
Yuti's Hub Library
June 15, 2025 at 11:12 AM
*छावा*
*लेखक - शिवाजी सावंत*
*भाग-६७*
🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
‘‘अरे, खाल्लंच आमचं गोश्त कुत्र्यांनी तर त्यांची औलादही निपजेल इमानदार! सांग तुझ्या मगरूर मालिकला खान – जी भावांची केलीस, जन्म दिल्या बापाची केलीस, हयातभर इमानी चाकरी केलेल्या मिर्झा राजाची, दिलेरची केलीस; त्याहून काय करणार दुसरी हालत तू आमची? तैय्यार आहोत आम्ही मन बांधून त्यासाठी या क्षणाला!! ध्यानी ठेव म्हणावं त्याला – आम्ही गेलो तरी सुखासुखी नाही पडणार हा मुलूख त्याच्या घशात इदल, कुत्बशाहीसारखा! इथला उंबरा अन् उंबरा करील पैदा लहानथोर सेवा-संबा!!!”
राजे आपल्या आका अलीची नालस्ती काही रोकत नाहीत, हे बघून रुहुल्ला झटक्यात तिरीमिरीने पुढेच झाला. त्यांचे तोंडच बंद करावे म्हणून आपल्या पंजाने त्याने राजांचे दोन्ही ओठ एकाजागी घट्ट करण्यासाठी सांडशीपकडच घालायचा प्रयत्न केला. गर्दन झटकून ती उडवून लावत राजे शेवटचे पण वर्मी असे सर्वांना ऐकू जाईलसे ओरडले – ‘‘आम्हास मारून कधीच सुटणार नाही तुझा पापी हजरत सलामत! ज्या दिल्लीच्या तख्तासाठी तो रचतो आहे, एवढे पापांचे डोंगर – त्याच्या आसपासही मिळणार नाही कबरीसाठीसुद्धा वावभर जागा त्यास!! शिराचं नाव ‘भंडारा’ ठेवून, तोच तळहातावर घेतलेले आमचे जानकुर्बान मावळे – निघालाच परतायला तो उत्तरेकडं, तर खोदतील त्याचीच कबर याच मावळमातीत! बताव उसको – ठोकरसे फेंक दिये है, हमने उसके सब सवाल!! जाऽव!” तरीही राजे उभ्या कुडीभर राजसंतापाने अनावर थरथरू लागले. उभ्या आभाळाने ताकद एकवटून ढाळण्यासाठी जबरी तडाखा दिला तरी न चळता सूर्याचा तापगोल बिंबभर थरारेलच थरारेल तसेच राजे दिसले!! भोवतीच्या बघ्यांना क्षणात चाटून गेलं की, घुश्शात असले तरी आलमपन्हा आका अली ‘असे’ कधीच दिसले नाहीत!
असले काहीच आणि कधीच ऐकण्याची आदन नसलेल्या रुहुल्लाच्या अंगाचा कसा तिळपापड झाला नुसता! “चूऽप मनहूस कुत्तेऽ” ओरडताना नरड्याच्या धमन्या तटतटून फुगल्याच खानाच्या. झेपावत त्याने ज्या कानशिलांवर धाराऊ आणि थोरल्या आऊंची बोटे ‘आलबला’ घेत फिरली होती, त्याच कानशिलावर जबरदस्त थपडेचा खडखडता आवाज काढला!! खान घुश्शाने बेभान झाला होता. अशा काही जळजळीत नजरेने राजांनी खानाच्या हाताकडे बघितले की, त्या नुसत्या नजरेनेच त्याने आपला झणझणता हात पिरगळा बसावा, तसा मागे घेतला. पेटत्या आगीतून काढावा तसा! भोवतीचे हशम तर थरकून उठले होते. खोड्यात तळमळत्या कुलेशांनी असह्य संतापाने तळमळून-तडफडून गर्दन खाली टाकली.
भुईवर पचकन थुंकत नेमल्या कामगिरीत पुरता नाकामयाब झालेला खान स्वत:शीच पुटपुटला, ‘‘मर जायेंगे दोनों भी नाबकार काफर लोंडे कुत्तोंकी मौत। मुराद, दारा की नहीं वो हालत करेंगे पाक इस्लामके असली बंदे आका अली हरामजादोंकी! बू मिट जायेगी काफरोंकी दुनियासे।”
दणदण पाय आपटत, जनावरावर झेप टाकून आपल्या पथकासह खान रुहुल्ला बादशहाला कैद्याची बदतमिजी सांगायला निघूनही गेला. राजांनी उच्चारले शब्द जसेच्या तसे आपल्या हसरतच्या कानी घालण्याची त्याची शामतच नव्हती. दौडतानाच तो विचार करू लागला, ते शब्द सुमार करून दरबारी रिवाजात कसे काय पेश घालावेत!
सांजावत आल्याने आता मावळकडेवर तापदेवाचा रसरशीत गोळा दिवभरापेक्षा मोठा दिसू लागला. त्याच्या आवतीभोवती लाल, गुलाबी, केसरी यज्ञकुंडच जसे पेटले होते. मनात आणले तरी कधीही तो तेजोगोल खुद्द आभाळालाही दस्त करता येणार नाही, ह्या एकाच विचाराने जखडबंद राजे स्वत:ला हरवून एकटक त्याच्याकडेच बघू लागले. त्यांना याद आली. रायगडाच्या हिरकणी माचीवरून दिसणारा हाच तो सूर्यगोल. एकदा तर श्रीसखींच्याबरोबर माचीवर उभे असताना त्यांनी विचारले होते, ‘‘काय वाटतं समोरचा सूर्यनारायण बघताना तुम्हास?’’
क्षणभरच थांबून त्या पटकन म्हणाल्या होत्या, ‘‘माचीच्या या उंचवट्यावरून तो घरचाच वाटतो – आबासाहेबांगत!”
आबासाहेब! केवढा भाग्यवंत, यशवंत आत्मा! रायगडी काळ होताना भोवतीच्यांना ते म्हणाले होते, ‘‘ये तो मृत्युलोक – येथे जितुके आले तितुके गेले.” – कशासाठी येतात माणसे – आणि जातात काय उभवून? का पेटतो तुमच्या आणि समर्थांच्या आठवणीने जिवाचा पोत उजळून? का वाटत नाही तुम्ही गेल्यागत?
हिरकणीमाचीवरून फरशीच्या आकाराचे रूप घेत डुंबताना दिसणारे बिंब, आता खांबाला जखडल्या राजांना कोरीगत सपाट दिसू लागले. हाताच्या तख्ता- कुलाहाचे भानच नव्हते त्यांना. डाव्या हातच्या कुलेशांना म्हणून ते म्हणाले, ‘‘डुबतीला चाललाय आभाळाचा स्वामी. रिवाज द्या, त्यास छंदोगामात्य!” छातीशी नेण्यासाठी त्यांनी आपला हात खेचला. तख्ता-कुलाहच्या लाकडी कड्याला तो खटकन कचला. सणकारती कळच हाताकडून उमटून मस्तकात भिनली त्यांच्या. त्या वेदनेची वाटली नाही, एवढी एकाच बाबीची खंत त्या भोसलाई कुलवंतांच्या मनाला पिळवटून गेली, ‘आम्हाला मुजऱ्याचा रिवाज देण्यासाठी किती अदबशीर हात आजवर लवत हालले. पण-पण आज खुद्द आमचा हात मात्र आमचाच राहिला नाही. साक्षात सूर्यनारायणास वंदन करण्यास!’ शरीरापेक्षा मनाच्या या कोंडीने डोळे मिटतेच घेतले त्यांनी. तरीही हालता हालेना त्यांच्या डोळ्यांसमोरून लालीलाल झालेले ते आकाशस्वामी तेजोबिंब. राज्याभिषेकाच्या वेळी कानांवर पडलेले ब्रह्मबोल घुमू लागले – ‘‘शिसोदिया वंशज सूर्याेकुलोत्पन्न – क्षत्रिय कुलावतंस -’’
आता तळभरच्या सांजनौबती दुडदुडु लागल्या. खानसाम्यांनी तांब्याची, कल्हईदार, थोराड भगुणी रसोईसाठी चुलाणांवर चढवली. कसायांनी काटलेले बैल-बोकड जागजागी त्यांवर रटरटू लागले. त्याचा एक तिखट, उग्र वास तळभर पसरला. आता सारा तळ रात्रीचा नमाज पढून, भरघेराच्या मोठमोठ्या परातीसारख्या थाळ्यांतून, पाच-पाच दहा-दहांच्या मेळाने खाना रिचवणार होता. उपाशी आतड्यांनी आणि जागत्या डोळ्यांनी त्या साठ हजारांच्या तळावर फक्त दोनच जीव भुईवरच्या लाकडी खोड्यांत असूनही त्यात नसल्यागत आपापल्या कुलदेवता जगदंबा आणि चंडीची प्रार्थना करणार हाते... छत्रपती आणि छंदोगामात्य!!
