पात्रात हत्यारबंदीने सिद्ध केलेली होडकी डचमळत होती. काठावरच्या माळरानावर चाललेल्या झोंबाझोंबीकडे डोळ्यांत प्राण आणून बघत होती.
खास काफरांच्या राजाला अंगलटीने भिडण्याच्या आड म्हलोजीच येतात हे हेरलेला इखलास म्हलोजींकडे बोट रोखत ओरडला – ‘‘घेर डालो बुढ्ढेको.’’ राजांची आघाडी धरून लढणाऱ्या म्हलोजींच्या भोवती चवताळल्या हशमांनी दाटीच दाटी केली. फळीपासून म्हलोजी तुटून एकले झाले. तरीही हातचे हत्यार लाजून जावे, असे खरस पडल्या तोंडाने ‘बुढ्या बोलीत’ कडकडतच राहिले, ‘‘नावडी-व्हडकी- धनी.’’ सिंहगडावरचे शेलारमामा जसे त्यांच्या रूपाने हात फिरवीत होते. मामा फत्ते घेत टिकले होते. पण म्हलोजी? अंगावर जागा नव्हती त्यांच्या जखम झेलायला. आणि – आणि झालाच वार हाशमी, जाड पात्याच्या तेगीचा त्यांच्या छाताड्यावर!! कोसळले – म्हलोजी जनावरावरून खाली कोसळले! दौलतीचे दुसरे मर्दाना सरलष्कर कोसळले.
एव्हाना नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचलेल्या लढत्या राजांच्या कानावर जाळासारखी खबर पडली ‘‘म्हलोजीबाबा पडले.’’ ती ऐकताच सुन्न झालेल्या शिवपुत्राच्या हातातली तेग पळभर जागीच रुकली. तोच मोका साधून भोवती भिडल्या हशमांतून आला वार हुकवण्यासाठी झटकन मान कलती फिरवताना राजांच्या डुईचा टोप उडाला. नावडीच्या भुईवर आला. त्याने चरकलेल्या राजांनी कसल्यातरी अनामिक बळाने पायीच्या मोजड्यांची टाच इतक्या जोराने चंद्रावताच्या पोटात खुपसली की, कळीसरशी ते जनावर नदीकाठच्या रोखाने बेफाम उधळले.
पण – पण पात्रात उतरावे तो पुरा नदीकाठ नंग्या तेगी उगारलेल्या हशमांनी केव्हाच रोखून टाकला होता. घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजी-बहिर्जी सावलीसारखे मागे आलेले दिसले. त्यांना बघताच महाराज ओरडले, ‘‘थांबू नका इथं. रायगड गाठा. मिळेल त्या असामीनिशी गड राखा – निघा.’’ भोवतीच्या हशमांचे वार दोघेही परतवत होते – राजे आणि घोरपडे बंधू. काळीजसुद्धा हेलावून गेलेले संताजी पिळवटून ओरडले, ‘‘हुयाचं ते हुईल. आबा तर ग्येलेच. कसं टाकावं धन्यास्नी मागं एकलं?’’ ‘‘आण आहे जगंदबेची. हुकूम आहे हा आमचा. निघा -” एवढ्या कोंडीत ऐन जंगमैदानावरसुद्धा त्यांच्या न कळणाऱ्या डोळ्यांकडे बघताना हत्यार फिरवणारे संताजी ओरडून गेले – ‘‘जी.’’ आणि त्यांनी घोडा वळवला. बहिर्जी त्यांच्या मागे झाले.
