
Yuti's Hub Library
June 14, 2025 at 10:59 AM
!!! डाॅ आनंदीबाई जोशी !!!
भाग - ३०.
आनंदी थंडीने गोरठली. खोकल्याची उबळ सुरू झाली. शिवाय मैत्रिणीने केलेला आग्रह. आनंदी घराकडे वळली खरी पण तिच्या नजरेसमोर गोपाळरावांचा क्रुद्ध चेहरा आला. फार भीती वाटली. कॉलेज बुडून घरी राहायची कल्पना भयंकर वाटू लागली. ती भानावर आली. नव चैतन्य अंगात शिरले. बेहोशीतच कॉलेजकडे निघाली.
वर्ग सुरू झाला होता. त्या दिवशी प्रॅक्टिकल होते. टेबलावर नग्न मानवी शरीराचा सांगाडा होता. शिक्षक मानवी अवयवाबद्दल माहिती देत होते. पण आज तिला काहीच कळत नव्हते. पोटात कसेतरीच होऊ लागले. अंगात कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला. मग तिच्या लक्षात आले, आपल्याला भूक लागली आहे. काल रात्री जेवलोच नाही. आज सकाळी काही घेतले नाही. अंगात थंडी शिरली आहे.
तास संपला. आबीचे लक्ष आनंदी कडे गेले. आनंदीचा चेहरा पांढरा पडला होता. खोकल्याची उबळ येत होती. नाक सारखे गळत होते. आबी तिच्याजवळ येऊन म्हणाली, अगं तू घरी जाणार होतीस ना? नाही गेले. अभ्यास बुडला असता ना? अगं पण तुझी तब्येत बरी दिसत नाही. मला काही होत नाही. देहाला विकार व्हायचेच. त्याचं काय कौतुक?
पुढच्या तासाला लेक्चर होते. आबी आनंदी जवळच बसली. आनंदी लिहिण्यात गर्क होती. आणि आबीच्या डोक्यात विचार चालू होते.. आपली पणजी हिंदू होती. तिचा आणि हिचा काही संबंध असेल का? आपला रक्तगट मिळते जुळते असेल का? खोकला आवरत आनंदी लिहीत होती. आबी मात्र नुसतीच तिच्याकडे बघत होती.
तास संपला. लंचची सुट्टी झाली. दोघी बाहेर आल्या. आनंदीचे डोके गरगरायला लागले. चक्कर येईलसे वाटत होते. आबीने घोडा गाडी थांबवली. म्हणाली, आनंदी तू आता माझ्याकडे चल. तिथे खा..पी.. दुपारी कॉलेजला आपण यायचं नाही.
आनंदी नको म्हणाली. आबी म्हणाली, हे खाण्याची निर्बंध सोडून दे. फुकट मरशील. आबी, मला खरंच माफ कर. मी नॉन व्हेजिटेरियनांकडे जेवत नाही. आबीने बराच आग्रह केला. पण व्यर्थ! आनंदी ज्या लँडलेली कडे जेवण घेते ते घर एका फरलंगावरच होते. आबिने तिला घेऊन घोडा गाडीतून लॅंडलेडीकडे निघाले. गाडीत बऱ्याच गप्पा झाल्या. मग आनंदी आजिजीने आबीचा हात हातात घेऊन म्हणाली, ए रागवू नकोस ग! अगंऽ! हे हजारो वर्षाचे परंपरेचे, रुढीचे ओझे मानगुटीवर बसलेले असते. ते इतक्या सहजासहजी नष्ट होत नाही. मी सांगते ते तुझ्या लक्षात नाही यायचं. अगंऽ, मी ओझ्याखाली वाकली आहे.
गाडी लँडलेडीया घराजवळ थांबली. आनंदी खाली उतरली. तिचे घर दुसर्या मजल्यावर होते. जिन्याच्या दहा-पंधरा पायऱ्या चढतानाच आनंदीला धाप लागली. शरीर गळून गेल्यासारखे वाटले. एक एक पाऊल उचलणं जड वाटू लागले. दाराची घंटा वाजवून ती आत गेली. टेबलाभोवती दोन खुर्च्या होत्या. लॅंडलेडीची मुलगी तिची वाट पाहत होती. दोघी जेवायला बसल्या. आनंदी समोर अर्धी वाटी सूप, ब्रेडचे दोन तीन तुकडे, मागून भात येणार होता. एमी आनंदीच्या आधी भरपूर जेवून घ्यायची. व आनंदी समोर कमी जेवायचे नाटक करायची. उद्देश हा की, आनंदीने कमी जेवावे. गोळा भर अन्न देखील आपल्याला नीट मिळत नाही याची खंत वाटायची. आनंदी उठली. भरलं माझं पोट. एमीचे हे रोजचेच होते. आनंदी पुरेपूर पैसे देऊनही पोटभर जेवायला मिळत नव्हते. आणि एमीचा हेतू साध्य होत होता.
