Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 14, 2025 at 02:49 PM
*छावा* *लेखक - शिवाजी सावंत* *भाग-६६* 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠   भूकंपाने हलावा तसा रायगड गड्ड्यातून हलला होता. संताजी-बहिर्जी गडावर पोहोचले होते. पाचाडच्या राबत्या बाजूने पडलेला एत्तिकादखानाचा घेर चुकवून चोरदरवाजाने ते गड चढून आले होते. खासेवाड्यात महाराणी येसूबाईंच्यासमोर उभा राहताना संताजी हातच्या जिनाने तोंड झाकून घेत कुडीभर गदगदत म्हणाला, ‘‘जगदंबा कोपली मासाब, त्वांड न्हाई सांगाय. धनी संगमेसुरात फसलं! कोल्हापूरच्या खानाच्या घेरात... घेरात दस्त झालं!!’’ जिनाने झाकल्या चेहऱ्यानेच येसूबाईंच्या पायावर पडत एवढ्या उभारीचा संताजी – पण तोही गदगदू लागला. कानांवर गपकन हात घेतलेल्या येसूबाई, अंगावर वीज पडल्यागत जागीच बधिर झाल्या. आपण श्रीसखी आहोत, रायगडावर आहोत, महाराणी आहोत, कशाचेच भान उरले नाही त्यांना. ‘‘आईऽ वाऽ घजाई’’ असा आगडोंब उभी कुडी हालवून टाकत गरगर फिरला त्यांच्या आतल्या आत, विस्फारल्या भोसलाई डोळ्यांसमोर रायगडासकट ब्रह्मांड फिरले. देवमहालाकडे धावत जगदंबेच्या देव्हाऱ्यासमोर त्या एकल्याच अंगभर हलू-हमसू लागल्या. त्यांना कुशीत थोपटतं घ्याव्या अशा जिजाऊ नव्हत्या, धाराऊ नव्हती. आता होती फक्त आणि फक्त जगदंबाच! केवढे फिरले त्यांच्या मनी! स्वारीला सोडविण्यासाठी जिवाचे रान केले पाहिजे. पण कसे? गड तर खानाच्या घेराने आवळून टाकलेला. त्यांना फार-फार सय झाली, ती सरलष्कर हंबीरमामांची. भडभडून-भडभडून आलं. रूपाजी, मानाजी त्र्यंबक-रामसेजाकडे जखडून पडले होते. निळोपंत कल्याण-भिवंडीत गुंतून पडले होते. जेवढे-जेवढे कुवतीचे खासे होते, ते-ते मुलूखभर अटीतटीने आपापल्या प्रांताला भिंगरीसारखी अटीतटीची घोडी फेकत होते. पुरत्या एकाकी झाल्या येसूबाई. वादळातली मोगरवेल थरथरावी तशा थरथरू लागल्या. उभी हयातच फिरली क्षणभरातच त्यांच्या पाणभरल्या डोळ्यांसमोर. ‘जन्म देणारं आणि वतनाच्या लालसेनं पारखं झालेलं शृंगारपूर! ‘सूनबाई’ आहेत असं कधीच भासू नये, असे प्रेम देणारे आबासाहेब. थोरल्या आऊ, सती गेलेल्या मासाहेब यांनी मुलीसारखा दिलेला घरोबा. सिंहासनाच्या हवसेपोटी रात्रंदिन स्वारींना- आम्हास पाण्यात बघणाऱ्या रामराजांच्या मासाहेब. त्यांचे पाठीचे बंधू असून आम्हाला वडीलकीचा पाठआधार देणारे हंबीरमामा. साफ मनाची, वावगी बाब समोर आली, तर तडकन बोलून दावणारी स्वारी. आजोळचे असून स्वारींना झोपेच्या सुखालासुद्धा पारखे करणारे फलटणकर. पडली ही दौलत, तर काय करील आमचे औरंग? त्याचा जनाना – छीऽ छीऽ’ मान डावी-उजवी तडफडती झटकताना एकाकी, असहाय लहान मुलीगत त्या हमसू लागल्या. उसासा बाहेरही पडू नये एवढ्या जीवघेण्या कोंडीने त्यांचा ऊर वरखाली डचमळू लागला. ‘‘राणीसाऽहेब! धीरानं मन बांधावं. गडावरच नव्हे; तर मुलखात जगदंबेच्या रूपानं आता आहात त्या आपण एकल्याच. अशीच आली होती नौबत, थोरले महाराज आणि पोर वयाचे महाराज आगऱ्यात याच औरंगच्या कोठडीत फसले होते त्यासमयास थोरल्या आऊसाहेबांच्यावर! हबशी जौहरच्या घेरात थोरले स्वामी अडकून पडले पन्हाळ्यावर तेव्हा वेढ्याचा उपराळा करण्यासाठी कमरेला हत्यार बांधून जायला निघाल्याही होत्या त्या पन्हाळ्याकडं. हे सारं मनी धरावं. उठावं. पायबळानं गडाला धीर द्यावा.’’ देवमहाली आल्या खंडोजींचे शब्द येसूबाईंच्या पाठीवर जसे मायेचा, धीराचा हातच फिरवून गेले. ‘राजा’ हा उपभोगशून्य स्वामी असतो, हे जेवढे खरे तेवढेच किंबहुना त्याहून अधिक, अशा राजाची राणी उपभोगशून्य तर असतेच; पण स्वामिनी असलीच तर खांद्यावर पडणाऱ्या फक्त जोखमींची; कारण ती असते केवळ सावली! एकल्या राजाची नव्हे तर त्याच्यासाठी तळहाती जीव घेऊन प्रसंगी आपल्या जिवांची कुरवंडी करणाऱ्या शेकडो रयतेची. पदरशेवाने आपल्या नेत्रकडा टिपून येसूबाई उठल्याच. एकदा देव्हाऱ्यातील जगदंबमूर्ती डोळ्यांत भरून घेत निर्धारी म्हणाल्या – ‘‘खंडोजी, रूपाजी-मानाजींना रामसेज सोडून मिळेल तेवढ्या कुमकेनं रायगडाचा उपराळा करायला लिहा. रामराजांना आता आमच्याच महाली राहाण्याची व्यवस्था करायला सांगा! येसाजी दाभाड्यांना अर्जाेजी, गिर्जाेजींना असाल तसे रायगड जवळ करायला हारकारे द्या. तुम्ही कुठल्याही कारणासाठी गड सोडू नका. भरोसा आहे आमचा – स्वारी प्रसंगी मोडेल, पण रायगडाच्या बाबीनं कसलाही सुलूख नाही मानणार!! जशी स्वारी तसेच रामराजे मानून पोख्तपणे चालविले पाहिजे साऱ्यांनी!!’’ त्या येसूबाई नव्हे – साक्षात मूर्तिरूप जगदंबाच मानवी रूपाने बोलताहेत असा खंडोजींना भास झाला. मिरजेच्या भुईकोट ठाण्यातून बाहेर पडलेले मुकर्रब-इखलास जोखमीचे कैदी घेऊन अकलूजच्या तळावर विश्रांती आणि रसद घेऊन बहादूर गडाकडे निघाले. पिछाडीला राहिलेला अकलूजचा शाही तळही त्यांना सामील झाला. पुराने नदी फुगावी, तशी आता मुकर्रबची फौज दिसू लागली. माथ्यावरची उन्हतापीची झळ चुकवावी म्हणून फौजेच्या हशमांनी टापश्या बांधून गर्दनी खाली घातल्या होत्या. राजांना आणि कुलेशांना तर लादलेल्या जनावरांच्या गर्दनीशीच दोरखंडाने जखडून टाकले होते. तळपत्या उन्हाखाली हजारो घोड्यांचा काफला, रखरखीत, उजाड प्रदेशात संथ चालीने चालला होता. सगळ्या फौजेतल्या तीनच मनांत विचारांची खाई रखरखत होती. दक्षिणेत आल्यापासून शहेनशाहला असा जिंदा तोहफा नजर करण्याची किस्मत लाभलेल्या मुकर्रबखानाच्या मनात एकाच विचाराची की, ‘जी चाहे सो फैसला लेनेवाले हजरत संबाको ही दख्खन सुभा करें तो क्या? कल उसको भी कुर्निस करना पडेगा!’ आणि जनावराच्या गर्दनीशी आपली गर्दन जखडलेल्या राजांच्या मनात – एकाच विचाराची की, ‘पडलाच रायगड तर काय गुजरेल श्रीसखींच्यावर?’ आणि त्यांच्याच मागून खेचल्या जाणाऱ्या कवी कुलेशांच्या मनात एकाच विचाराची की, ‘हमारे साथ नहीं बैठे भोजनमें कभी रायगडके कोई मंत्रिगण। और इस आखरी भोजनमें स्वामी भी नहीं मिले साथ तो?’ मजला मागून मजला मागे पडत होत्या. उन्हाने घायाळ झाल्या राजे, कुलेशांना जवळ येऊन घोड्यावरूनच इखलास खोचकपणे जाब करत होता, ‘‘प्यास लगी है, मरहट्टोंके शहेनशाह और वझीर?’’ आणि कैद्यांनी मान फिरवताच काखेतल्या बांधल्या पखालीचे पाणी त्यांच्या मुखड्यावर शिंतडून, पखाल आपल्याच तोंडाला लावून घटाघटा पाणी पिऊन खदखदा हसताना म्हणत होता, “क्या गर्मी है? कितना ठंडा है पानी!’’ उन्हाची मार असह्य झाली की, आपली जनावरे आणि फौज वाटेतल्या आमराईच्या गर्द सावलीखाली उभी करून राजे, कुलेशांची घोडी मात्र मुद्दामच उन्हात खडी केली जात होती. दिवस आता कलायला झाला आणि फौज बहादूरगडापासून दोन कोसांवर येऊन रुकली. मुकर्रब-इखलास कुणाचीतरी वाट बघत होते. एकसारखे घोडे फौजेला आघाडीला काढून तळहाताची झड डोळ्यांवर नेत बहादूरगडचा माग घेत होते. बऱ्याच वेळाने एक घोडेपथक समोरून येताना दिसू लागले. त्याच्याबरोबर दोन उंटही होते. पण त्यांच्या पाठीवर स्वार नव्हते. ते माना वरखाली डुचमळ करत तसे दौडत पथकाबरोबर येत होते. तेही बिचारे उन्हाने कासावीस झाले होते. बहादूरगडाहून खुद्द औरंगजेबानेच फत्ते घेऊन येणाऱ्या मुकर्रबखानच्या आगवानीसाठी पाठविलेले ते त्याचे नेक सरदार होते – सरदारखान आणि हमिदुद्दीनखान! त्यांच्याबरोबर मुकर्रबसाठी मरातबाच्या नव्या खिल्लती देण्यात आल्या होत्या. एका खिदमतगाराच्या घोड्यावर दोन ‘तख्ता-कुलाह’ म्हणजे इराणी पद्धतीचे लाकडी खोडे होते. सरदार आणि हमिदुद्दीनला बघताच मुकर्रब आणि इखलास पायउतार झाले. पुढे होत त्यांनी त्यांना कडकडून खांदाभेट दिली. हमिदुद्दीन मुकर्रबला म्हणाला, ‘‘मुबारक हो खान – आलमपन्हाका हुक्म है, दोनो कैदिओंको ‘तख्ता-कुलाह’ डालो। उतार दो उनके बदनसे काफर असवाब और चढाओ ये खास खुशामदगारोंके कुर्ते! जकड दो उनको उंटके पीठपर और ले चलो बाजे बजाते, ढिंढ निकालकर, बहादूरगड!’’ मुकर्रबखानाच्या हशमांनी पटापट हालचाली करून घोड्यांवर जखडल्या राजे आणि कुलेशांना खाली घेतले. त्यांच्या गळ्यातील मोतीकंठे, कानांतील सोनचौकडे असे मौलिक डाग कुणी-कुणी ओरबाडले. त्यांच्या अंगावरचे जामे ओरबडून काढण्यात आले. त्याऐवजी विदूषकासारखे ढगाळ कुर्ते दोघांच्याही अंगी जबरीनं चढवण्यात आले. कमरेला घंटांच्या माळा आणि काटेरी वेलींची कडी आवळण्यात आली. डोकीवर उंच माटाच्या, लाकडी, विदूषकी टोप्या चढवण्यात आल्या. हात आणि गर्दन जखडून टाकणारे इराणी पद्धतीचे, लाकडी ‘तख्ता-कुलाह’ त्यांच्या हाता-कंठात करकचून आवळण्यात आले. दोघाही कैद्यांनी सरदारखान, हमिदुद्दीन आणि मुकर्रबखान यांनी दिलेले हुकूम पाळणाऱ्या खिदमदगारांना कसलाही विरोध केला नाही. कसे दिसत होते राजे आता! कुठल्याही फौजी मावळ्याने त्यांना दुरून तसे बघितले असते, तर गनिमाचा बहुरूपी खबरगीर म्हणून दस्तच करून टाकले असते! ते ‘राजे’ नव्हतेच. विदूषकी पोशाखात बादशहासमोर पेश केले जाणारे ‘बळी’ होते. राजचिन्हाची एकच खूण ‘नाचीज’ म्हणून कुणीही उचकटून न टाकल्याने त्यांच्या अंगावर तशीच होती आणि तीही आबासाहेबांनी दिन-रात छातीवर वागविलेली, चौसष्ट कवड्यांची फक्त भवानीमाळ! संगसोबतीला एकच माणूस होते – कुठल्या कुठे कनोज देशात उपजलेला एकमेव कवी – छंदोगामात्य – कुलएख्त्यार कुलेश! सरदारखान, हमिदुद्दीन, इखलास-मुकर्रब यांनी कैद्यांना चौफेर कडेकोट घेर टाकणारी फौजेची हत्यारबंद शिस्त लावून घेतली. हात रश्यानं जखडलेल्या दंडात काढण्या आवळलेल्या कैद्यांच्या भोवती हजारो हशम तळपत्या नंग्या तेगी नाचवत हारीने उभे ठाकले. शाही शहाजणे, तुताऱ्या, नगारे, चौघडे यांची एकमेकांत मिसळती घोष गर्दी उसळली. बेहोश हशमांनी नरड्यांच्या घाट्या फोडत किलकाऱ्या उठविल्या – ‘‘धीनऽऽन धीऽऽन.’’ निघाली! काफर कैद्यांना कडेकोट बंदोबस्तात घेराने जखडून धिंड निघाली. औरंगजेबाच्या पुऱ्या हयातीत त्याने सग्या भावांपासून कैक गनिमांची बेरहम कत्तल केली होती. पण आज त्याच्या हुकमाने निघणारी ही अशी पहिलीच धिंड होती. का घेतला होता त्याने हा असा निर्णय? एकाच हेताने. ही अशा धिंडेची खबर मराठा मुलखात गावोगाव पांगेल – वाऱ्यासारखी. ती ऐकून हाय खाल्लेले जिंदे मरहट्टे आपसूक झक्कत येतील तसलीम करत मन्सबीची खिल्लत मागायला. पडला मराठी मुलूख एकदाचा की, करून टाकता येईल कांजीवरमपासून तहत काबूलपर्यंतचा पट्टा इस्लामचा बंदा!! आणि त्या अफाट सलतनतीची राजधानी करता येईल – देहली! मोतद्दारांनी हाती धरलेले कैद्यांचे काढणीबंद खेचले. राजे-कुलश तिरपागडत त्या झटक्याबरोबर ओढले गेले. भोवतीच्या जमावातून शेलक्या शिव्या कल्लोळू लागल्या – “नाबकाऽर लईऽम, मोजऽदा – खिंचो कसके शैतानोंको।” गेल्या नऊ वर्षांत याच सांबरूपी संभाने त्यांची बऱ्हाणपूर, औरंगाबाद अशी कैक ठाणी तसनस केली होती. कैक सुरम्या लढवय्यांना मौतीचे कंठस्नान घातले होते. फकीर फकिराण्याला जिम्मा रोजचा नमाजसुद्धा नामुमकिन केला होता. त्यांचा नुसता हा घुस्साच नव्हता – शक्य असते, तर सपासप हत्यारे चालवून त्यांनी दोन्ही कैद्यांचे एकाच गोळ्यात केव्हाच गाठोडे केले असते. देठ मोडल्या खालमानेने मराठी दौलतीचे मानकरी छत्रपती आणि छंदोगामात्य कुलेश हत्यारी धारकरी खेचतील तसे भेलकांडत चालू लागले. तशाही स्थितीत त्यांना एकदा तरी बघण्यासाठी कैकजण गर्दी करून पुढे घुसत होते. जे पाय रुजाम्यांच्या पायघड्यांवरून आत्मविश्वासाने रुपत, चालत आजवर आले होते, तेच छत्रपतींचे रक्तदाट, गुब्बार पाय आज पेडगावच्या वाळवंटात फरफटत चालले. ज्या देहाने