जागजागी नावडीच्या माळावर कामी आलेल्या मावळ्यांचे आणि हशमांचे देह इतस्तत: पडले होते. निपचित पडल्या सरनौबत म्हलोजीबाबांच्या पांढऱ्या गलमिश्या वाऱ्यावर फरफरत होत्या. त्यांचे उघडे डोळे कसल्यातरी आशेने नावडीच्या नदीकाठाकडे जखडले होते. अर्जाेजी, राया-अंता सावलीसारखे खाशांच्या पाठीशी होते. हयातीतला हाही सर्ग पुरा करण्यासाठी राजांची उजवी धरून ‘कनोजा’ म्हणून सगळ्या मंत्रिमंडळाने हयातभर हिणवलेले, हेटाळलेले कुलेश लढत होते! संगमेश्वराबाहेर निसटण्याचे सर्व मार्ग रोखले गेले होते. लढणे आणि लढणे एवढेच सगळ्यांच्या हाती उरले होते. आणि ते सर्वांनीच पुरते जाणले होते. मने करकचून बांधली गेली. चारी बाजूला सरासर फिरत्या नुसत्या तेगींचा खणखणाट चालू झाला आणि कुठूनतरी सुटलेला एक तीर कुलेशांच्या उजव्या दंडात सपकारत घुसला. डाव्या हाताने उजवा दंड घट्ट पकडून धरतानाच कुलेश घोड्यावरून कोसळले. कोसळतानाच ओरडले, ‘‘मैं गिर गया।’’
ते ऐकून अंगावर पडते वार सपासप फेकून देत छत्रपती त्यांच्याजवळ आले. पाते लवायच्या आत भुईवर झेप टाकून त्यांना काखेत हात घालून वर उचलताना म्हणाले, ‘‘उठा छंदोगामात्य. दिल धरा. लढता-लढता मरू. पुरे करू जिंदगीचे काव्य. साजेसे.’’ कुलेशांनी तीर केव्हाच काढून फेकला होता. जाम्याचा उजवा हातोपा रक्तचिंब झाला होता त्यांचा. तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी. राजांच्या बरोबरच पायउतार झालेले राया-अंता, अर्जाेजी असे कितीतरी धारकरी महाराज आणि कुलेश यांच्यावर तुटून पडणाऱ्या हशमांच्या लाटा थोपवून धरण्यासाठी निकर करत होते. आता भुईवरची हातघाईची मारामारी पेटली. कुणाचीच कुणाला जोड मिळणे शक्य नव्हते. इखलास, मुकर्रबही पायउतार झाले होते. हशमांची इतकी दाटी झाली होती की, त्यातल्याच कित्येकांना हत्यार फिरविणेही अशक्य झाले. कुणालाच हत्यार फिरवता येणार नाही इतकं माणूसच माणूस राजांभोवती दाटलं. त्यांच्या जखमी अंगाभोवती चौ-बाजवांनी कैक भाल्यांची टोके आणि तलवारींची पाती भिडली. हातची उचललेली, आबासाहेबांची भवानी तशीच रुकली. नैवेद्याचा गुळखडा चहूबाजूंनी काळ्याशार डोंगळ्यांनी घेरला. हीच गत, कुलेश, रायाजी-अंताजी यांची झाली. दाटलेल्या हशमांची कोंडी फोडत मुकर्रबचा तरणाबांड मुलगा इखलास, श्रींच्या राज्याचे वारस असलेल्या, बऱ्हाणपूर, औरंगाबाद तसनस करणाऱ्या, गोव्यातील फिरंग्यांची झोप उडविणाऱ्या, जंजिऱ्यातील हबश्यांना हाय घ्यायला लावणाऱ्या, आका-हजरतला मराठी मुलखातून शिकस्तीनं फौजा माघार घेण्याची नौबत आणणाऱ्या लईम संभासमोर आला.
देहाचे म्यान नावडीच्या मातीवरच ठेवल्यागत तेगीच्या धारेसारख्या तळपत्या नजरेने राजे हातच्या भवानी तलवारीकडे बघत होते. कुणातच नसल्यागत.
‘‘रख दो हथियार’’ इखलास कडाडला. भक्कम खडकावरून दर्याची लाट जावी तसेच ते शब्द राजांच्या कानांवरून गेले. तसूभरही हालचाल झाली नाही त्यांची.