आनंदी जायला निघाली तोच तिला कसेतरी व्हायला लागले. हात पाय थरथरायला लागले. डोळ्यापुढे अंधारी आली. कसाबसा तोल सावरत ती खुर्चीवर येऊन बसली. एमी म्हणाली, काय झाले गं? तुला बरं नाही का? आईला हाक मारावी म्हणून खिडकी उघडली. तर रस्त्याच्या कडेला गाडी उभी दिसली. आबी उतरताना पाहून एमीला बरे वाटले. तिने दार उघडले. आबी वर येताच, एमीने आनंदी बद्दल सांगितले. आबी झपाट्याने आत आली. खुर्चीत मान टाकून बसलेल्या आनंदीचे दोन्ही हात घट्ट धरले. आनंदीच्या अंगात बराच ताप चढला होता. आबीने आधार देऊन खाली आणले. गाडीतून तिच्या खोलीवर आणले. आबी सारी रात्र आनंदीची सुश्रुषा करत थोपटत बसली होती.
आठ-दहा दिवस आनंदीचे तापात गेले. अशक्तपणा खूप आला होता. उठण्या बसण्याचीही ताकद नव्हती. आबी आणि कॉलेजच्या मुली येत. शश्रुषा करत. ताप उतरला होता. पण अशक्तपणा अतिशय होता. तरी आनंदी कॉलेजात जाऊ लागली. अभ्यासाच्या वेळी कसे तरी मन एकाग्र होई. इतर वेळ भलते सलते विचार येत असत.
तिने मनाला आवर घातला. परीक्षा जवळ आली होती. दोन वर्षे पहिला नंबर सोडला नव्हता. हे शेवटचे वर्ष. याही वर्षी नंबर यायलाच हवा. आज कॉलेज नव्हते. अभ्यासाला बसली. एक दीड तास अभ्यास छान झाला. मृत्युचे, स्वतःच्या रोगाचे विचार पळवून लावले. तिला एकदम बरे वाटू लागले.
असा कसा आताच मृत्यू येईल? आता तर कुठे जिवनाला सुरुवात झाली. मृत्यू सुद्धा इतका कठोर होईल का? गोपाळारावांनी इतके हाल सहन करून येथे पाठवले. आपण इथे इतकी तपश्चर्या केली. यज्ञ सुरू केला. यज्ञकुंड पेटले आहे. मंत्रघोष चालू आहे. फळ समोर आहे. आणखी एक उडी मारली की, यश हाताला लागेल. डॉक्टर झाल्यावर हिंदुस्थानातील बायकांना उपयोग होईल. हिंदुस्थानला फायदा होईल. छेः! काहीतरीच विचार.
तिने तयारी करून लायब्ररीत जाण्यासाठी बाहेर पडली. डोक्यात नवऱ्याचेच विचार चालू होते. गेल्या २०-२५ दिवसात मृत्यू बरोबर लढाई केली होती. आजाराने शरीर खिळखिळे झाले होते. दर आठवड्याला पत्र लिहावे अशी गोपाळकांची सख्त ताकीद... गेल्या तीन आठवड्यात पत्र पाठवल्या गेलेच नाही. स्वतःच्या आजाराबद्दल काहीच लिहिले नव्हते. कसे लिहिणार? ते तिकडे अगदी एकटे, एकाकी आहेत. मित्रपरिवार, नातेवाईक नाही. हजारो मैल दूर असलेल्या बायको बद्दल त्यांना कसे कळवावे? आज त्यांना पत्र लिहायचेच. लायब्ररीतून पुस्तक घेऊन घरी आली. दार उघडले. एक जाडजुड लिफापा दिसला. हिंदुस्थानातून गोपाळरावांचे पत्र आले होते....
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
🙏
😢
4