जागजागी शिलगलेल्या पलोत्यांच्या आगझपेटी वाऱ्यावर वेड्यावाकड्या फरफरू लागल्या. उतरती सांज थरथरू लागली!
आता बहादूरगड सोडून खुद्द औरंगजेबच कोरेगावच्या तळावर येऊन शाही शामियान्यात ठाण झाला. दिल्ली सोडतानाच त्याची पहिली मुराद होती ती ‘सेवाची’ मराठशाही इस्लामची बंदी करण्याची. त्यासाठीच सलामीचा पहिला फौजी रेटा देऊन बघितला होता, त्याने या पहाडी मुलखाला. नाकामयाबीने हात चोळत चार सालांपूर्वीच त्याला फौजी ‘पिछाट’ घ्यावी लागली होती, सेवाच्या बच्चासमोर. आज तोच ‘संभा’ कैदी म्हणून दस्त झाला होता, त्याच्या पंजात. हालहाल करून त्याचा काटा काढताच त्याच्या या पहाडी मुलखातले दुबळेपतले, अर्धेनंगे हशम हातच्या माळेत सहज गुंडाळून टाकणार होता तो. आपल्या शामियान्यात मात्र आता तो विचित्र खयालात गुरफटला होता. त्याला आपला बच्चा अकबर आणि दिलेरचा मिरबातखान यांचा संभालाच शामिल होण्याचा मतलब कळत नव्हता.
संभाने दिल्या बेमुर्वतखोर जाबांची नोंद त्याने घेतलीच होती. फितवेखोरीने ठिकठिकाणचे मराठे सरदार त्याने केव्हाच मुठीत टाकले होते. राहून-राहून त्याला एकच विचार छळत होता : ‘देहली छोडके आये बडे मुरादसे। बुढापा आया नजदीक। होगी हमारी ख्वाईश पुरी? कांजीवरम से काबूल इस्लामका बंद करनेकी?’
वढूच्या तळावरून मुकर्रबखानाकडून रोज त्याला हरकाऱ्यांकडून खबरा येत होत्या – ‘‘कैदी कुछ बोलते नहीं – कुछ खाते नहीं।”
बादशहाबरोबर त्याच्या सेवेसाठी आलेली त्याची मुलगी झीनतुन्निसा रोज अब्बाजानबरोबर खान्याचे कटोरे, त्याच्यासमोरच त्यातील पदार्थ चाखून, त्यात काही ‘जहरी ऐब’ नाही याची खातरजमा त्याला करून देत होती! मगच खान्याचे थाळे मांडीत होती. अशाच एक खान्याच्या वेळी मुकर्रबकडून खबऱ्या आला –
‘‘जिद्दी काफरोंने अबतक कुछ नहीं खाया.”
रोज मसालेदार मोगली पदार्थांचे शाही थाळे राजांसमोर आणि सिरकुर्म्याचे गोडे थाळे कवी कुलेशांसमोर नेऊन त्यांची भूक चाळवण्याच्या प्रयत्नात मुकर्रब-इखलास पुरते नाकामयाब झाले होते. कैदी दस्त करताना जो जोश मुकर्रबखानात होता त्याचीच जागा आता भयशंकेने घेतली होती – ‘‘ऐसेही मर गया काफर तो?”
कैदी काही खात नाहीत, ही मुकर्रबची खबर ऐकून बेचैन औरंगजेब आपल्या थाळ्यापासून उठून फेर घेऊ लागला. मांडल्या अन्नावर माश्या बसू नयेत म्हणून त्यावर पितळी झाकणे झीनतुन्निसा तत्परतेने ठेवू लागली. ते बघून जागीच थबकला. चमत्कारिक असा स्वत:शीच हसला. आपल्या पदार्थ चाखण्यात काही गफलत झाली काय? अब्बाजानना काही शक आला काय? याने भांबावलेली झीनत मोठ्या धाडसाने म्हणाली, ‘‘हँस पडे अब्बाजान? शक है कोई?”
खदखदून हसत औरंगजेब तिला म्हणाला, “मक्खियाँ बैठती है थालेपर इसलिये तूने डाल दिये ढक्कन उनपर। बेटी, कभी-कभी इन्सानके दिलपर भी बैठती है मक्खियाँ! क्या लाओगी उसके लिये ढक्कन? एक भाई है तुम्हारा अकबर, जो घूमता है गाँव-गाँव तख्त के लिए, अनाज के लिए! और एक है ये सेवाका बच्चा संबा जो हाथ तक नहीं लगाता थालेको।’’ स्तिमित झाल्या आपल्या मुलीकडे बघतानाच त्याने हुक्म दिला, ‘‘ले जाव ये खाना। हम नहीं चाहते।”
वजीर असदखानाला याद फर्मावून बादशहाने हुक्म दिला, ‘‘हम – खुद हम देखना चाहते है कैदी संबाको!! जाव। इंतजाम करो।” औरंगच्या हयातीतली ही पहिलीच वेळ होती की, तोहून एका कैद्याला बघायला राजी झाला होता!
कैदी खांबांना जखडून आता तीन दिवस झाले होते. एकाही शाही सवालाचा दोघांनीही बादशाहाच्या मनाजोगा जाब काही दिला नव्हता. दोघेही उपाशी होते. कोणीतरी अल्लाचा रहमदिल बंदा मिन्नत करकरून त्यांना फक्त पाणी प्यायला लावत होता. जाताना आपलेच डोळे टिपत कैद्यांना ऐकू जाईनासे, पण मनोमन वाटणारे म्हणूनच स्वत:शीच पुटपुटत होता – ‘‘कैसी जिद्द पैदा की है, अल्लातालाने इनमें! हत्यार होते हाथ में तो खुदही काट देते ये अपनी गर्दन! क्या तकदीर है एक एककी! परवरदिगार, इन्हे अच्छे खयाल दो.’’
रुहुल्लाकडून कैद्यांच्या गुंगेपणाची हकिगत ऐकलेल्या बादशाहाने आपल्या मुल्लामौलवींची तातडीची मजालस भरवली. आपल्या मनचा फैसला मग तो कुणाच्याही बाबत असो, तो नेहमीच मुल्लामौलवींच्या तोंडून वदवून घेत असे. असे तो नेहमीच करीत आला होता. म्हणजे आपल्या फैसल्यावर तो इस्लामी धर्माचे शिक्कामोर्तब नेहमी करवून घेई. या कैद्यांबाबत त्याने तेच केले. ‘‘शाही शहर लूटने, जलानेवाले, मुसलमानों की बेरहम कत्ल करनेवाले, मसजिद तसनस करनेवाले, बगावतखोर को कुराने शरीफसे सजा कौनसी? तो सजाये मौत!” असा दस्तुर केलेला लेखी फैसला मौलवींच्या मजलसीनं बादशहाच्या हातात ठेवला.
आला! आपल्या शाही शामियान्यातून बाहेर पडलेला हिंदोस्थानचा शहेनशाह औरंगजेब आपल्या सजल्या हत्तीच्या, चांदीच्या हौद्यात बसून, सोनेरी छताखालची, आपली भुईतळसुद्धा शोधणारी नजर भोवतीच्या सरंजामावर गरागरा फिरवीत शेवटी आला. पाठच्या हत्तींवर बादशाहाचे शहजादे आणि नातू अशा सवाऱ्या होत्या. एक हत्तीवर तर झीनतसह शाही जनानाही बसला होता. आग्रादरबारात बगावतखोर ‘सेवा’ला बघण्याचे नव्हते, एवढे कुतूहल आज त्याचा बच्चा कैद ‘संबा’ बघायला साऱ्यांच्या मनात दाटले होते. आस्ते कदम चालणाऱ्या कैक खानांतील अनेकांच्या मनात – अलमगिराच्या या कैदी बघण्याच्या निवाड्याचं ‘ताज्जुब’ फिरत होते.
बादशाहा औरंगजेबाची सवारी बुद्रुक वढूच्या ठाण्यावर आली! माहुतांनी अंकुश-टोच देऊन हत्ती बसते केले. तळावर आगवानी मरातब कानठाळ्या बसविणाऱ्या तोफा फुटल्या. बादशहा शहजादे, नातवांसह भुईउतार झाला.
ही चमत्कारिक भेट होती. दिल्ली तख्ताचा अधिकारी असलेल्या, डामडौलात आलेल्या औरंगजेबाची आणि रायगडाच्या सिंहासनाचे अधिकारी असलेल्या, गेली आठ वर्षे चारी आघाड्या सांभाळण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या कैद संभाजीराजांची! तुळापूरच्या वढू बुद्रुकच्या इंद्रायणी-भीमाच्या संगमी माळरानावर! पुरा तळ गर्दीने दाटला असून तरीही चिडीचाप असताना.