‘‘काफर सुनते हो? फेंक दो हथियार!’’ घुश्शाने पेटलेला इखलास, अभिषेकसमयी पवित्र नद्यांचे जल, तीर्थ म्हणून मस्तकी घेतलेल्या राजांची केसावळ मुठीत पकडून ती गदगदा हलवीत गरजला. त्या बेगुमानीने राजांनी आपली जळजळीत नजर खानावर टाकली. ती बघून राजांच्या हातचे हत्यार क्षणात गर्दनीवर उतरेल म्हणून खान चरकला. एवढ्यात गर्दी फोडत लालसर दाट दाढी-मिश्यांचा खासा मुकर्रबखानच त्या जागी आला. त्याला कुर्निसात करून इखलास म्हणाला, ‘‘हथियार नहीं छोडता काफर। मगरूर है।’’
‘‘सबूर बेटे। सूरमा आदमी शौकसे हथियार नहीं छोडते।’’ आपल्या बेट्याला सुमार करत मुकर्रब राजांच्या सामने आला. त्यांच्याकडे बघत भोवतीच्या आपल्या हशमांना म्हणाला, ‘‘दस्त करो इसको पहले। रस्से डाल दो हाथोंमे। बादमें खींच लो हथियार। ले जाव।’’
लढाई थांबली होती. जिवंत मावळे मंडळी काढणीबंद झाली होती. महाराज आणि छंदोगामात्य कवी कुलेश संगमेश्वराच्या शिवासमोर दस्त झाले!!
नवा दिवस फुटीला पडला होता. या वेळी अकलूजच्या साठ हजार फौजी तळावर आपल्या डेऱ्यात इराजी सतरंजीवर गुडघे टेकून सब्र की नमाज पढताना मुहिउद्दिन मुहंमद आलमगीर गाझी औरंगजेब पुटपुटत होता, ‘‘अलहम्दुल्लाल्ललाह – ला इलालिल्लिलाह – मुहम्मद उर्रसूलिल्ललाह – ’’
नमाज पढून होताच खाशा दरबारी डेऱ्यात त्याने वझीर असदखानाला विचारले, ‘मुकर्रबखाँकी क्या खबर कोल्लापूरसे? पीछा कर रहा है, नाचीज संभाका? या पडा है ऐशोआरामसे लौंडियोंके साथ कोल्लापूरमें?’’
- आणि मुकर्रबखानाला परतीचीही वाट दावून संगमेश्वराच्या रानातच आपली घोडी थांबवून लढतीची थकावट दूर करण्यासाठी न्याहारीचा कांदा फोडताना गणोजी आणि नागोजी म्हणत होते, ‘‘कांदा फोडला की पानी धरतं डोळ्याला. पर विलाज न्हाई. ‘भाकरी’ तर जाय पायजे!’’
मुकर्रबखानाला थांबायला वेळच नव्हता. तो जाणून होता, थांबले तर दस्त केल्या आपल्या कैदी राजाला सोडवण्यासाठी, मिळेल त्या जागेला मावळ्यांच्या तुकड्या जीवे तुटून पडणार होत्या. आपले पडले हशम दफन करण्यासाठी हत्यारबंद हशमांचे पथक मागे ठेवून त्याने इखलासला हुक्म दिला, ‘‘जो तैयार है इस्लाम बनने उनको रिहा कर दो।’’ पकडलेल्या मावळ्यांत राया-अंता होते, ते धर्म डुबविणे मान्य करणे शक्यच नव्हते. नतिजा साफ होता. अर्जाेजी कसेतरी निसटले होते. पण एकल्याने काही करणे शक्य नाही म्हणून कऱ्हाडकडे कूच झाले होते. सलामत बचावलेले संताजी-बहिर्जी हुकुमाप्रमाणे रायगडाकडे दौडत होते. संताजीकडे राजांच्या चंद्रावताच्या पाठीवरचे जीन होते. महाराणी येसूबाईंना ते खूण म्हणून तेवढेच दाखवणे शक्य असल्याने त्याने गर्दीतून उचललेले.
राजे पायउतार होताच मुकर्रबच्या चिडल्या हशमांनी वार उतरल्याने घायाळ झाला ‘चंद्रावत’ चौखूर ताणून भुईवर पडला होता. त्याचे छातवान मंदपणे वरखाली होत होते. उघड्या डोळ्यांतून वेदनांनी पाणधार लागली होती. एका बगलेला आपल्या कामी आलेल्या घोरपड्यांच्या जमावात निष्प्राण पडलेल्या म्हलोजींच्या हातची मरणमूठ हत्यारावर करकचून आवळली होती. डुईची कंगणी, लाल पिळाची पगडी हत्याराजवळ भुईवर पडली होती.