रायगडावर सोन्याच्या झुलेनं सजल्या हत्तीवरून राजा म्हणून मिरवून घेतले होते, तोच जखडबंद देह धिंडीचा भोग भोगू लागला. राजांनी भोवतीचं काहीच नजरेस पडू नये म्हणून डोळे मिटतेच घेतले होते. कुलेशांचे डोळे उघडेच होते – पण त्यांना दिसले तरी काही भासत नव्हते. त्यांच्या उजव्या दंडातून, संगमेश्वरात रुपल्या बाणाने ओघळून-ओघळून थकलेले रक्त आता साकळले होते. काळपटले होते. भोवतीच्या हजारो मुगल हशमांचा आनंदी जल्लोषाचा नुसता कलकलाट चालला होता. कुणाचेच कुणालाही काहीही ऐकू येत नव्हते. लोक ओरडत होते – “खिंचाे – जोरसे खिंचो। मरहबा – मुकर्रब-इखलास – आफरीन.” काढणी खेचणाऱ्याने वैतागून एवढा जोरदार हिसडा हातातल्या काढणीला हासडला की, जगदंबेच्या कपाळी चढविलेले कौलाचे फूल घरंगळत कोसळावे तसे राजे छाताडावर थेट भुईवर आडवे झाले! तशी भोवतीच्या गर्दीत खुशीच्या ऊर्मीची लाटच लाट उसळली. कमरेला नेट देऊन उठणाऱ्या राजांना एकाकी भवानीबाई नि बाळराजांची आठवण झाली. ‘ते बचपणी कमरेलाच घालत होते विळखा! थोडे मोठे झाले आणि सुटला त्यांचा विळखा! आता घालायचे मुजरे! मुजरे – मुजरे! आहेत याद किती हातांनी घातले या कुडीला मुजरे? कशासाठी घातले त्यांनी ते? लाचार होते म्हणून? माणसे मान झुकवतात – कशापुढे? सत्तेपुढे? साऽफ गल्लत! माणसे झुकतात प्राणापल्याड जाऊन भोवतीच्या कैकांचे माणूसपण जपणाऱ्यांसाठी. आबासाहेब तसेच. ते गेलेत तरी का नाही वाटत गेल्यासारखे? कसे वागते, असते तर ते आत्ता?’ आणलेले, गर्दीमुळे बुजलेले उंट सांडणीस्वारांनी चुचकारून कसेतरी एकदाचे बसते केले. त्यावर लादण्यासाठी राजांना आणि कुलेशांना काढण्या धरलेले हशम खेचू लागले. ते त्यांना साधेना. पाय भुईत जाम रुतवलेले कैदी तसूभरही हलायला तयार नव्हते. काढणीधारी हशमांची आणि कैद्यांची खेचाखेच बघत असलेला इखलास भोवतीच्या हशमांना बघून कडाडला, ‘‘देखते क्या हो बेवकूब, गद्दार! उठाव दोनोंको, डाल दो उंटोंपे।’’ भोवतीच्या हशमांतले पाच-दहा धिप्पाड हशम हातातल्या तेगी म्यानबंद करत पुढे झाले. लुटीची बोचकी उचलावी, तसे राजांना आणि कुलेशांना बळजोरीने उचलून त्यांनी उंटावर लादले. दोरखंडांनी दोघांनाही उंटाशी करकचून आवळले. खूर वेडेवाकडे करत वेड्यावाकड्या अंगचणीचे उंट, भोवतीच्या जमावातून ‘‘धीऽन धीऽऽन’’चा कल्लोळ उठत असतानाच भेदरून वर उठले. सांडणीस्वारांनी त्यांच्या शेपट्या करकचून पिरगाळल्या. त्या कळीसमके माना मागेपुढे करत ती मुकी जनावरे डुचमळत चालू लागली. राजे आणि कुलेशांचे पाय त्या उंटांच्या पोटाभोवती जखडून बांधले होते. दोघांच्याही हातातल्या काढण्या धरून आघाडीला मुकर्रब, इखलास खासे घोड्यावर बसले होते. वाद्यांचा, आरोळ्यांचा कालवा कानठळ्या बसवत असतानाच कधी निघाली नव्हती, अशी जल्लोषती धिंड निघाली. वाटेवर येणाऱ्या मौजे-बुद्रकातली औरंगची रिआया मुकर्रब व इखलासवर खोबरे आणि खारकांचे तुकडे फेकत हर्षाने नाचत होती. दिवस ईदसारखा साजरा होत होता. रात्र ‘शबेबारात’सारखी सजली जाणार होती. वाटेवर पसरलेल्या लांबलचक तळावर अशी एकही असामी नव्हती की, तिला दोजखी कैदी बघून डोळ्यांचे पारणे फेडायची जन्नती ख्वाईश नव्हती. फौजेचे हत्यारी लोकच ‘‘सबूर, पीछे हटो,’’ म्हणत आपल्याच बाया, मर्दाना, बच्च्यांना मागे हटवीत होते. त्यांची नजर चुकवून बच्चे-मोगल आणि औरती उंटावरच्या कैद्यांना हाती मिळतील ते पायतळीचे दगडी गुंडे मारत होते. ‘‘कुत्ते, शैतान, काफर’’ असे पोटतिडकीने म्हणत, नफरतीने मनातला घुस्सा थुंकीत एकवट करून पायाशी पचापच थुंकत होते. आता डोळे सताड उघडे केलेल्या क्षत्रियकुलावतंस शिवपुत्र संभाजीराजे यांच्या नजरेत अपार, अशरण तेज उतरले होते. देहात नसल्यासारखेच दिसत होते ते! मांडाखालच्या उंच जनावरापेक्षा, डोक्यावरच्या उंच लाकडी टोपीपेक्षा, एवढेच काय; रायगडाच्या उंच आघाडी मनोऱ्यापेक्षा नजर ठरणार नाही, अशा उंचवट्यावर जाऊन बसल्यागत दिसत होते त्यांचे डोळे. एवढ्या जोश कल्लोळातही कुलेशांच्याकडे बघत त्यांना विचारलेही, नेहमीच्याच राजबोलीत – ‘‘कचरलात छंदोगामात्य?’’ झटकन आपली गर्दन राजांच्याकडे करून ती किंचित लवती करत कुलेश उत्तरले, ‘‘जी नहीं, नहीं होती ये आंखें, तो ऐसा नहीं देखना पडता स्वामीको!’’ मध्येच मागे वळून इखलास खेकसला, “क्या बकते हो आपसमें? नाम लो खुदाका.’’ एरवी जो फासला काही पळात काटला गेला असता, तोच सगळ्या तळाचे डोळे निववीत चांगला दोन-तीन घंटे काटला जात होता. हिंदोस्थानच्या शहेनशहा आलमगिरांचीच शाही मुराद होती ती. तसा हुकूमही होता. धिंड बहादूरगडाच्या आघाडी दरवाजात आली. दरवाजातच बहादूरखान, रणमस्तखान, शाब्दिखान, हसनअलीखान, गझनफरखान असे मुलूखभर तळ टाकून पडलेले खासे सरदार खडे होते. काही ना काही निमित्त काढून त्यांनी आज बहादूरगड जवळ केला होता. खिल्लती फेकून उभा मावळमुलूख फितव्याने फोडणारा बक्षी रुहुल्लाखान तर साऱ्या सरदारांत गरगर फिरत होता. त्यालाही बघायचा होता आँख भरून एकदा, दख्खनेत आल्यापासून हैराण-हैराण करणारा शैतान संबा! या खुशीच्या क्षणाची नौबत म्हणून गडावर तोफांची भांडी दणादण कडकडत फुटली. अंगावरचे विदूषकी, ढगळ कपडेसुद्धा जागजागी फाटलेले, उन्हाने घामेजलेले, अंगावर पडलेल्या दगडगुंड्यांनी जागजागी जाया झालेले कैदी – राजे आणि कुलेश, उंटावरून खाली उतरविण्यात आले. गडाच्या लोहारमेटावरून निवडून पाठवलेल्या लोहारांनी झटाझट दोन्ही कैद्यांच्या खांदा-छातीवरून आवळून त्यांच्या पायांत लोखंडी बेड्या सांडशी, हातोड्याने पक्क्या करून टाकल्या. संशयी आणि गैरवाजवी सावध खुद्द औरंगनेच प्रथम कैद्यांना बेड्या आवळण्याचा सख्त हुक्म दिला होता! त्याने सर्व सावधानगी घेतली होती. शक्य असते तर त्याने राजांच्या भोसलाई राजस मनालाही बेड्यात जखडण्याचा हुकूम दिला असता!! बहादूरगडात दिवाण-इ-आमचा दरबार खचाखच भरला होता. त्यात सगळीकडून आलेले मोगली सरदार, सर्जाखानसारखे इदलशाही, कुत्बशाही सरदार, सर्वांत आघाडीला शहजादे कदमबरहुकूम नजर बांधून दरबारी रिवाजाप्रमाणे खडे होते. अल्काबाच्या ललकाऱ्या उठताच गुर्झबारदारांनी हातचे गुर्झबी दंड रिवाजी होशियारीसाठी तिबार फरसबंदीवर आपटले. य:कश्चित माशी फिरली, तरी ते ऐकू यावे, असा सन्नाटाच सन्नाटा पसरला होता दरबारभर. सिंहासन बैठकीच्या पाठच्या दरवाजातून प्रथम वझीर असदखान बाहेर आला आणि पाठोपाठ हिंदोस्थानचा शहेनशाह मुहिउद्दीन मुहंमद आलमगीर गाझी औरंगजेब आला. त्याची कोरली दाढी आता पुरी-पुरी सफेद झाली होती. शेलाटी अंगकाठी मात्र उमर झाली असताही ताठ होती. डोळे शोधक, तीक्ष्ण होते. तो येताच उभा दरबार तसलीम देण्यासाठी खाडकन लवला. ‘‘पेश करो दरबारके सामने नापाक काफर कैदियोंको।” असदखानाने आपल्या अली हजरतांचा हुकूम मुकर्रबला सुनावला. मुकरर्बने इखलासला नजर इशारत करताच दहा-पाच हत्यारी हशमांनी घेर टाकलेले, दख्खनेत आल्यापासून औरंगला घोर लावलेले दोन्ही कैदी दरबारच्या मधोमध पेश घालण्यात आले. कैदी ताठ होते. आग्ऱ्याच्या कोठीतून तुरी देऊन सलामत सुटलेला सेवाचा बच्चा संभा, त्याच्या बम्मन एखत्यारासह तख्ता-कुलाहात सामने बघताच, आपले सगे भाई दारा-शुकोह, मुराद, शुजा आणि अब्बाजान शहाजहान यांच्या मौतीची खबर ऐकतानाही फुटल्या नव्हत्या एवढ्या आनंदाच्या उकळ्या बुढ्या औरंगच्या काळजात उसळून उठल्या. कधी भुलून वा चुकूनही तो दरबारी रिवाज मोडत आला नव्हता. पण आज नकळतच तो त्याच्याकडून मोडला गेला! बसल्या आसनावरून तो ताडकन उठला. कैदी संभाजीराजे आणि कुलेश यांच्या गर्दनी एवढ्या घेरावातसुद्धा ताठ खड्याच होत्या. झाली! आज या क्षणाला आग्ऱ्यातल्या दरबारानंतर प्रथमच मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि दिल्ली तख्ताचा शहेनशाह मुहम्मद औरंगजेब यांची इतकी वर्षे कुचमलेली ‘नजरभेट’ झाली! जसे अंगपूत पेटलेल्या ज्योतीला वादळ बघत होते! चिवट जीवनशक्तीला सर्वग्रासी मौत बघत होती! माणसातल्या मर्दपणाला राजकारणातले गाळीव कपट न्याहाळत होते! काफरी जिंदादिलीला तख्तनशीन बेरहम, शाही मगरुरी पारखत होती! घरेलू नाचीज मामल्याचा विचार एरव्ही कधी औरंगच्या मनात येणे शक्य नव्हते, पण या क्षणी मात्र एक चमत्कारिक खयाल त्याच्या मनाला धडक देऊ लागला. ‘कैसे पैदा करते है, परवरदिगार ऐसे बेडर सूरमा शख्स काफरों के कोखमें? नहीं तो हमारा कमअस्सल बगावतखोर बच्चा। क्या नाम भी रख्खा हमने उसका शाही शोहरतसे – बडे आब्बाजान की याद जगाने – अकब्बर!!’ रानावनांत बरेच दिवस राहिलेल्या बच्चाला राजवाड्यातील गमती खेळणे बऱ्याच दिवसांनी मिळावे तसाच आनंद बुढ्ढा असूनही शहेनशाहला झाला. वरवर तो धीमा, शांत दिसत होता, पण आतून खुशीची अनावर कारंजी उसळ्या घेत होती त्याच्या काळजात. त्यातला एक लब्जही कुणालाही बोलावा अशा हैसियतीचे कोणीही दिसत नव्हते, त्याला दरबारात! झाली खुशी कुठेतरी बाहेर ओतून टाकण्यासाठी बेचैन झालेला शहेनशाहा हिंदोस्थान सिंहासनासमोरच्या रुजामेदार पायऱ्या शांतपणे उतरून आज पहिल्याने दरबारी मसनदीच्या चक्क गालिच्यावर आला! क्षणभर त्याने दरबारभर नजर फिरवली आणि मक्केकडे तोंड करून, अस्मानाकडे बघत त्याने पायीच्या गालिच्यावरच खुशीच्या नमाजासाठी गुडघे टेकले!!! कुराणे शरीफच्या आदेशाप्रमाणे तो रोजचे पाच वेळांचे नमाज स्वारीशिकारीतही न चुकता पढत आला होता. तो नमाज पढत असताना कुणाचीच काय; वझीर असदखानाचीही शामत होत नव्हती, आत जाण्याची! आणि – आणि आज मात्र खचाखच भरल्या दरबारात नेक इस्लामचा मन:पूर्वक नमाज पढताना त्याचे डोळे आनंदाच्या अश्रूंनी भरून आले! हातच्या तसबीहच्या माळेवर ते थबकले. त्याचाच दरबार ते ताज्जुबीने बघू लागला. त्यातल्या कैकांनी तर मागून ‘गुस्ताखी’ची आफत नको म्हणून आपोआप गुडघे टेकले! दरबाराबरोबर छत्रपती संभाजीराजेही तो नजारा बघत होते. एवढ्या जीवघेण्या विटंबनेनंतरही त्यांच्यातला, कवी भूषणाची कदर करणाऱ्या आबासाहेबांचा वारसा सांगणारा, ‘बुधभूषणम्’चा रचनाकार काव्यप्रेमी, मराठमोळा, जातिवंत राजा उफाळून आला. छंदोगामात्य कवी कुलेशांच्याकडे रोखून बघत भरला दरबार थरकून जाईल अशा संथ; पण ठणठणीत राजबोलीत ते म्हणाले, ‘‘एवढी चर्चा केलीत आमच्याशी काव्याची हयातभर छंदोगामात्य! करून दावा या औरंगला बघताना आत्ता काय वाटतं त्याचं काव्य! या क्षणी! हाती कलम नाही असं न म्हणता!’’ निघाल्या धिंडीने पुरते घायाळ झालेले कवी कुलेश त्या नुसत्या शब्दांनीच ढवळून निघाले. झटकन गर्दन वर घेत राजांच्या कपाळीच्या फिसकटल्या शिवगंधाकडे बघतच राहिले. प्रत्यक्ष औरंगच्या सेवेला खिदमतगार रुजू होणार नाहीत, अशा तत्परतेने शारदेचे मानकरी कनोजी शब्द त्यांच्यासमोर हात जोडत रुजू झाले. आपोआप त्यांच्या ओठांतून ते त्वेषाने बाहेर प्रकटले – ‘‘जो आग्या – सुनिए – राजन हो तुम साँचे खूब लडे तुम जंग! तुव तप तेज निहारके तखत त्यजत औरंग!!” त्या दोघांच्यापासून दूर असल्याने औरंगला ते ऐकू येणे शक्य नव्हते. दरबार मात्र ते ऐकून चळवळला. जागजागेंतून कुजबुज उठली, ‘‘इन्शाल्ला सच तो है! क्या बकता है कुत्ता, काट दो जबान हरामजादेकी... असली शायर है... क्या मिसाल है शायरी!... सबूर – आस्ते... जबान काट जायेगी... इसी दरबार में!’’ दरबारी कुजबुजीची दखलही न घेता नमाज पढून उठत बादशाहा मुकर्रबला म्हणाला, ‘‘ले जाव इनको कोठीमें! हटाव सामनेसे!’’ औरंगच्या एकाच वाक्यावर दरबारी खसखस खाटकन थांबली! उतरला तसा औरंग संथपणे पुन्हा पायऱ्या चढून दरबारातून निघूनही गेला. दरबार उलगला. साखळबंद कैदी कोठीकडे नेले जाऊ लागले. त्या खतरनाक आणि आजवर हैराण केलेल्या कैद्यांना बहादूरगडासारख्या शाही ठाण्याच्या कोठीत ठेवणेही औरंगजेबाला काही मानवले नाही. त्याच्या हुकमानेच दुसऱ्याच दिवशी, दरबारी पेश करण्यापूर्वी निघाली होती, तशाच धिंडीने, तशाच वेशात दोन्ही कैदी कोरेगाव जवळच्या तुळापूर ठाण्यालगतच्या वढू बुद्रुकात बंदोबस्ताने आणण्यात आले. अकलूजहून हललेला औरंगचा साठ हजार फौजीतळ बहादूरगड धरून, कोरेगाव, तुळापूर, वढू भागात राहुट्या टाकून दाटून पडला होता. इथेच होता संतश्रेष्ठ ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या तोंडून स्फुरलेले संतबोल ऐकून पुलकित झालेल्या इंद्रायणी आणि भीमा यांचा पावन संगम! या संगम काठालाच मावळतीचा पुढा धरून दोन भक्कम खांब रोवण्यात आले होते. हशमांच्या कड्यातून आणलेले दोन्हीही कैदी उंटांवरून खेचूनच पायउतार करण्यात आले. तख्ता-कुलाह आणि साखळदंडांत अगोदरच जखडलेल्या त्यांना मुकर्रब-इखलासच्या देखरेखीखाली, त्या खांबांना मनगटासारख्या दोरखंडांनी पुन्हा जाम जखडण्यात आले! कंठांतल्या तख्ता-कुलाहांनी त्यांचे हात पंखांसारखे पसरतेच होते. संगमेश्वरातून निघाल्यापासून कुठलाही अन्नाचा कण दोघांच्याही घशांआड गेला नव्हता. चेहरे ओढले होते त्याने त्यांचे, पण डोळे मात्र शरीराच्या वेदनांचे कडे फोडून अपार शांत आणि तेजवंत दिसत होते. त्यांची मनेच जशी उतरली होती, त्यांच्या फक्त डोळ्यांत! आवश्यकता नव्हती तरीही जाड पात्याच्या नंग्या तेगी हातांत घेऊन मुकर्रब आणि इखलास, सरदार आणि हमिदुद्दीन कैद्यांभोवती पहारेकऱ्यांवर देखरेख करीत इकडे-तिकडे फिरत होते. एकाच भयाने. कुणी सांगावे. भुतांसारखे अचानक उपटणारे मरहट्टे आलेच आणि घडू नये ते घडलेच, तर याच खांबांना खुद्द आपणालाच जखडण्याचा हुक्म होईल हजरतांचा याची खातरजमा होती म्हणून! एकसारखे बहादूरगडाच्या रोखाने बघत ते कुणाचीतरी वाट बघत होते. आणि कैद्यांभोवती हजारो हत्यारबंद हशमांत खळबळ माजली : ‘‘आ गये! आ गये!’’ बहादूरगडाच्या रोखाने धुळीचा लोळ उठवीत, शे-पाचशे पठाणांचे एक पथक आले. हाताच्या इशारतीनेच पाठच्या दौडत्या पथकाला रोखत बक्षी रुहुल्लाखान पायउतार झाला. त्याचा मालक आलमगीर गाझीनेच त्याला खलबतात घेऊन, कानमंत्र देऊन पिटाळला होता. भोवतीच्या कुणाकडेही ढुंकूनसुद्धा न बघता खांद्यावरच्या खिल्लतीआड दडलेल्या हत्याराच्या मुठीवर हाताची भक्कम मूठ आवळत, तरातर चालत थेट राजे आणि कुलेश यांच्या समोरच तो आला. त्याला बघून लाचार अदबीने पुढे होत मुकर्रब म्हणाला, “क्या हुक्म है आलमपन्हाका काफर कैदियोंके फैसलेमें?’’ “चूऽप’’ मुकर्रबच्या पायांपासून डोक्यापर्यंत बेफिकिरीच्या नफरतीने बघत रुहुल्ला त्याच्यावर उखडला. कितीही झाले तरी मुकर्रब ‘दख्खनी’ होता. रुहुल्ला औरंगचा नेक, उत्तर हिंदुस्थानी ‘शिवा’ सरदार होता. खास कामावर नामजादी केल्यानेच तो हिरव्याकंच खिल्लतीत आला होता. खांद्याला जखडल्या छत्रपतींच्या समोर उभा ठाकत, कमरेवर हात ठेवून डोळे राजांच्या डोळ्यांत मगरुरीनं घुसवीत त्याने जाब केला, ‘‘खैर चाहते हो सुबेदार, तो ठीक सोचके जवाब दो। आलमपन्हा चाहते है तुम्हारा बयान, मौका है खुदाके खैरका आखरी – किस किल्लेमे रखा है तुमने अपना शाही खजाना?” त्याने ‘सुभेदार’ असा केलेला उल्लेख राजांना आज पहिल्या प्रथमच ऐकायला मिळत होता. “हंऽऽ’’ मानेवरचा रानटोळ झटकावा तसा रुहुल्लाचा सवालच राजांनी मानेबरोबर झटकला. ‘‘हम पूछते है, कहां है तुम्हारा खजाना?” राजांची डोक्यावरची उंच माटाची, लाकडी विदूषकी टोपी खानाने गदगदा हालवली. जळत्या नजरेने खानाकडे बघताना राजांच्या नाकपुड्या संतापाने कशा फुलून उठल्या. जखडलेले छातवान अनावर संतापाने वरखाली झपापले. आतल्या आत खूप विचारांती त्यांनी साजेसा निवाडा आपल्याशीच घेतला होता. काही – काहीही न बोलण्याचा! ‘‘बोलो, कौन-कौन थे फितूर तुम्हें शाही फौजसे? कौन-कौन भेजते थे खतवाले हशम तुम्हें?” हट्टाला पेटलेला रुहुल्ला राजांचा मुखडा डावा-उजवा गदगदा हलवून टाकत, भोवतीचे हशम अंगभर चरकावेत असा कडाडला. आपल्या स्वामींशी चाललेली ती बेमुर्वती बघून कुलेश खोड्यातच तळमळते हलले. खोडा फोडण्यासाठी निष्फळ धडधड धडपडले. ‘‘बोलो, गुँगे हो गये क्या काफर? मामूली चीज है। बताओ और जान बचाओ अपनी नादान।’’ राजे खानाकडे नुसते रोखून बघत होते. कुठल्याही धमकीने वा गोडीगुलाबीने आणि सोबतच्या कविकुलेशांखेरीज कुणीही काही विचारल्याची दखल घेण्याच्या पार पलीकडे गेले होते ते. ते बोलते व्हावे म्हणून, ‘‘खजाना कहाँ है? फितूर कौन थे।’’ हेच सवाल आलटून-पालटून विचारून, कैक प्रकारांनी जंग-जंग पछाडून रुहुल्लाखान शेवटी थकला. त्याच्या कपाळावर उन्हाच्या तिरिपीने आणि एकसारख्या कंठशोष ओरडण्याने घामाचे थारोळे साचले. ते तर्जनीने निपटून टाकत शिवीच हासडावी तसे तो वैतागून म्हणाला, “नहीं जानता – मानता आलमपन्हाके गुनाहका नतिजा कुत्ते। भोग ले अपले गुँगेपनकी अब सजा – मौत!’’ जंग-जंग पछाडले रुहुल्लाने राजांना बोलते करण्यासाठी, पण ब्रदेखील नाही बाहेर पडला त्यांच्या ओठांतून. त्याच ढंगाने कुलेशांना चाचपून बघताना तर खानाने आपला हमेशाचा ‘तुकडा फेकी’चा मन्सबीचा दाणागोटा बाहेर काढत चुचकारून छंदोगामात्यांना विचारले, ‘‘ये मरनेवालाही है अपनी मौतसे – होशियार शख्स हो तुम। बता दो कहाँ है इसका, सल्तनतके बऱ्हाणपूर-औरंगाबादके लूटका छिपाया खजाना? कौन-कौन थे शामिल इसको शाही फौजके गद्दार कुत्ते? मरातबसे मालामाल कर देंगे शहेनशाह तुमको मन्सब बक्ष करके! बताओ। डरो नहीं अब इसको। बताओ।” गळ्यातला तख्ता-कुलाह, डुईची लाकडी टोपी डावी-उजवी झटकती हलवून खानाला त्यांनी इमानी चाकरीचा जसा खणखणीत सबकच दिला – “खाऽन, मौका मिलता तो हमही पूछते यही सवाल तुमको! सारे हिंदोस्ताँका खजाना हजम किया है, तुम्हारे शहेनशाहने! मन्सबके टुकडे फेंक कर खरीदा नही जाता कभी कवीका इमान। कुत्ते हो तुम, खंदेकी खिल्लत पहेनकर नाजसे हमारे स्वामीकी गर्दन हिलानेवाले बेमुर्वत!!” “खामोऽश, लईम काफर।’’ अंगावर सापाचे वेटोळे पडावे तसा खान आक्रोशून उठला. झपकन पुढे होत त्याने मराठी दौलतीच्या कुलएखत्यार, छंदोगामात्यांच्या गालफडावर सणकावती थप्पड दिली. त्याच्या भिवया वाकड्या-तिकड्या झाल्या होत्या. दाढीचे केस रोधता न येणाऱ्या घुश्शाने दाभणासारखे ताठरले होते. आपल्या लाकडी खोड्यातूनच ते बघताना राजे कुडीभर उफाळले. त्यांना जखडून टाकणारा खांबच हिंदकळला मुळापासून त्यांच्या ताकदवर धडपडीने! फोडला! आता मात्र राजकुलाच्या बालपणापासूनच्या संस्कारांनी कटाक्षानं मनोमन करकचून बांधून टाकलेला मौनाचा बंधारा राजांनी फोडला. शब्दांचा अनिवार आतषखाना त्यांच्या तोंडून रुहुल्ला, मुकर्रब, इखलास यांच्यासह हरएक हशमाच्या काळजाची, मुहर्रमची खाई पेटवावी, तसा खाई पेटवीत बेलाग तडतडू लागला – ‘‘सांग तुझ्या मालिक ‘सुभेदारा’स खाऽन! मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही पायांत! जन्मदात्या बापास कैद करून, त्यानंच बांधल्या लालकिल्ल्यात त्यास डांबून – तबिबाकडून जहराचं मालीश त्याच्या बुढ्ढ्या अंगाला फासणारं नाही भोसल्यांचं खानदान! भावांच्या पाठीत, तख्ताच्या हवसेनं खंजीर खुपसणारी नाही आमची भावकी!” “खामोऽश। पाबन्द रख्खो जबान!” थरथर कापणारा रुहुल्ला ओरडला. ‘‘काट दो इसकी गर्दनऽ! इसको पैरके नीचे दो हाथीके! खाने डालो कुत्तोंको इसका मगरूर गोश्त!’’ चारी बाजूने जळजळीत आरोळ्यांचा एकमेकांत मिसळता कालवा उसळला. तरीही बेडर-बेभान झालेले राजे बोलतच राहिले – क्रमशः 🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
👍 😢 2

Comments