शहेनशाह जखडबंद कैद्यांच्या रोखाने निघाला.
चांगले दहा हातांचे सुरक्षित अंतर ठेवून, हत्यारबंद पहाऱ्यातला औरंगजेब, वजीर असदखान, रुहुल्लाखान, मुकर्रबखान, इखलासखान यांच्या घेरात, खांबाला जखडबंद, ताठ गर्दनीच्या कैदी संभाजीराजांसमोर खडा ठाकला!! जखडबंद राजांना पायांपासून न्याहाळत, काळजात प्रचंड खळबळ माजलेली त्याची शाही नजर राजांच्या डोळ्यांवर येऊन खिळली. घालमेल-घालमेल झाली नुसती त्याची. काळजाचा देठच हलला गेल्याचे आज पहिल्यानेच त्याला जाणवून गेले, ‘इतने हुए बच्चे पैदा हमारे। तैमूरका ये खानदान। एक भी नाबकार की आँखे क्यों नहीं देखी हमने ऐसी! आफताबसे रिश्ता बतानेवाली!’
एकदा रुहुल्ला आणि असदकडे बघत खुद्द औरंगनेच राजांना जाब केला, ‘‘बताओ, कहाँ है तुम्हारा लूटमारका खजाना? कौन-कौन थे गद्दार, बगावतखोर फितूर तुम्हे हमारा नमक खा कर?” पायीच्या मोजड्यांकडे बघावे, एवढ्या नफरतीने आणि फक्त नफरतीनेच आपले सूर्यपेट डोळे औरंगजेबाच्या डोळ्यात रोखून राजे एकटक नुसतेच त्याच्याकडे तिरस्कारानं बघत राहिले. ती नजर नव्हतीच! बघणाऱ्यांचे काळीजच पोखरून टाकील अशी, कुणालाही जाणवावी अशी डोंगरटोकावर बसलेल्या गरुड पक्ष्याची तीक्ष्ण चोचच होती ती!! ती नजर आणि पापण्यांचा काठ फोडून टाकत उतू जाणारी नफरतच, एवढा काळीजकठोर औरंगजेब, पण त्यालाही स्पष्ट जाणवली. गर्दन वर करून बघणाऱ्या माणसाची त्याला कधीच सवय नव्हती. सर्वच त्याच्यासमोर येत, ते ‘कदमबर’ नजर ठेवूनच! आणि अशा फेकून देणाऱ्या नफरतीच्या नजरेची तर नव्हतीच नव्हती.
त्या अटीतटीच्या कुचमलेल्या क्षणांनी मनोमन थरकलेला रुहुल्लाखान पुढे होऊन कमरेत लवत, हातचा राखीव उपाय आपल्या आलमपन्हांना सुचवीत दबक्या आवाजात म्हणाला, ‘‘रहम कर दो आका अली। अभी बन जायेगा ये मगरूर, इस्लामका बंदा। कौडीमोल – बादमें बतायेगा सब अपने आप।” मराठी मुलखात आपण केलेल्या फितवेखोरीच्या इमानदार चाकरीचे पाठबळ मानून हजरत हा सल्ला मानतील असा पागल भरोसा होता त्याला.
“चूऽप! बिलकूल बेवकूफ हो तुम बक्षी!” नाचवावी तशी नाचणाऱ्या कठपुतळी बाहुलीकडे टाकावी, तशी कीव करणारी एक जळजळीत नजर बादशाहाने बक्षी रुहुल्लाखानावर टाकली. राजावर रोखली नजर जराही न चाळवता तो म्हणाला, ‘‘जरा गौरसे देखो एक दफा उसकी आँखें। अरे, अपने बापके साथ पेश आया था आग्रादरबारमें, तो कितनी मासूम थी ये आँखे! ये अपनायेगा इस्लाम? बनेगा बंदा? पढेगा कभी नमाज? भूल है तुम्हारी। देखो तो कैसे घुरके देखता है नफरतसे! आँखे नहीं ये – जलती मशालें है मशालें! इसको बंदा बनाना अस्तनीमें अंगार रखना है!!
“दऽख्खनीऽ, निकाल दो... निकाल दो ये बेमुर्वत आँखें! जलती सलाख घुमाओ इसकी आँखोंमें! दे दो इस मगरूर काफरको नयी नजर!!” रुहुल्लाकडे ढुंकूनसुद्धा न बघता, दख्खनी इखलासला शहेनशाहचा क्षणात आखरी हुक्मही सुटला.
हयातभर हिंदोस्थानात वणवण भटकलेले मोगली, शाही बुढेपण अंगभर थरारले. लाकडी खोड्यातले मावळी तरुणपण ते ऐकताच आपले उभे शरीर भुईवर फेकून देत डोळ्यांतच एकवटले. तोफेचे भांडे फुटावे, तशी राजांची भोसलाई जबान तडतडली – “अरेऽ! तुला दिसतात, खुपतात तसे दोनच नाहीत आमचे डोळे. आमचे शेकडो, हजारो मावळे आमचे डोळेच झालेत! हिंदोस्थानचा शहेनशाह असलास, तरी काढू शकतोस ते सांडसी वापरून? काऽढ – पळाचाही वखत न गमावता आमचे हे डोळेच पहिल्याने काढून टाक. तुझी शक्लसुद्धा बघायची इच्छा नाही आम्हास! गेलीच तर आमची एकल्याची नजर जाईल, पण मिळालीच, तर मिळेल त्यानंच नवी नजर आमच्या घरट्याघरट्यांतील जान कुर्बान मावळ्यांना!!” त्या ‘बकवासी’कडे लक्षही द्यायची गरज न वाटलेला औरंगजेब क्षणभरच कैदी कुलेशांच्या बाजूने दोन कदम सरकला. त्यांनाही निरखले त्याने खालवर. एवढ्या घालमेलीतही निसटती चुटपुट त्याला चाटून गेलीच, ‘इसी तख्ता-कुलाहमें जखडबंद होता बागी शहजादा अकबर तो? क्या खैर होती अल्लाहकी!’
कुलंगी कुत्र्यागत मागून चालणाऱ्या इखलासला, कुलेशांकडे बघतच त्यांच्या बाबतही तसाच निवाड्याचा हुक्म त्याने क्षणात दिला, ‘‘कर दो हर सजाका अमल पहले इस बम्मन शायरपर! सुनेंगे हम, कैसे देखती है काफर सेवाकी खुदको ‘शेरदिल’ माननेवाली औलाद अपने शायरकी तिलमिलाहट!’’
‘‘जी हुजूर,” दोन्ही कैद्यांच्या सजा ऐकून हबकलेले मुकर्रब-इखलास एकदमच कमरेत लवत म्हणाले.
सफेद, कोरीव दाढी फिरलेली गर्दन बादशाहाने झटकली. कुत्तेमोल काफर कैद्यांसाठी आपण जादा वख्त खराब केला, हे जाणवल्याने तो जायलाही वळला. त्याच्या किमॉशातले हिरवेकंच पाचूपदक आणि मोतीलग उन्हात कशी झगझगत तळपून उठली.
आता तो पुन्हा कधी, कधीच नजरेससुद्धा पडणार नाही, म्हणून राजे कसे अंगभर उकळून गेले. तडफडाट... तडफडाट झालेल्या राजांच्या तोंडून बळीच्या बोकडाचीही झाली नसेल, अशी राजा असूनही झालेल्या आपल्या विटंबनेचा बदला घेणारी, त्याच्याच सरंजामासमोर त्याला ठोकरून लावणारी एक सणसणीत शिवीच तोंडातून सुटली, “सुळवऽरकी औलादऽ! शेरके बच्चे शेर जैसे जीते है, मरते है तो भी शेर जैसे!”
असला कुठलाच नापाक शब्द कधीही ऐकण्याची कधीच सवय नसलेला औरंगजेब, उभ्या देही संतापाने कसा थरथर कापू लागला. एका मामुली कैद्याने हिंदोस्थानच्या शहेनशाहला चक्क तोंडावर ‘सुव्वर’ म्हणावे! तेही शहजादे, वजीर, सरदार, प्यादे यांच्या सामने!! आत मुडपलेले त्याचे पाताळयंत्री पातळ ओठ शाही घुश्शाने थरथर कापू लागले, तटतटून फुगलेली मस्तकावरची शीर धडधडू लागली. देहाबरोबरच त्याच्या ऐटदार शाही रोबावरची नकसदार, झगमगती कलाबतूही लटलट कापू लागली. हातची तसबीहची माळ गोळा होऊन गपकन मिटल्या मुठीत कोंडून पडली. अंगभर तैमुरी रक्त कसे धडका देत उकळले. टोकदार नाकशेंडा आणि मांसल कानपाळ्या सरसरत लालेलाल झाल्या. कुठलाही कठोर हुक्म देताना हयातभर त्याच्या संथ, धिम्या जबानीने त्याला कधीच दगा दिला नव्हता; आज मात्र दिला – ऐकताना त्याचाच वजीर असदखानही लटलट कापावाच असा, आजवर कुणालाच न दिलेला हुक्म देत तो कडाडला –
“इखलाऽस दख्खनीऽ, आँखे निकालनेसे पहले ये – ये बेगुमान, मगरूर जबान कटा दो जडसे! फेंक दो कुत्तोंके सामने!!!”