चारी बाजूंनी भालाइतांची टोके भिडवून कुलेश आणि राजांना इखलास- मुकर्रबनी एकत्र आणले होते. खांद्यावरच्या हिरव्या खिल्लतीला झटके देत मुकर्रब कसा गरगरा फिरत आपल्या फौजेला हुकमांमागून हुकूम देत होता. ‘‘जल्दी करो। वख्त नहीं है।’’ मध्येच लालसर दाढीवर हात फिरविताना त्याचा चेहरा ओसंडल्या उत्साहाने भरून वाहू लागला.
दस्त मावळे काढण्या खेचून कत्तलीसाठी नेले जाऊ लागले. हशम खेचत्या काढण्यांची ओढ दंडावर बळाने रोखत राया-अंता भरल्या डोळ्यांनी, पिळवटून ओरडले, ‘‘धनीऽऽ’’
‘‘हयातभर ऱ्हायलाव सावलीगत पाठीशी. पर आता कसली ही ताटातूट? आमास्नी बी घ्या संगं धनी.’’ थोरल्या रायाच्या डोळ्यांतून कुणबी इमानाचे पाणी खळकन बाराबंदीवर उतरले.
‘‘दुदाचं झालाव तसं रगताचं भाव करा आमास्नी. संगं न्या धनीऽ’’ जखडल्याच हातांनी मुजऱ्यासाठी धाकल्या अंताने मान लववली.
थोरल्या आऊ गेल्या तेव्हा, आबासाहेब गेल्याची खबर कानी पडली तेव्हा, समर्थांनी हयातीचा ग्रंथ पुरा केला तेव्हा, काळ्या हौदावर चितेवर चढल्या पुतळा आऊसाहेब बोलल्या तेव्हा, भरून आले तसे राजांच्या डोळ्यांचे टाके सरसरत डबडबून आले. काहीच दिसेनासे झाले. जगदंबेनेच राजांशी जोड घातलेले राया- अंता मागे फिरण्यासाठी उसळत असतानाच हशमांनी खेचले.
आता मुकर्रबखानाची फौज परतीसाठी तयार झाली होती. सगळीकडे देख टाकून सगळे मनाजोगे झाले आहे, याची पक्की खातरी करून घेत मुकर्रब कडाडला, ‘‘डाल दो काफरोंको घोडोंपर। जखड दो रस्सेसे कसके, ले चलो ये शाही तोहफा हजरतको। मरहट्टोंका राजा और उसका बम्मन शायर। बहोत खूब। खैर अल्लाकी।’’
भालाइतांनी भाल्याची टोच राजांच्या पाठीला लावली. तसं काढणीवाल्या हशमांनी काढण्या खेचायला सुरुवात केली. बळ एकवटून आपल्याच मुठीने काढण्या पकडून, त्या रोखात पाय भुईत जाम रुतवून एकटक मुकर्रबकडे बघत राजे निर्धारी म्हणाले, ‘‘खान, जंग आहे हा. दर्शन घेणार आहोत आम्ही आमच्या सरलष्करांचे.’’
गोंधळलेला मुकर्रब भोवतीच्या हशमांकडे बघत म्हणाला, “क्या बोलता है? मतलब?’’
त्याच्यावरची नजर तशीच ठेवून खुद्द राजेच झटकन हिंदुस्तानीत म्हणाले, ‘‘जंग है। राजा है हम। देखना चाहते है हम कुर्बान हुआ हमारा सालार।’’
‘‘शौकसे, शौकसे’’ गर्दन मागे टाकून मुकर्रब एवढा हसला की, त्याच्या डोळ्यांत पाणी आले. काढणीवाले भालाईत पाठून खेचलेच जावेत एवढ्या ओढीने राजे म्हलोजी पडलेल्या जागेकडे झेपावले. राजांनी गतप्राण म्हलोजींच्या छातीला हात भिडवून तो कपाळीच्या शिवगंधाला लावून भोवतीला कुणालाही कळणार नाही, असा मुजरा घातला. फक्त एकाच विचाराने, ‘आले असते पावनखिंडीत पडले बाजीप्रभू आबासाहेबांच्या सामने प्रेत म्हणून, तर त्यांनी काय केले असते? सिंहगडावर पडल्या मालुसरेकाकांना बघून काय केले असेल त्यांनी?’ म्हलोजींनी मरणाच्या मोलाने मिळवला होता, तो मुजरा. खुद्द मराठी दौलतीच्या राजाकडून!
