
Yuti's Hub Library
June 15, 2025 at 11:16 AM
*अंतिम भाग*
*छावा*
*लेखक - शिवाजी सावंत*
*भाग-६८*
🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
कसलीतरी प्रचंड झरझर राजांच्या पाठकण्यातून सरसरत वर गेली. पोटात अन्नाचा कणही नव्हता तरी, चेहरा रक्तबंबाळ, तडतडता झाला होता तरी, आबासाहेबांच्या नुसत्या स्मरणानेच नागफण्यागत ताठ झाली त्यांची गर्दन. मनोमन माथाच भिडविला अगोदर त्यांनी, आबासाहेबांच्या पावन पायांना आणि पाचाडच्या छत्र्यांच्या पायऱ्यांना. आमच्या घरच्याच आणि भोवतीच्या कैक माणसांनी केली फितवेखोरी. बळ द्या आम्हास, आमच्या देहाच्या अवयवांनी आणि तुमच्या मायेखाली पोसल्या मनाने तरी देऊ नये आम्हास या निर्वाणीच्या क्षणी दगा!
आपल्या जन्मदात्या आऊसाहेबांचा चेहरा आठवण्याची खूप कोशिश केली त्यांनी. त्या जागी पुन:पुन्हा दिसू लागला त्यांना धाराऊचाच चेहरा. धाराऊ : कुणबी काळजाला मायेचे लिंपण घातलेला निकोप जीव. स्वत:च्या राया-अंतावर नाही, एवढी अमाप माया केली तिने आम्हावर. धाराऊ कोण आमच्या जिंदगीतली? ती थोरल्या आऊंच्या हाती जगदंबेने दिलेली भंडारापरडीच! कुणबाऊ निकोप मायेचा केवढा भंडारा उधळला तिने आमच्यावर!
ऐन आषाढी एकादशीच्या रोजी चितेच्या अग्नीचा घास घेऊनच आपला जीवनभरचा उपवास सोडणाऱ्या, आमच्या सती गेल्या मासाहेब! कुणी काय मन मानेल ते, मागून घेतले आबासाहेबांकडून. पण त्यांनी? काळ्या हौदावरच्या चितेवर अग्निरूप होताना आपल्यासमोर ठेवून घेतल्या त्या आबासाहेबांच्या फक्त मोजड्या. रायगडाने किती जीव देह ठेवताना पाहिले! पण पहिल्याने ‘सती’ जाण्याचा मान मिळविला तो त्यांनीच. काय वाटले असेल त्यांना आगझपेटीने देहाची कापूरराख होताना! आजही कानांत घुमतात त्यांचे, त्यांना चूड देताना त्यांनी काढलेले धैर्यशील अमर बोल – ‘‘कधी आलाच प्रसंग तर, आमचं हे रूप ध्यानी ठेवा. पुत्र आहात तुम्ही आमचे!”
त्या बोलांची याद होताच राजांचे मन कसे ढवळून-घुसळून निघाले. मासाहेब, मासाहेब तुमचे हे रूप आम्ही नुसते ध्यानीच ठेवले नाही, तर या क्षणी जगून दाखवतो आहोत ते. तुम्ही गेलात सती, गेल्या आबासाहेबांसाठी. आम्ही? आम्हीही सतीच जातो आहोत – पुरुषदेही – इथल्या मावळमातीचा टिळा मस्तकी लेवून!! तुम्हास रिवाजाचा चूड देण्यासाठी घरचे म्हणून आम्ही तरी होतो! इथे आमच्या भोवती आहेत, औरंगचे तुकडेलाचार बुणगे. तुम्ही नाही, निदान तुमची यादगीर म्हणून आम्हीच उठवले रायगडी तुमच्या नावे ‘सतीचं वृंदावन.’ आमच्या मागे राहील आमची याद आमच्या मुलखाला, आमच्या माणसांना?
का नाही वाटलात कधी तुम्ही परक्या? आणि का नाही वाटल्या रामराजांच्या मासाहेब कधीच घरच्या? खरेच, आम्ही आणि रामराजे तुमच्याच पोटी उपजतो तर केवढे मिटते सवाल आबासाहेबांचे आणि उभ्या दौलतीचे! का नाही वाटलो आम्ही रामराजांच्या मासाहेबांना घरचेच? दौलतीसाठी? मग फरक तो काय उरतो त्यांच्यात आणि औरंगजेबाचा बागी शहजादा अकबरात? कोण होत्या रामराजांच्या मासाहेब आमच्या जिंदगीत? विष घोटून क्षणात त्या होत्याच्या नव्हत्या झाल्या. असत्याच जर त्या आता आम्हास अशा बघायला हयात तर? खातरी आहे आमची, रामराजांना घेत आल्या होत्या तशाच पोटाशी घेतले असते त्यांनीसुद्धा, या क्षणी आम्हाला.
आमच्या जिंदगीचा सर्वांत चुकला-हुकला मनसुबा – आमच्या दुर्गाबाई! नाव तेवढे ‘दुर्गा’ ठेवले आम्ही, पण – पण दुर्गाऐवजी कोठीतच राहिल्या त्या हयातभर – आणि तेही साक्षात औरंगच्या.