“हंऽ, बेवकूब औरंग, मरत नाहीत जबान काटून कुणाचेही बोल कधीच!” आपल्या सुकल्या राजओठांवरून जीभ फिरवत, अगदी शांत निर्धारी बोल राजांच्या तोंडून सुटले.
कुणाचीही दखल न घेता औरंग तरातर चालत हत्तीवरच्या हौद्यात जाऊनही बसला. बुद्रुक वढूच्या माथ्यावरचा, माध्यान्हीचा सूर्य जळत्या किरणांनी ठिबकू लागला. वढूची काळीशार भुई त्याने तावून-सुलाखून निघू लागली!!
हजरतांची मुरादच होती, डोळे जाळण्यापूर्वी जबान छाटली जावी. त्यासाठी इखलासने जल्लादी पथकातून न कचरणारे नेटाक जल्लाद, त्यांच्या उघड्याबंब केसाळ छाताडांवर मुठीचे भक्कम कुमके मारून निवडले. बाजूला घेऊन, ते डरू-कचरू नयेत, म्हणून त्यांना प्रथम तांब्या-तांब्याभर हबसाणी कडक शराब पाजण्यात आली.
इखलासने तळावरच्या लोहारमेटाचे फौजी लोहार, पेटत्या शेगड्या आणि सांडशींसह बोलावून घेतले. हातभर लांबीच्या दोन-दोन लोखंडी सळया लोहारी भात्यावर पेटलेल्या, शेगडीसारख्या लोखंडी चुल्ह्यांत लोहारांनी तावणीला टाकल्या. धरणाऱ्यांचे हात पोळू नयेत, म्हणून त्या कापडी बासनांच्या घट्ट मुठीत गुंडाळल्या होत्या. काही जल्लादांनी कैद्यांच्या जिभा जबड्यातून बाहेर खेचण्यासाठी हातात सांडशी घेतल्या. काहींनी त्यांच्या जिभा छाटण्यासाठी खांद्यांना टेकून धारदार नंग्या तेगी पेलल्या. हुकमाची वाट बघत ते सारे शिस्त धरून एका बगलेला खडे झाले.
आलमपन्हांचा हुक्म होता – ‘‘आँखे निकालनेसे पहले जबान काट दो। हर सजाका अमल पहले शायरपर करो। बादमें संबापर!”
प्रत्येक संजेचा अंमल पहिल्याने कवी कुलेशांवर करण्याचा हुक्म देण्यात काय मतलब होता औरंगजेबाचा? तर आपल्या प्याऱ्या शायराचे सजा भोगताना होणारे हालहाल बघून राजांचा दिल कचावा, मनोधैर्य ढळावे त्यांचे. फाटूनच जावे त्यांचे काळीज. हताश होत हात पसरून कोणत्याही अटीवर भीकच मागावी त्यांनी जान बचावण्याची. ते नाहीच झाले, तर किमान चाकराचे हाल बघताना त्यांना दिलतोड यातना तरी व्हाव्यात.
कमरेला फक्त तुमानी आवळलेल्या उघड्याबंब आणि घामात निथळणाऱ्या, हातात सांडशी आणि नंग्या तेगी पेललेल्या, पाच-दहा काळ्याकभिन्न उलट्या जाड ओठांच्या हबशी जल्लादांचा मेळ घेऊन इखलास कुलेशांच्या समोर आला!
आतापर्यंत सजेची बातमी पुऱ्या तळभर सरकली होती.
जखडबंद कैद्यांची सजा बघून डोळे निववावेत म्हणून फौजी स्त्री-पुरुष सारेच खचाखच दाटले. टाचा वर करून एकमेकांच्या खांद्यावरून कधी बघितले नव्हते, अशा सजेचा नजारा ते बघू लागले. एवढा तळ एकवटला होता खांबाभोवतीने, पण डुईवरून उडणाऱ्या रानभोरड्यांची भरभरसुद्धा साफ ऐकू यावी, एवढी शांतताच शांतता पसरली होती.
‘‘मूँऽखोलो शायरके बच्चे!” कुलेशांचा मुखडा हातपकडीत धरून इखलासने तो डावा-उजवा हासडला. त्याची बकबक ऐकूच न आल्यासारखे कुलेश शांतच होते.
हा हुक्म फर्मावणारा इखलास किती मूर्ख होता! आपली जीभ छाटण्यासाठी आपला जबडा कोण आणि कसा काय देणार खोलून!
एकटक रोखून बघणाऱ्या कुलेशांचा शांतपणा बघून तर इखलास पिसाळूनच गेला. पुढे होत त्यांचा जबडा फाकण्यासाठी ताकद लावून दोन्ही हातांनी झटू लागला. कुलेश काही नुसते शायर नव्हते. स्वारीशिकारीत तावून-सुलाखून निघालेले सूरमे लढवय्ये होते; ते. खूप खटपट करूनही एकल्या इखलासला काही त्यांचा जबडा फाकविणे साधेना. दातकुडी बसल्यागत जाम आवळूनच धरला होता, त्यांनी आपला जबडा! त्या जबड्याशी झटून घामाघूम झालेला इखलास शेवटी वैतागून, संतापून उठला. कुलेशांच्या गालावर संतापी थप्पड देत ओरडला, ‘‘पकड बैठी क्या मूँह को तेरे सुव्वर?”
आपल्या जल्लादांकडे बघत हात उठवून तो चरफडत कडाडला, ‘‘सब मिलके खोलो ये जबडा. खींचो बाहर इसकी जबान!” चार-पाच हबशी जल्लाद चटकन पुढे झाले. त्यांनी मराठी दौलतीचे छंदोगामात्य कवी कुलेश यांचा मुखडा आपल्या बळकट पंजानी, चारी बाजूंनी जागीच दाबून धरला.
आता – आता जाणारच आपली जबान म्हणून सगळा जीव जिभेतच एकवटून आणलेले कुलेश आरोळी फोडत मोठ्याने ओरडले, “प्रणाऽम स्वामीऽ मामूली कानोजी शायरका, भाग्यवान है हम कि आज – आज आपके साथ पंक्तिमें बैठनेका मौका तो मिला – मौतकी पंक्तिमें!! जै भवानीऽ जै चंडीऽ!” जल्लादांनी कुलेशांची बडबडणारी जीभ तोंडात सांडस खुपसून जाम पकडली. एका झटक्यात, ताकदीने खसकन जबड्याबाहेर खेचली. त्या कळीने ती कविजीभ सांडशीतच लवलव हलली. हाती तळपती तेग घेऊन उभ्या असलेल्या एका जल्लादाकडे मुकर्रबने इशारती नजर टाकताच जल्लादने कुलेशांच्या जिभेवर एवढा जबर वार उतरवला की, जिभेचा कंडका पाडून, दोन-तीन दात तोडीत, खालचा ओठ आणि हनुवटी चिरत तो उतरला. एक चीत्कारी हंबरडा फुटला. भोवतीच्या बेहोश जल्लोषांत तो मुरूनही मेला. अंगावरचा तख्ता-कुलाह चिंब भिजवून टाकणारा रक्तचिळकांडीचा फव्वाराच फव्वारा उडाला कुलेशांच्या चिरफाळल्या तोंडातून! त्यांच्या कपाळीचा, आतापर्यंत नावापुरताच उरला कनोजी पद्धतीचा गंधटिळा त्या फव्वाऱ्याने दिसेनासाही झाला. अंगचा विदूषकी पेहराव ओघळत्या रक्ताने चिंब भिजला.
आपल्या खोड्यातून राजांनी, रक्तधारांत न्हाऊन निघालेल्या कुलेशांच्या चेहऱ्याकडे बघितले. आपल्या बाळराजांनाच घालावी तशी केवढीतरी हळुवार साद त्यांनी कुलेशांना घातली – ‘‘कविराज!’’
तुटल्या जीभगड्ड्यातून असह्य वेदनांचा आगडोंब उसळला असताही आपले डोळे उघडून छंदोगामात्य कुलेशांनी आपल्या स्वामींकडे शांतपणे डोळाभर बघितले.