हशमांनी काढण्या खेचल्या. भालाइतांनी टोच जारी केली. तयार केल्या घोड्यांवर राजांना आणि कुलेशांना लादण्यात आले. दोघांचेही हात दोरखंडांनी करकचून आवळण्यात आले. रश्यांनी दोघांची शरीरे घोड्यांना जाम जखडून टाकण्यात आली. राजांच्या घोड्यांचे कायदे इखलासने मुठीत आवळले. दोन्ही घोड्यांना ते दौडत राहावेत म्हणून खुब्यावर भाल्याची टोच द्यायला दोन-दोन घोडाईत स्वार तयार झाले. छत्रपती, छंदोगामात्यांना गोणीसारखे घोड्यांवर आवळून होताच, हातातली तेग उंच उठवून मुकर्रबखान केवढ्यातरी मोठ्याने ओरडला, ‘‘धीऽन धीऽन, चलोऽ’’
मराठी दौलत काढणीबंद करून फत्ते झाली. मुकर्रब-इखलासची फौज मिरजेच्या रोखाने दौडू लागली. प्रांत संगमेश्वर, खेळणा, पन्हाळा, मलकापूर कुठल्याच ठाण्याला संगमेश्वरात घडल्या रामायणाची काहीही कल्पना नव्हती. उनतापीचे दिवस आल्याने माणसे शिवारांकडे मशागतीला चालली होती. दहा-पाच घोडाईत बरोबर घेऊन, जीव संगमेश्वरात अडकलेले संताजी-बहिर्जी रायगडाच्या रोखे दौडत होते. ‘‘महाराजास्नी सोडवायाच पायजे पर कसं? कुठं नेलं आसंल हरामजाद्यांनी? घाईत पडल्या आबास्नी डाग द्यावा बी जमला न्हाई. काय करावं? कसं करावं?’’ दौडत्या जनावरांच्या टापांपुढेही त्यांची सैरभैर मने धावत होती.
सरदेसायांच्या वाड्याची वाताहत झाली होती. लढाऊ मर्दाने होते, ते कामास आले होते. दस्त झालेले कत्तलीसाठी एकजाग केले जात होते. मुकर्रबखानला नेता येणे शक्यच नसल्यामुळे, स्वाराविना इतस्तत: मोकाट सुटलेली जनावरे शेपट्या चाळवीत नावडीच्या माळावर गवत चाबलत फिरत होती. वाड्याच्या चौकातील सांगतेच्या यज्ञकुंडातील समिधांची राख फरफरत इकडे-तिकडे उधळत होती. देव्हाऱ्यातल्या शिवपिंडीवरचे अभिषेकपात्र पाणी संपून कोरडे झाल्याने आ वासून शिवपिंडीकडे बघत होते. अशिव, ओस दिसत होते.
विजयी मुकर्रबची फौज किल्ले पन्हाळा बगलेला टाकून भेडसगाव, बत्तीसशिराळा मार्गे मिरजेचे, बंदिस्त भुईकोट मोगली ठाणे जवळ करायला निघाली.
उंच पन्हाळ्याच्या मेटावर गस्त घालणाऱ्या मेटकऱ्यांना दूरवरून ती दिसूनही गेली. पण तिच्यातून सगळ्यांच्याच जिवाचा दिवा फडफडत चाललाय याचा कुणालाही थांग नव्हता. संगमेश्वराहून कसेतरी निसटलेले काही मावळे घोडाईत, मुकर्रब राजांना कोल्हापूरला आपल्या ठाण्यावर नेईल, ह्या अंदाजाने विशाळगड जागवून, पन्हाळा तसाच बगलेला ठेवून आडवाटेने कोल्हापूरला जवळ करत होते.
