
Yuti's Hub Library
June 14, 2025 at 10:59 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - २९.
आज आनंदीचे मन अभ्यासात काही केल्या लागत नव्हते. आज तिचे काहीतरी बिनसले होते. दिवसाचे सारेच वेळापत्रक चुकले होते. तिच्यासाठी एक एक मिनिट महत्त्वाचा होता. सात वाजले होते. नऊला कॉलेजला जायचे होते. आज अभ्यास शक्यच नव्हता. विचार स्वैरभैर सुटले होते... पंडिता रमाबाई... गोपाळराव... धर्माबद्दल... येशू बद्दल... आहाराबद्दल... पोशाखाबद्दल...
गोपाळरावांचे पत्र पुन्हा वाचायला घेतले. त्यात त्यांनी हिंदू धर्माच्या श्रेष्ठतेबद्दल, वेदांचा गौरव, गीतेची महती होती. त्याचबरोबर इंग्लंड, अमेरिकेच्या धर्माची चवचाल वागणुकीची टर उडवली होती. कुत्सितपणे नासकी, कुजकी वाक्य लिहिली होती.
ती विचार करू लागली... आपण गोपाळरावं पेक्षा फार दूर आहोत. आपले विचार, मन जास्त प्रगल्भ, प्रगत झाले. त्या उंचीवर ते येणे कधीच शक्य नाही. आणि ती एकदम दचकली. हे कसले विचार येत आहेत मनात? ते तसे आहेत का? सुरुवातीपासूनच त्यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला. आपल्याला ज्ञान दिले. जगाने केलेली हेटाळणी सहन केली. त्यांच्या विचारांनी केवढा मोठा पल्ला गाठला. हजारो योजने दूर आपल्याला पाठवून दिले. आपण काहीतरी घडावे, ज्ञान संपादन करावे म्हणूनच ना? त्यांनी हे सर्व केले म्हणून का त्यांना जुनाट, कर्मठ हिंदू समाजाच्या रांगेत बसवणे बरोबर आहे? काही बाबतीत असेल त्यांचे विचार वेगळे, विचित्र! ती मनोमन शरमली. आपल्या मनात वाकडे आलेल्या विचारांची खंत वाटली. आणि मग नवऱ्याबद्दलचे प्रेम जास्तच दाटून आले.
आणि तिने गोपाळरावांना पत्र लिहायला घेतले. मनातले विचार लिहायचे ठरवले. आपल्याला झालेली ज्ञानप्राप्ती नवऱ्याला द्यावी असा निश्चय केला. मग ती लिहीत गेली....
आजपर्यंत सर्वात जास्त दुःख झाले... आपल्या धर्मावरील टीकेवरून. आणि मग सर्वच धर्म, पंथात कसे एकच समान तत्वे आहेत, ईश्वर सत्यमय आहे, ईश्वराचा कायदा सर्व जगाचा धर्म आहे. सत्यात धर्म येतो व धर्मात पवित्रता निती, न्यायही येतात.. वगैरे... वगैरे... तिने बरेच काही लिहिले. शेवटी लिहिले... आपल्या शेवटच्या प्रवासात आपण एकमेकांशी मिसळून हातात हात घालून चालू या.. अगदी थकेपर्यंत. प्रीती व सत्य या दोन हातांनी एकमेकांकरता खपू या... हाच काय तो धर्म...
तिने पत्र लिहिले खरे पण या पत्रामुळे कसे कसे विकार उद्भवतील याचे चित्र तिच्या मनःचक्षु पुढे उभे राहिले. मागे त्यांनी एका पत्रात लिहिले होते.. जेवण्याचे फार हाल होतात. नोकरीत मन लागत नाही. वेडेपिसे झाल्यासारखे वाटते.
खरच कसे जगत असतील? समाजापासून तुटलेले, मित्र, नातेवाईक कोणी नाही. कुठे कसे जेवत असतील? पोस्टात लोक घालूनपाडून बोलत असतील तेव्हा किती येतना होत असतील? नवऱ्याविषयी करूणेने मन भरून आले. वाटले, सूक्ष्म रूपाने जावे. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी. सेवा करावी. पण त्यांना हे आवडले असते का? जुनाट परंपरा रुढीतून आपण सुटावे म्हणून नवऱ्याने आयुष्याचा होम केला.