भोवतीच्या जमावाच्या कल्लोळत्या आरोळ्यांनी इखलास तर आता पुरता बेभान झाला होता. कुलेशांच्या जबड्याचा अनुभव घेतल्याने आपणहून त्याने शहाणपणाने राजांच्या जबड्याला काही हातही लावला नाही! सजेचा अंमल करणाऱ्या जल्लादांवर मात्र तो खेकसला, ‘‘डर गये कमजोर, डरपोक? खोल दो ये भी जबडा! काट डालो काफरकी हजरतको गाली देनेवाली मनहूस जबान!”
हुकमांचे ताबेदार पाच-सात जल्लाद पुढे सरसावले. जुंपली! जखडबंद राजांचा जबडा खोलण्यासाठी खुल्या पाच-सात हबशी जल्लादांची राजांशी झोंबाझोंबी जुंपली. काही केल्या त्यांच्या पंजात आपला जबडाच देत नव्हते राजे.
‘‘वो था शायर, उसने कितना सताया! ये तो है शेर, कभी नहीं मानेगा, सब मिलके पूरी ताकदसे चिपको इसको!” मुकर्रब-इखलास ओरओरडून आपल्या जल्लादांना चेतना देऊ लागले. बघ्यातलेच चार-पाच आपणहून जल्लादांच्या मदतीला धावले
ठेवला! राजांचा मुखडा काळ्याकभिन्न केसाळ दहा-वीस हातांनी, तसूभरही हलवता येणार नाही, असा जागीच दाबून ठेवला. काळ्याशार नांगीदार विंचवांनी शिवपिंड पुरती झाकाळली! राजांचा जबडा कनशिलाजवळ दोन्ही बाजूंनी एवढ्या जोरात दाबला की, तिथल्या जोडहाडांच्या अनावर कळीसमके, रायगडाच्या महाद्वाराचे दोनही दरवाजे खुलावेत, तसा भोसलाई राजजबडा आपोआप खुलला.
ज्या ओठांआड जगदीश्वराचे तीर्थ आणि जिजाऊ, धाराऊ, येसूबाई, पुतळाबाई यांच्या हातून पडलेल्या दह्याच्या कवड्या गेल्या होत्या, त्याच ओठांआड जल्लाद हबशाने लोखंडी सांडस ताकदीने खुपसली.
आनंदाच्या आणि दु:खाच्या दोन्ही क्षणी, कुलदेवतेचे स्मरण करणारी “जगदंबऽ जगदंबऽ’’ अशी नांदी उठविणारी, क्षत्रियकुलावतंस, श्रीमन्महाराज, हिंदुपदपादशहा, गोब्राह्मणप्रतिपालक संभाजीराजे यांची जीभ सांडशीत घट्ट धरण्यात आली.
“लाऽइलाऽह’’ अशी बघ्या हशमांच्या पाठकण्यात सुरसुरी उठवणारी गर्जना फोडून, विस्फारता येतील तेवढे हबशी डोळे विस्फारून हत्यारी जल्लादाने हातच्या तेगीचा ताकदवर वार, सांडशीत पकडलेल्या, बाहेर खेचलेल्या राजांच्या अंजिरी जिभेवर उतरवला. रक्ताची फवारती कारंजीच उडाली.
“धीऽऽन धीऽऽन’’ कानठळ्या बसविणारा, बघ्यांच्या कल्लोळी, कालव्यांच्या आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडला. सांडशीत पकडलेल्या ‘बेगुमान मगरूर’ जिभेचा वळवळता तुकडा जल्लादाने त्यावर पचकन थुंकून ‘‘खाने दो कुत्तोंको -” म्हणत सांडशीसह बढू बुद्रुकाच्या तापल्या धुळीत फेकून दिला!
ज्या देहावर अभिषेकसमयी देशभरच्या पवित्र नद्यांच्या जलाचा वर्षाव मंत्रघोषात झाला होता, त्याच देहावर त्याच्याच रक्ताच्या चिळकांड्या उतरल्या. वेदनांचा एवढा आगडोंब उठला त्यांच्या जीभगड्ड्यातून, पण बेभान होत एक साधा हुंकारसुद्धा फुटला नाही त्यांच्या ओठांबाहेर! ओठ दातांखाली घट्ट दाबून, गच्च मिटल्या डोळ्यांनी आवरता येत नव्हते, म्हणूनच त्यांनी जीभगड्ड्यातले ओघळते रक्त ओघळू दिले! काही वेळाने शांतपणे डोळे उघडले. समोरच्या धुळीत आपलीच पडलेली वळवळती जीभ बघताना मात्र काळीज गलबलून उठले त्यांचे – फक्त एकाच विचाराने –
‘आजवर कधीच नाही पडला भुईवर, याच जिभेतून बाहेर पडलेला आमचा सादिल शब्दसुद्धा! पण – पण आज ती जीभच पडली आहे भुईवर! शांत होण्यापूर्वी वळवळून ती आम्हासच म्हणते आहे – “धनीऽ, द्या एखादा साजेसा हुकूम – या क्षणीही पाळीन तो!’’’ त्या विचाराने तर राजे देहातीत होऊन आपल्याच जिभेकडे एकटक बघताना पुरते हेलावले. खळबळ-खळबळ माजली त्यांच्या काळजाच्या खोलवटात –
राजे आणि कुलेश रक्तमाखल्या तोंडांनी एकमेकांकडे बघत होते. आता ते दोन जीव नव्हतेच. मावळबोलीतल्या एकाच ‘राजकाव्या’चे दोन दिसले तरी एकाच मतलबाचे अर्थपूर्ण सर्ग झाले होते! छत्रपती आणि छंदोगामात्य ही दोन वाटणारी त्यांची रूपे, त्यांच्या जीभगड्ड्यातून अंगभर ओघळून एकमेकांत मिळू-मिसळून गेलेल्या रक्तओघांनी त्यांच्या पायतळी एकरूप केली होती. अंगच्या वाहिल्या रक्ताने लालेलाल – मनोमन एकरूप! असताच आबासाहेबांचा प्यारा ‘कवी भूषण’ हे बघायला आता तर रचूनही टाकला असता त्याने ‘शिवराजभूषण’सारखा काव्यग्रंथ – ‘कवी-राज-भूषण ’ असा!
सजेचा पहिला हप्ता संपला होता. तुटल्या जिभांच्या गड्ड्यांतून दोन्हीही कैद्यांना मरणप्राय यातना होत होत्या. त्या यातनांची नव्हती एवढी खंत दोघांनाही एकाच गोष्टीची वाटत असावी, बागलाणपासून तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठी दौलतीच्या बाबीने, यापुढे औरंग कुठल्या चालीने जाईल? पण या तर्काने मनात उठणारे विचार त्यांना एकमेकांशी बोलण्याचे साधनच आता उरले नव्हते. कुलेशांना राजांना मनसुब्याचे म्हणून म्हणायचे होते, ‘‘इससे जादा जलकोट उठाने चाहिये, फिरंगी- मुघल मिलनेसे पहले – हो सकता है, स्वामीपर हथियार उठानेवाले शिर्के औरंगकीही मदद लेकर खुद महारानीको भी नहीं देंगे चैनकी नींद!!” पण – पण काहीच न बोलता आल्याने नरड्याची नुसती घाटीच हलत राहिली त्यांच्या. व्याकूळ, व्याकूळ झाले होते, त्यांचे डोळे, फक्त त्याच कुचंबणेने!
राजांचे मन तर पिंजऱ्यात कोंडलेल्या गरुडपक्ष्यासारखे नरड्याच्या घाटीला धडकाच धडका देऊ लागले. त्यांनाही कुलेशांना सांगायचे होते – ‘‘हंबीरराव, म्हलोजीबाबा तर जिवाचे सोने करून गेलेच! कंककाका तर वयाने झालेत. आमच्या चौतर्फा दौडणाऱ्या फौजफळ्यांना जाणता निवाडा देणारे आता सरलष्कर कोण? आमचे रूपाजी, मानाजी, विठोजी की संताजी-धनाजी? केवढी गफलत होईल आमच्या श्रीसखींनी आमच्या ठायी बाळराजांनाच मानून चालविले तर? औरंगच्या रेटयाला जाब देईल, असे निघतील धडाडीचे आमचे रामराजे? आणि होईल काय आमच्या मागं खुद्द आमच्या श्रीसखींचं??”
खुल्दाबादेच्या कोठीतील दुर्गाबाईंच्या आठवणीने तर गलबलून गेले त्यांचे आतडे.
आता सूर्य कलतीकडे झुकला होता. कणाकणाने मोठा होत होता.
