
Yuti's Hub Library
June 14, 2025 at 10:59 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - २८.
धुरकटलेली खोली, हाडापर्यंत पोहोचणारी थंडी.... अभ्यास करताना बाहेर हिमवर्षाव सुरू होई. हाडं वाजायला लागत. फायरप्लेस पेटवली की, धुराने खोली भरून जाई. खिडक्या, द्वारे उघडले की थंडी आंत येई. तिने दुसरी जागा शोधण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ! त्याच धुरकटलेल्या हाडे खिळखिळे करणाऱ्या खोलीशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
फिलाडेल्फियाला येऊन दोन वर्ष केव्हाच संपले. सारखा अभ्यास... अभ्यास...
हातात बुक घेऊनच आपण जन्माला आलोय. आपल्याला बाल्य, तारुण्य काहीच नाही. आपण वृद्ध होणारच नाही. फक्त अभ्यास... सारखा अभ्यास...
अलीकडे बारीक ताप येतोय. खोकला येतो. असे किती दिवस चालायचे? अशा अवस्थेत इथेच फिलाडेल्फीयातच शेवटची वेळ येईल का? मग मन भरकटत विचार कुठल्या कुठे जायचे. झोप येत नव्हती. हे चांगले नाही. मन स्थिर करायला हवे.
दोन दिवसापूर्वी कल्याणहून घाणेरड्या मजकुराचे अश्लील बिभस्त भाषेतले पत्र आले. मनाला किती जखमा झाल्यात. इतके घाणेरडे पत्र त्या माणसाने का पाठवावे? आपण तर कुणाचेच कधी वाईट चिंतले नाही. आपण सीतामाई इतकेच पवित्र आहोत. आपण तर सीतेपेक्षाही अवघड कर्म साध्या करून दाखवले. तरी असे पत्र यावे? त्या दिवशी पत्र वाचल्यावर बेशुद्ध होते की काय असे वाटले. त्या दिवशी संबंध दिवस आपण अन्न पाणी घेतले नाही.
शेवटी मनाला समजावले .धीर सोडून कसे चालेल? आपल्याला खूप अभ्यास करून डॉक्टर व्हायचे आहे. हिंदुस्थानातल्या स्त्रियांसाठी काम करायचे आहे. ती उठून उभी राहिली. हातपाय अखडले होते. फायरप्लेसचा उपयोग नव्हता. रात्र बरीच झाली होती. अभ्यास करावा का? नको. उद्या ऑपरेशन्स आहेत. उभे राहून करावे लागतील. डॉक्टरांनी सांगितले झोप आली नाही तरी अथरुणावर पडून राहायचे.
तिने अंथरुणावर अंग टाकले. झोप येतच नव्हती. कुठले कुठले विचार मनात घोळत होते. गेल्या दोन अडीच वर्षातील आठवणी नजरेसमोर साकार झाल्यात. तिकडून इतक्या दुरून नवऱ्याची क्रुध्द, कुत्सिक नजर, आपल्यावर आहे. आणि इकडे आपण सारखे वाचन, अंगात घालायला कपडे नाहीत. खायला पुरेसे अन्न नाही. थंडीपासून संरक्षण नाही. फक्त वाचन... झपाटल्यासारखे...वेड लागल्यासारखे.. तिकडून गोपाळराव पाहत आहेत. इतक्या दुरूनही त्यांना सारे दिसते. आपल्या शरीराची नस न् नस त्यांना माहित आहे. इतक्या लांबून आपला जीव शोषून घेत आहेत. कसे वागावे हेच कळत नाही.