मनाला सावरले, पुढे लिहिले... मला आपल्या भेटीची तीव्र इच्छा झाली. आपले पत्र आले की, आपणच समीप असल्यासारखे वाटतय. मनाला आनंद मिळतो. आपणास काही त्रास होत असल्यास, अस्वस्थ झालात ते मला कळवत जा. मला जशी सुखाची भागीदार करता, तशीच दुःखाची करत जा. पत्र पुरे केले. पत्र लिहिताना तिचे मन अनेक संमिश्र भावनांनी भरले होते. प्रेम, आदर, धाक होता. त्यांचे विषयीचे हे चित्र तिच्या मनावर फार पूर्वीपासूनच रेखाटले होते. पूर्वी तिला त्यांच्या विचित्र, तर्हेवाईक वागण्याचे काही वाटत नसे. पण आता कळायला लागली की ते खूप मागे पडले. तेच दुःख फार मोठे होते.
पोशाख करून ती कॉलेजला निघाली. हिमवर्षाव सुरू झाला. रस्त्यावरची रहदारी एकदम कमी झाली. ती रस्त्याच्या कडेला बेहोशीत, गुंगीत, विचारात मग्न उभी होती. तेवढ्यात तिच्या वर्गातील दोन मुलींना हिम वर्षावात आनंदी उभी असलेली दिसली. त्या तिच्याजवळ येऊन तिला हलवत म्हणाल्या, तू मूर्ख आहेस का? हिमवर्षाव सुरू झालाय. तुझ्या डोक्यावर हॅट नाही. हातात मोजे नाही. सरळ भिजत आहेस. मरशील ना.. ती एकदम भानावर आली. थंडी जाणवायला लागली. दुसरीने तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली, आम्ही तुला मरू देणार नाही. चल लवकर. आपण त्या वरचंणीखाली उभ्या राहू!
पाय उचलेना. अंगातले रक्त गोठले होते. चालण्याची शक्तीच उरली नव्हती. महत् प्रयासाने चालायला सुरुवात केली. झोक जात होता. पाय लटपटत होते. त्या दोघींनी तिला दोन्ही बाजूंनी दंडाला धरून चालवत होत्या.
वचणीला उभे राहिल्या. त्यातील आबी नावाच्या मुलीने स्वतःच्या गरम रुमाल्याने तिच्या अंगावरचा बर्फ पुसून काढला. समोर उपाहारगृह होते. कॉफी प्यावेसे वाटत होते. पण आनंदी हॉटेलच जात नाही, मांसाला शिवत नाही हे त्यांना माहीत होते. तिचा चेहरा केवीलवाणा दिसत होता. ही हिंदू मुलगी इतकी हुशार आहे की, परीक्षेत इथल्या मुलींना हटवू शकते. हे त्यांना माहीत होतं. ही आबी तर आनंदीला बहिणच मानत होती. तिचा पणजोबा फार पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी बरोबर हिंदुस्थानात आला होता. त्याने तिथल्याच एका राजकन्याशी विवाह केला होता. आबीमध्ये हिंदू रक्ताचा थोडाफार अंश होता. ही मुलगी इथून विजयश्री घेऊनच जावी असे आबीला वाटे. आनंदीला एखादा गरम ओव्हरकोट, हातमोजे द्यावे असे आबीला फार वाटे. पण आनंदीच्या डोळ्यातील स्वाभिमान बघून आबीं स्वस्थ राही.
आबी म्हणाली, आज तू. गाडी करून खोलीवर जा. कॉलेजची वेळ झाल्यामुळे आम्हाला जायला हवे. तिला घरी जाण्याबद्दल परोपरीने विनवून त्या निघून गेल्या.
काय करावे? जावे का घरी? हिमवर्षाव थांबला होता. खोकला सुरू झाला. पांघरून घेऊन झोपून राहिलो तर बर वाटेल असा विचार करून, पाय घराकडे वळले. पण रस्त्यावरच्या पांढऱ्या शुभ्र बर्फात गोपाळरावांची क्रुध्द आकृती दिसू लागली.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
🙏
👍
5