कैद्यांची जबान काटण्यात घामेघूम झालेले जल्लादी पथक इखलासने – “जाऽव आराम फर्माओऽ’’ म्हणत हटवले. दुसरे तवाने जल्लादी पथक, दुसऱ्या सजेच्या अमलासाठी पुढे घेतले. हातघाईच्या जंगात मैदानावर हालत नव्हता एवढ्या तडफेने आज इखलास हालत होता. खातर होती त्याला, पुरी केली तर एवढी बिकट खिदमत वाया जाणार नव्हती. त्याचे मालिक हजरत नोंद घेणारच होते त्याची.
बघ्यांना तर बागी कैद्यांचे डोळे काढण्याची सजा बघून आपले डोळे शांत करून घेण्याची एवढी उतावीळ झाली होती की, हुकमाची संधी मिळती, तर त्यांनीच पुढे होत मनची मुराद झटक्यात पुरीही करून घेतली असती!
पुढे घेतल्या तवान्या पथकातील दोन तगडे हबशी निवडून इखलासने बाजूला घेतले. आपणच वाकून लोहारी चुल्ह्यातल्या, एव्हाना तापून लालेलाल झालेल्या लोखंडी सलाखा, त्यांच्या कातडी मुठींना धरत इखलासने चुल्ह्याबाहेर खेचल्या. निवडल्या हबशी जल्लादांच्याच डोळ्यांत त्या खुपसल्यासारख्या नेऊन खुद्द तेच कचदिल नाहीत, याची अजब पारख करून घेतली त्याने! निवडलेले हबशी हात, पाय, डोळे होते म्हणूनच माणूस म्हणायचे, नाहीतर – गंजल्या लोखंडी पुतळ्यासारखेच दिसत होते ते! तसूभरही हलले नाहीत ते. त्यातल्या एकाच्या हातात आपल्या हातातील तापल्या सलाखा खुशीने देत, कुलेशांच्याकडे बघत इखलास त्याला म्हणाला, ‘‘घुसेड दो ये जलती सलाखें इस बम्मन शायरकी आँखोंमें। देखेगा इसका मालिक कैसी टपकती है शायरी, खून के बजाय अपने शायरकी आँखोंसें!!”
घोंघावते समुद्रवादळ, भक्कम खडकाळ बेटाकडे सरकले तसे ‘‘जी हुजूर’’ म्हणत हाती तापल्या सलाखा घेतलेला हबशी कुलेशांच्या समोर आला – त्यांचे डोळे जाळून काढण्यासाठी.
कुलेश तर कवी होते. इथला निसर्गाने नटलेला मावळी मुलूख त्यांनी डोळाभर बघितला होता. तो, उंचापुरा रायगड, आपला कबिला आणि सर्वांहून अधिक कनोज सोडून एवढ्या दूर ज्याच्यासाठी आलो, त्या स्वामींना पुन्हा बघण्यासाठी डोळेच उरणार नाहीत, या जाणिवेने रक्ताळल्या तोंडाच्या राजांना त्यांनी अगोदर डोळाभर बघून घेतले. जल्लाद जसजशा रसरशीत तापल्या, लालेलाल सलाखा डोळ्यांजवळ आणू लागला तसतशी कुलेश आपली गर्दन इकडे-तिकडे गरगरा फिरवू लागले. जल्लादाने त्यातूनही निकराने घुसडलेल्या हातच्या सलाखा कैद्याच्या गालावर, कानावर चरचरत भिडू लागल्या. तो जल्लादच चिडून ओरडला – ‘‘देखते क्या हो बेवकूब! जकड दो इसकी गर्दनका हिलता पत्ता!’’
तसे धक्का बसलेले हबशी लगबगीने पुढे झाले आणि त्यांनी कुलेशांचा मुखडा जागीच पकडून ठेवला. त्यांना धक्का अशासाठी बसला होता की, तख्ता-कुलाहातल्या जखडबंद कैद्याचे डोळे काढणाऱ्या त्या सराईत साथीदाराला आजवर अशी कुणाच्याच मदतीची गरज कधीही पडली नव्हती.
“चर्रर्रऽ चर्रर्रऽ” सुताराने शिसवी फाकांना भोके पाडण्यासाठी हातचे किकरे फिरवावे तशा, आपलेच डोळे विस्फारलेल्या जल्लादाने हातच्या लालेलाल लोखंडी, तप्त सलाखा कवी कुलेशांच्या डोळ्यांत खुपसून चराचर फिरविल्या. जळल्या बुबुळांच्या मांसाचा उग्रट वास चारीकडे पसरला. कुलेश कुडीभर धडपडले, ‘‘आ:ऽ आ:ऽ’’ जीभ गमावल्या त्यांच्या कंठातून कसनुसाच आवाज फुटला.
नाकात घुसल्या उग्र जळकट मांसाच्या वासाने आणि कानात शिरल्या त्यांच्या आवाजाने राजे गैरसमजात गेले. त्यांना वाटले मरणाच्या भयाने छंदोगामात्य चरफडून तळमळताहेत. अनावर झाल्याने खुद्द त्यांच्याच कंठातून तसेच कसनुसे शब्द सुटले – ‘‘अॉ:ऽ अॉ:ऽ!’’ त्यांना कुलेशांना निर्धाराने म्हणायचे होते – ‘‘दौलतीचे छंदोगामात्य असे केव्हापासून लागले मरणाला भ्यायला?”
खरे तर कुलेशांना म्हणायचे होते – ‘‘राजन हो तुम साँचे खूब लडे तुम जंग।”
जरी एकजीव झाले होते ते अंतरंगाने, तरी असा गैरमेळ पडला होता त्यांच्या विचारांचा – गमावल्या जबानीमुळे.
आता तर भोवतीचे बघे खुशीने पिसाळल्यागत टाळ्याच टाळ्या पिटत ओरडू लागले. ‘‘बहोत खूऽब! अल्ला मेहरबान! जल्दी करो भाद्दरऽ! निकालो इसकी भी आँखकी कौडियाँऽ!’’
सजेचा अंमल करणारा जल्लाद आता हातच्या जळकट रक्ताने काळपटलेल्या, तरीही तप्त सलाखांहून अंगभर पेटून उठला होता. वापरून नाकाम झाल्याशा वाटल्याने ‘‘बेकार हो गयी सलाखें ये” म्हणत तिरस्काराने त्याने हातच्या सलाखा थेट जीभ-डोळे काढलेल्या कुलेशांच्या अनवाणी पायांवर मुद्दाम फेकल्या.
मागे वळून दुसऱ्या चुल्ह्यातल्या तावणी खात पडलेल्या नव्या सलाखांची लालेलाल जोडी त्याने खसकन उचलली. लाल डोळे तिच्यावर गरगर फिरवीत बघ्यांना तिची लाली दिसावी म्हणून हात उंचावून ती ‘लाऽइलाह’ म्हणत नाचवली. त्याने ओरडण्यापूर्वीच त्याच्या चार-पाच मददगारांनी रायगडाधिप, मराठी दौलतीच्या, शिवपुत्र छत्रपती संभाजीराजांची गर्दन जल्लादाच्या सोयीसाठी चारीकडून जखडून केव्हाच जाम करून टाकली होती.
क्षणानंतर जळून होत्याचे नव्हते होणारे राजांचे डोळे अपार शांत, स्थिर होते. ते डोळे नव्हतेच! दोन तेजोगोलच होते ते. हयातीत कधी नव्हते, एवढे चमत्कारिक तेज उतरले होते त्यांत.
एरव्ही उलथा पडणारा खालचा ओठ आता दातांखाली घट्ट पकडून, हातच्या रसरशीत सलाखा रोखत जल्लाद राजांच्या समोर आला. डुईच्या केसांपासून तुमानीखालच्या पायांपर्यंत घामाने आज पुरता निथळला होता तो. हातच्या तापल्या सलाखा पेलून, द्याव्या लागणाऱ्या कठोर सजेच्या मानसिक उष्म्याने घामेघूम झाला होता तो.
अर्धवट-अर्धवट कदम पुढे टाकत तप्त लाल सलाखा पेलून क्षणाक्षणाला तो राजांच्या डोळ्यांकडे एकटक बघत पुढे-पुढे सरकू लागला.
आणि – आणि – काय झाले कुणास ठाऊक! हातच्या सलाखा तशाच पेलून तो जागीच पुतळ्यागत गुमान उभा राहिला. अपार तेज उतू जाणाऱ्या, राजांच्या निर्भय, तेजवंत पुष्करी डोळ्यांकडे बघताना त्याचे त्यालाच मनोमन जाणवले – ‘कितनी जला दी आँखे सलाखोंसे जिंदगीभर – मगर – मगर कभी देखी तक नहीं ऐसी आँखें! नहीं – नहीं – ये आँखें जलानेके लायक नहीं! जतानेके लायक है!’