मलकापूर तर्फेने मुकर्रबच्या फौजेने वारणा नदी ओलांडली. पूर्वीच इदलशाहीत असलेले, आता औरंगचे झालेले बत्तीसशिराळ्याचे भुईकोट ठाणे मुकर्रबच्या फौजेने जवळ केले. वारणेचा हा काठ धरून चारीकडे मोगली ठाणी होती. खान अल्लाद झाला. बिनघोर झाला. गेले दोन दिवस त्याने रात्रीची दौड, संगमेश्वराची लढाई, परतीची ऊरफोड दौड आपल्या फौजेचे कैक हशम गमावूनही शिताफीने साधली होती. संगमेश्वराहून त्याने हरकारे धाडून कोल्हापूरच्या ठाण्याहून मागवून घेतलेली कुमकही पोहोचली होती. मुंगीलाही शिरकाव करता येणार नाही, असा हशम आता मुकर्रबच्या प्रचंड फौजेला एकवटला होता. पहारेकरी पिटाळून लावत असल्याने त्यातल्याच कैकांना इच्छा असूनही काफर कैदी बघायला मिळत नव्हते!
अकलूजला साठ हजार मोगली तळावर नुसता कल्लोळ-कालवा उडाला होता. संगमेश्वराहूनच मुकर्रबने पाठवलेले हरकारे तळावर पोहोचले होते, ‘‘सैतान संबा गिरफ्त हुआ।’’ ही खबर काही क्षणांतच हाऽ हाऽ म्हणता साठ हजारांच्या तळभर पसरली. पुऱ्या तळावरचे हशम जागजागी एकमेकांना छातवाने भिडवत, मिठ्या मारून जल्लोशाने म्हणत होते, ‘‘सुना! काफर संबा कब्ज हुआ। सुबहान अल्लाऽऽ!’’
आपल्या शाही डेऱ्यात, बारबार कुर्निसात घालून ही जन्नती खूशखबर कानी घालणाऱ्या वझीर असदखानाला, तसबीहची माळ गरगर फिरवत, फुटू बघणारा काळजातला आनंद मोठ्या मुश्किलीने रोखत शहेनशाह आलमगीर शांत, धीमा हुक्म देत होता, ‘‘फौज उठाव अकलूजकी। बहादूरगड चलनेका इंतजाम करो। भेज दो शाही खिल्लत और मरातब मुकर्रबको। पेश याद फर्माओं उसको।’’
एव्हाना बत्तीस शिराळा सोडून मिरज भुईकोट ठाण्यात आल्या मुकर्रबची, पदरचे किमती कैदी जिवंत ठेवण्याची हर कोशिश चालली होती. त्याला भरवसा होता, जान बचावण्यासाठी दोन्ही कैदी झक्कत इस्लाम कुबूल करतील. कुणी सांगावे, सूरमा राजे खिल्लत पांघरून दख्खन सुभेदारीची नामजादी पत्करतील! विजापूरच्या सिकंदर आदिलशाहाचा, गोवळकोंड्याच्या तानाशाहाचा पाड लागला नाही, तिथे या मामुली संबाची काय बात! म्हणूनच तो त्यांच्या आवतीभोवती जिवाचे बरे-वाईट करण्यासाठी कोणतेही हत्यार त्यांच्या हाती येणार नाही याची, त्यांनी काहीतरी खाना घ्यावा याची, हर कोशिश करत होता. एवढी दौड झाली होती. पण सांगतेचे भोजन संगमेश्वरात घेतल्यापासून राजांनी आणि कुलेशांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता.
आपली तैनाती फौज घेऊन औरंगजेब अकलूजहून पेडगावच्या बहादूरगडाकडे आगेकूच झाला. त्याचा निम्माअधिक तळही हालला. दस्त कैदी बादशहासमोर पेश करायला उतावीळ झालेला मुकर्रब मिरजेहून अकलूजला पोहोचला. कैद्यांना बघायला त्या तळावरचे मागे राहिले हशम आरोळ्या ठोकत झुंडीने दाटीवाटी करू लागले. थंडी हटती टाकून आता ऊनतापीचे दिवस चढू लागले.
क्रमशः
🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
👍
🙏
2