साधं लुगडं नेसण्याची गोष्ट! नऊवारी काय आणि गुजराती काय त्यासाठी केवढा गजब केला. लगट पत्रे लिहिली. बेईमानपणाचा आरोप केला. जेवण्याचेही तसेच. तिथून निघाले तेव्हा म्हणाले होते, तू मांस खाल्ले तरी हरकत नाही. गोऱ्या बायकांसारखा झगा घातला तरी चालेल. पण कसले काय? त्यांची इच्छा मी या खोलीत डाळ भात शिजून खावा. पण कसे शक्य आहे? अभ्यासाला वेळ मिळे ना. म्हणून एका लँडलेडीकडे जेवायला लागले. तर केवढ्या आकांडतांडव केला. म्हणाले, तू बाटलीस. ब्राह्मण धर्माला काळीमा लावलास. रमाबाई प्रमाणे तुम्ही ख्रिश्चन होशील.
बरं त्यांच्या पत्राकडे लक्ष द्यायचे नाही म्हटले तरी शक्य होत नव्हते. शब्दात भयंकर दाहकता, विखार, असुडाप्रमाणे त्यांचे शब्द मनाला छेडून जातात. तेच शरीर आहे पण मन बदलले आहे. विचार प्रगल्भ झालेत. नवीन क्षितिजे दिसताहेत. ते मात्र अजून तिथेच आहेत. एवढ्या थंडीत इथल्या प्रमाणे वागले नाही तर मृत्यूला कवटळावे लागेल. मग इतका केलेला अभ्यास, परिश्रम, कष्ट याचा काय उपयोग? मेलो तर देशाला काय उपयोग?
कधीकधी आनंदीचे मन बंड करून उठे. वाटे स्वतंत्र व्हावे. आहार, पोशाख बदलावा. उदासिन वृत्ती टाकून द्यावी. आणि मन हादरले. लांबून गोपारावांचा क्रुध्द चेहरा पाहायला लागला. डोळ्यातून ठीणग्या उठू लागलेल्या दिसल्या. भयाने तिने डोळे घट्ट मिटून घेतले. नाही... नाही.. शक्य नाही. आपले मन, शरीर आपले नाही. आहेत हे गोपाळरावांचे. आपण केवळ कळसुत्री बाहुली आहोत. आपल्याला स्वातंत्र्य नाही. आपण येथे शिकत आहोत हे गोपाळरावांच्या इच्छाशक्तीने. आपण केवळ निमित्त मात्र आहोत.
झोपेचे खोबरे झाले होते. कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नव्हती. नवऱ्याच्या पत्राची सारखी आठवण येत होती .पंडिता रमाबाईंनी धर्मत्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बातमी कळवली होती. नवऱ्याच्या नजरेबाहेर बाई गेली की ती असेच काहीतरी करते. असे लिहिले होते. तू ही बाटशील अशी भीती वाटते. नेहमीप्रमाणे बरेच खोचक, कुत्सिक लिहिले होते.
तेवढ्यात गजर झाला. डोळे चुरचुरत होते. पण उठणे भाग होते. थोडी थंडी कमी झाली होती. अभ्यासाला सुरुवात केली. दुसऱ्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती. खूप वाचायला हवे. मन एकाग्र असणे जरुरीचे होते. आज मन काही केल्या स्थिर होत नव्हते. अभ्यासात हयगय करून चालणार नव्हती. प्रयत्नपूर्वक मन जाग्यावर आणले.
हिंदुस्थानातील पहिली स्त्री शिकायला अमेरिकेत आली होती. अपयश आले तर ते तिचे स्वतःचे नसून तिच्या देशाची होते. पहिल्या वर्षीच्या हुशारीचे सर्वत्र कौतुक झाले होते. एका हिंदू मुलीने अमेरिकेत येऊन, कष्टात दिवस काढून, अमेरिकन विद्यार्थीनींच्या वरचढ झाल्याने तिचे कौतुक केल्या गेलं. पहिल्या वर्षी प्रमाणेच दुसरे वर्ष ठरणे आवश्यक होते.
तिने वाचण्यास सुरुवात केली. पण आज मनाने बंड पुकारले होते. पंडिता रमाबाईने धर्मांतर करून काय मिळवले? पंडिता पदवी संपादन केली. इतकी हुशार, ज्ञानी अशा बाईने ख्रिस्ती व्हावे? देशाला काय फायदा? स्वतःचा काय फायदा झाला?
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
👍
🙏
3