एवढा पत्थरदिल तो जल्लाद! पण तोही स्वत:शीच चरकून, राजांकडे बघत मान डोलावून दोन कदम मागे हटला!! आणि खुद्द त्याच्याच पाठीत एक सणसणीत तमाचा पडला, भिजल्या पाठीवरून घामाचे तुषार उडाले. कानात इखलासचे करडे, जरबी शब्द घुसले – ‘‘नमकहराम! रुक क्यों गया? निकाऽल दो ये आँखे!”
ताबेदार जल्लाद त्या कळीसरसा स्वत:च्या काळजातला माणूस पायतळाशी टाकत पुन्हा पुढे सरसावला. राजांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांजवळ हातच्या धगधगीत लाल सलाखा नेताच त्याने कराव्या लागणाऱ्या कठोर ताबेदारीच्या दडपणामुळे आपलेच डोळे गपकन मिटून घेतले! त्या क्षणभरातच शंभूनेत्रांसमोर अष्टभुजांची कुलदेवी तुळजाभवानीच चमत्कारिक रूपात तरळून गेली. तिचा मुखडा होता थोरल्या आऊंसारखा, डुईवर मुकुटाऐवजी आबासाहेबांच्या राजटोपागत टोप होता, आठही हातांच्या जागी दिसत होत्या कबिल्यातल्या आकृती. सती गेल्या मासाहेब, श्रीसखी आणि होय – रामराजांच्या मासाहेबसुद्धा! त्या हातांच्या एक-एक बोटात बालपणी-मोठेपणी बघितलेले प्रतापराव, मालुसरेकाका, मुरारबाजी, कोंडाजी, कृष्णाजी कंक, हंबीरराव, म्हलोजीबाबा असे कैक मुखडे दिसून गेले. कानात कुठंतरी नांद्या, किलकाऱ्या घुमून गेल्या – “जयऽ जयऽ रघुवीर समर्थ! – उदं गं अंबे उदं! हरऽ हरऽ महाऽद्येव! या गोंधळासी माय अंबे लौकर यावे!!”
‘‘चर्रर्रऽ चर्रर्रऽ’’ हातच्या तप्त सलाखा समोरच्या कैद्यांच्या डोळ्यांत खुपसून, सवयीप्रमाणे त्या जागीच गरगर फिरवून, सलाखा तशाच डोळ्यांत ठेवून, मिटल्या डोळ्यांच्या जल्लादाने थकावटीने आपलेच गुडघे भुईवर टेकले.
बघ्यांनी बेभान होत हैदोसी गिल्ला घातला – ‘‘धीऽन धीऽऽन – छोड दो अब इसे, जायेगा ये औरंगाबाद, बऱ्हाणपूर तक!’’
याही स्थितीत राजांना एका गोष्टीची खंत जरूर वाटत होती – ‘का नाही ठोकले आलमगिराच्या कोणी इमानदार जल्लादाने आमच्या नाकात आणि कानात, तोफांच्या रंजुकांना ठोकतात तसे खिळे? म्हणजे आलाच नसता आमच्या आणि कवी कुलेशांच्या जळक्या मांसाचा एकमेकांत मिसळलेला वास आम्हास! आणि कानांवर पडलाही नसता बुजगावण्यांचा हा आनंदाने उकळणारा खिजवता कल्लोळ!’
आता राजे आणि कुलेश यांचे चेहरे एवढे भयाण दिसत होते की, औरंगजेबाच्या पोरउमरीच्या एखाद्या नातवंडाने त्यांना तसे बघितलेच असते, तर दातखीळच बसली असती त्याची! डुईवर उंच लाकडी टोप्या, गळ्याहातांना जखडणारे तख्ता- कुलाह, अंगावर ढगळ विदूषकी, रक्ताळलेले कपडे, कमरेला बांधलेल्या काटेरी वेली आणि जागजागी रक्तथेंब पडलेल्या घंटांच्या माळा, जळून गेलेल्या डोळ्यांच्या खोबणी, त्यांच्यातून उतरलेले जबानी काढल्याने ओठ आणि तोंडभर कुरळ्या दाट दाढीत मिसळलेले, साकळलेले रक्त! कसे दिसत होते ते? वळीव पावसाच्या मारगिरीत तडाखून निघालेल्या, मूळच्या अनेक रंगांत चितारलेल्या, रेखीव, देखण्या; पण क्षणात ओघळून फिसकटून गेलेल्या भित्तिचित्रांसारखे!
मावळतीच्या डोंगरकडांआड सूर्य डुबला होता. इंद्रायणी आणि भीमा यांचे एकमेकींत मिसळलेले संगमपाणी थरकत्या लाटा उठवीत वाहत होते.
तळावर सांजेच्या नमाजाची समज देणाऱ्या नौबती दुडदुडु लागल्या. थोड्याच वेळात तळभर नमाजी अजानच्या ललकाऱ्या उठू लागल्या – ‘‘अल्ला हु अकबरऽऽ”
राजे आणि कुलेश आता वेदनांसह देहाच्या पार झाले होते. राजांची तर कधी नव्हती, अशी मनाची मनाशी फक्त स्वत:शीच अशी बातचीत चालली होती. अंधारून आल्याने ठायी-ठायी तळभर पलोते शिलगले होते. त्याहून कितीतरी पलोते शिलगले होते, शंभूराजांच्या दुनियापार पोहोचलेल्या भोसलाई राजमनात.
रातपहाऱ्याचे गस्ते हशम, औरंगजेबाचाच हुकूम असल्याने तळपती हत्यारे पेलून जागजागी फेऱ्या घेताना गस्त देत होते – ‘‘होश्शियाऽर!’’
डोळे, जबान, हातपाय यांसह पुरत्या देहापार गेल्या राजांच्या मनात, खुद्द त्यांनाच अनोखी वाटावी अशा विचारांची प्रचंड धुंदळ माजली होती. स्वत:च बघत होते ते तिऱ्हाइतासारखे आपल्यालाच, आठवत होते त्या बालपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या, हयातीकडे.
सुरू झाली! राजांच्या मनात विचारच विचारांची अनावर कारंजी. उसळू लागले त्या कारंजांतून अस्मानी विचारांचे तजेलदार पाणीच पाणी! ते नेहमी मांड घेत आलेल्या ‘चंद्रावता’पेक्षा सफेद, आता डोळ्यांआड झालेल्या, पुन्हा कधीच न दिसणाऱ्या आकाशीच्या तेजबिंबाच्या रसासारखे, रायगडाच्या निशाणकाठीवर, मावळवाऱ्याने फडफडत्या जरीकाठी भगव्याच्या वाणाचे, आबासाहेबांच्या तोंडून वेळोवेळी बाहेर पडलेल्या; शिवबोलांचेच आसवाब ल्यालेले! समर्थांच्या तपस्वी कमंडलूतील ‘रामतीर्था’सारखे, थोरल्या आऊंच्या तोंडून वेळोवेळी सहजगत्या बाहेर पडणाऱ्या ‘जगदंब, जगदंब’ ह्या जगन्मातेच्या स्मरणासारखे, आपल्याच हयातीत हे ‘श्रीं’चे राज्य राखून चालविण्यासाठी मुलूखभर वेगवेगळ्या जागी देह ठेवलेल्या कोंडाजी फर्जंद, कृष्णाजी कंक, तुकोजी पालकर, निळो बल्लाळ, हंबीरराव, म्हलोजीबाबा यांच्या वाहून गेल्या रक्ताची आण सांगणारे!
आता त्यांच्या मनच्या डोळ्यांना दिसू लागला दौडीत डोळ्यांत भरलेला तिन्ही हंगामांतला मराठी मुलूख – रायगडावर उतरणाऱ्या त्या पावसाळी तिन्हीसांजा. तास फोडून उतू जाणारा कुशावर्ताचा आणि गंगासागराचा तलाव. पाणधारांखाली निथळणारे आघाडी मनोरे, जगदीश्वराचे राऊळ, बालेकिल्ला, व्यापारपेठ, मंत्रिबाडी, हिरकणीमाची, भवानीटोक, टकमकटोक, सातमहाल, सिंहासन चौक यांसह अभिषेकपात्रांतून संततधारेखाली निथळून निघणाऱ्या शिवपिंडीसारखा दिसणारा आमचा प्राणप्रिय रायगड! गडउतरंडीवर करवंदीच्या, रामेट्याच्या. अंजनीच्या गचपणात किरकिरणाऱ्या रातकिड्यांचे आणि गडटाक्यात एकलग घुमणाऱ्या बेडकांच्या जमेतींचे पाणधारांच्या सरसरीत एकरूप झालेले आवाज. एरवी पायथ्याशी स्पष्ट दिसणारा, थोरल्या आऊंचा, कोसळत्या पावसात धुरकटता दिसणारा पाचाडवाडा. पडत्या पावसाची तमा न बाळगता, गडभरच्या चौक्याचौक्यांवर कांबळी पांघरून जागल्यांच्या नजरेने गस्त देणारे मेटकरी. गडावरून चहूबाजूंनी पायथ्याशी कोसळताना अखंड घरघरणारे लहान-मोठे स्फटिकसाफ धबधबे. महापुराचे पाणी दुतर्फा फेकून देत नागिणींसारख्या सळसळत धावताना दिसणाऱ्या पायथ्याच्या काळ आणि गांधार नद्या.
हिवाळ्याच्या हंगामात मुलूखभराच्या गडकोटांना बिलगून बसलेले, दहीदाट गर्द धुके. चढत्या दिवसाबरोबर त्याच धुक्याचे तटबंदीच्या थंडगार दगडबंदीवर उठणारे दहिवराचे थरारते थेंब. गडागडांवरच्या नगारखान्यांच्या पायथ्याशी धुमसत धूरफेक करणाऱ्या, पेटत्या शेकोटीतील आंब्याच्या आणि बाभळीच्या लाकूडगाठी. पागेपागेत जनावरांच्या तोंडूनसुद्धा गारठ्याने फुटणारे फव्वारते वाफारे, उरफोडी धाव घेऊन मुलूखभरातून गोळा केलेल्या खबरा पेश ठेवताना गडथंडीने लटलट कापणारे, तरीही सावरत अदबशीर बोलणारे बहिर्जी, विश्वास, कर्माजी यांच्या पथकांचे खबरगीर, वऱ्हाड, खानदेश, कोकण, मराठवाडा, बागलाणपासून ते गोव्यापर्यंत आमच्या ‘चंद्रावता’च्या टापांवर टापा ठेवत दौडताना झोंबत्या, थंडगार मावळवाऱ्याने दातवाणे धडाधड आपटणारे आमचे शेकडो, हजारो घोडा व पावलोक. रायगडाच्या मुक्कामी असताना खुद्द श्रीसखींच्या हातून समोर येणारा हुलग्याच्या माडग्याचा वाफाळता गरम कटोरा!
उन्हतापीच्या हंगामात जागजागी गडपायथ्याशी शिवारांत, मृग तोंडावर आल्याने पालापाचोळा एकवटून मातीस तावणी देण्यासाठी कुणब्यांनी पेटविलेले रानतरवे. आंबा, वड, पिंपळ, चिंचेच्या घेरांखाली रवंथ करीत विसावलेली, तान्हेली, दमगीर गुरेढोरे. पन्नास कोसांची एकलग धावणी मागे टाकून आल्यावर, तळाच्या जागी पाणथळाकडे ओढ घेणारी, फेसाळती दमगीर घोडी. उन्हाने आणि पेटलेल्या भात्यांच्या धगीने घामाने निथळताना कपाळपट्टीवरची थेंबावळ तर्जनीने निचरून टाकून, हत्यारघडाई करणारे लोहार. फिरत्या चाकांवर त्या हत्यारांना ठिणग्याच ठिणग्यांची फिरती चक्रे उठवीत शिकल देणारे शिकलगार. पागे-पागेसमोर खूर जखडलेल्या घोड्यांच्या नख्या तासळून, त्यांना तोंडात खिळ्यांचे पुंजके आवळून मजबूत, तवाने नाल ठोकणारे नालबंद. मुलूखभरच्या रावळा-रावळांत दर्शनासाठी आमच्या मागून प्रवेशण्यापूर्वी पायीची पायताणं उतरून, धूळमाखले पाय साफ करण्यासाठी उंबरठाबाहेरच थपाथप पाय आपटणारे आमचे धारकरी.
माती! बालपणी माणसास दूध देणारी, उभारल्या, पुढच्या बांड आयुष्यात त्यास अन्न, पाणी भरविणारी, गोळ्याची मूरत रेखणारी ही माती! एक राजा म्हणून नव्हे, सेनापती म्हणून नव्हे, शिलेदार धारकरी म्हणून नव्हे, एक ‘माणूस’ म्हणून आमचे या मातीशी नाते काय? माणसाचे मातीशी नाते असते? होय. माणसाचे मातीशीच नाते असते – तसे ‘मातीत’ मरणारे कैक असतात. ‘मातीसाठी’ मरणारे फाऽर थोडे!! मिळेल आम्हास ते भाग्य या क्षणाने तरी?
“जगदंबऽ जगदंब’’ घशाला कोरड पडल्याने ते स्वत:शीच मनोमन पुटपुटले.
पाण्याच्या थेंबांऐवजी रक्ताचे थेंब उतरले त्यांच्या घोटल्या घशाआड.या वेळी नुकताच नमाज पढून आपल्या शाही शामियान्यात आलेल्या औरंगजेबाला इखलास सजेचा शब्दबर तपशील देत होता. कधी नव्हे ते, पायफेर घेताना औरंगची पावले बुढाप्यातही झपाझप पडत होती. त्याला बेचैन, सैरभैर बघताना इखलास तर पुरेपूर हबकून गेला होता. काही इतराजी झाली हजरतांची तर!
पण औरंग मात्र वेगळ्याच बेचैनीने पायफेर घेत होता – मध्येच थांबत होता. काही विचाराने शामियान्याच्या छताकडे मधूनच बघत होता.
‘‘कुछ नहीं चीखा-चिल्लाया काफर इतनी सख्त सजा लेकर भी?” स्वत:लाच विचारावे, तसे त्याने इखलासला विचारले.
‘‘जी, बिल्कुल नहीं.’’ द्यायचा म्हणून इखलासने लवत जाब दिला.
तो ऐकताना एकाच विचाराने हिंदोस्थानचा बादशहा हैराण, हैराण झाला. ‘इसी जगह होता हमारा बागी शहजादा अकबर तो? आती ऐसी सजाकी नौबत उसपर तो?’
जायच्या इजाजतीच्या हुकमाची वाट बघत इखलास तसाच ताटकळत उभा आहे, याचेही त्याला भान नव्हते. दक्षिणेतून निघून आग्ऱ्याला आपल्या बापाला कैद केल्यापासून राजस्थान, बंगाल, विजापूर, गोवळकोंडा आणि मराठी मुलूख तुडवीत वणवण भटकलेली आपली हयात, त्याला सताड उघड्या डोळ्यांसमोर सरकताना दिसू लागली. ‘हमारी एक भी औलाद होती, ‘संबा’ जैसी तो? डालते हम इतने बडे सल्तनतका बोझ भरोसेसे उसके कंधेपर। और – और गुजारते बुढापेकी ये जिंदगी तसल्लीसे, पैगंबरकी खिदमतमें।’ एवढा जवळ-जवळ पुरा हिंदोस्थान हुकमतीखाली येऊनसुद्धा काहीतरी नेमकेच गमावल्याच्या काळीजतोड, बेचैनीने तो स्वत:च हरवल्यागत झाला. इखलास समोर उभाच असलेला बघताच तो केवढ्यानेतरी ओरडला – ‘‘जाऽऽव!!’’
तळावर कुठेतरी कोंबड्याने बांग दिली. पाठोपाठ बांगांमागून बांगा सुरू झाल्या. आता राजे आणि कुलेशांना फक्त या कोंबड्यांच्या बांगांनी पहाट झाल्याचे, उन्हाच्या चटक्यांनी दिवस चढल्याचे आणि नमाजीसमजेसाठी अजॉंबरोबर झडणाऱ्या नौबतींच्या दुडदुडीमुळे केवळ अंदाजाने दिवसरात्रीचा प्रहर कळत होता. त्यांच्या आतड्यांतील ‘भूक’ आता अंगभरच्या वेदनांनीच शमवून टाकली होती!
तळावर फटफटले. उगवतीची उबदार किरणे येऊन राजांच्या अंगाला बिलगली. फाऽर फाऽर जाणवली त्यांना ती ऊब. त्यांच्या मनातून थोरल्या आऊंची, सती गेल्या मासाहेबांची, श्रीसखींची, धाराऊ, दुर्गाबाई, भवानीबाई यांची; पुरती कबिला याद करून देणारी सय उफाळली. त्यातच उफाळत्या आणखी दोन आठवणी तीव्रतेने गोदावरी आणि रामराजांच्या मासाहेब यांच्याही.
थोरल्या आऊ! कोण होत्या त्या? त्या होत्या शिवरात्रीची पहाट धरून साक्षात जगदंबेला पडलेल्या गोमट्या स्वप्नासारख्या! त्या स्वप्नानेच पाहिले होते आबासाहेबांच्या रूपाने एक रोकडे मर्दाना सत्य! असते थोरल्या आऊंचे आणि आमचे प्राणप्यारे आबासाहेब आमच्या जागी तर!! कसे, कसे वागते ते?
क्रमशः
🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