समजू-उमजू केल्या कुठल्याच गोष्टीचा पश्चात्ताप नाही वाटला कधी आम्हास. रुखरुख तर चाटूनसुद्धा नाही गेली. पण दुर्गा – तुमची सय झाली की, पोखरून निघते उभे काळीज. छत्रपतींच्या राणी असून कोठडीत खितपलात तुम्ही आमच्या बच्चांसह आणि आमची पाठराखण करण्यासाठी माहेरपणाच्या निमित्ताने आलेल्या आमच्या राणूआक्का! कसले मिळाले माहेरपण त्यांना? आबासाहेबांच्या कन्या असून औरंगच्या कोठडीत बंद होण्याचे? तुमच्या सुटकेसाठी किती जंग केला आम्ही? आबासाहेब आणि आम्ही सुटलो आग्ऱ्याच्या विळख्यातून, पण तुम्हाला मात्र आम्हास सोडविता आले नाही. छे, छे! कसले हे आमचे जिणे? असेल – असेल – राजा म्हणजे उपभोगशून्य स्वामीसुद्धा असेल! पण – तुम्ही दोघी, थोरल्या आऊ, सती गेल्या मासाहेब, आमच्या श्रीसखी यांच्यासारख्या राजस्त्रिया म्हणजे कोण? खूप विचार केला तरी नाही मिळाला त्याचा जाब कधी आम्हास.
आणि – आणि लिंगाण्याच्या कड्यावरून देह झोकून दिलेली अश्राप गोदावरी! ती म्हणजे तर, कुठेतरी आभाळात तडकणाऱ्या विजेने दूरवरच्या भुईवर कोसळून, भेगाळावे तिचे अंतरंग, तसा आमच्या हयातीतला अदावती-सल. खुद्द आबासाहेबांनी बांधले तिच्यासाठी ‘सतीचं वृंदावन’ लिंगाण्याच्या पायथ्याशी. अण्णाजींना हत्तीच्या पायी दिल्याची कधीच खंत वाटली नाही आम्हास, पण हकनाक बळी गेलेल्या गोदावरीचा सल डोळ्यांत खुपून गेलेल्या सलाखीसारखा या क्षणीही सलतो काळजात. जाळत जातो तो काळजाचा ऐल-पैल तीर!
आणि आमच्या श्रीसखींचा चेहरा आठवला की, झगमगती चांदणवेलच डोळ्यांसमोर उभी राहते. आमच्या पत्नी एवढे नाते वगळले, तर उरल्यासुरल्या श्रीसखी आबासाहेबांच्या कन्याच शोभाव्या अशा! का कुणास ठाऊक, त्यांना आवतीभोवती बघताना नेहमीच याद होत राहिली, ती थोरल्या आऊंची. केवढ्या घोर यातनेत पडल्या असतील त्या या क्षणी? बोलताना त्या नेहमीच म्हणायच्या, ‘‘आम्ही आपलं बाशिंग बांधलं आहे रानवाऱ्याशी!’’
खरोखरच काय करतील – कशा वागतील त्या आम्हामागे? केवढी भाऊबीज घातली आहे, गणोजी-कान्होजींनी आपल्या पाठच्या भगिनीला? खुल्दाबादेच्या कोठीतील दुर्गांना याद करताना केवढी अपराधाची जाणीव होते! पण रायगडाच्या श्रीसखींना याद करताना मन ॠणाइताच्या भावनेने कसे शिगोशीग भरून येते. येसू, गांगोलीत तुम्हाला मासोळीच्या वाणाची अंगठी बाळराजांच्या बारशात नजर देताना आम्हाला काय कल्पना होती की, आमच्यामागे तुम्ही पाण्याबाहेरच्या मासोळीसारख्याच व्हाल!
‘‘हं:’’ कबिल्याच्या आठवणीच आठवणी अनावर झाल्याने त्यांनी मान झटकली.
समोर इंद्रायणी आणि भीमा एकमेकींच्या गळ्यात गळा घालून उन्हाला पीत, तळपत वाहतच होत्या. सूर्य आता तर ऐन माथ्यावर तळपू लागला!!
दूरवरून जवळ-जवळ येणाऱ्या घोडेपथकांच्या टापांची थडथड मोठी-मोठी होत जावी, तशी शंभूमनात आता अष्टप्रधान मंडळाच्या आणि औरंगबरोबर जागजागी झडलेल्या हातघाईत कामी आलेल्या कैक मर्दान्यांच्या आठवणी थडथडू लागल्या.
भ्रमात गेलेले, शेवटच्या क्षणी उशीखालून काढून भिकबाळीची आणि पेशवेपदाच्या शिक्के-मुद्रांची डबी पुत्र निळोपंतांच्या हाती देणारे मोरोपंत! कसे लागले कच्छपी ते अण्णाजींच्या आणि मासाहेबांच्या? कोण आणि कसा देणार त्याचा जाब? परक्याचे वतन कर्जापोटी आपल्या घशात घालण्याची घालमेल करणाऱ्या पहिल्या पेशव्यांना – शामराजांना पेशवेपदातून मुक्त करणारे आबासाहेब असते आमच्या ठायी, तर काय करते मोरोपंतांचे? कोण आणि कसे सांगणार ते? एवढेच कशाला? कुठल्या भिरमिटीने खुद्द आम्ही गेलो आपणहून दिलेरच्या गोटात, याचा काय जाब देणार आम्ही झालो तरी?? आमच्या जागी ते आणि त्यांच्या जागी आम्ही असतो, तर कसे वागतो आम्ही? का काही क्षणच असतात कुट्टकाळे प्रत्येक माणसाच्या जगत्या हयातीत? नाही तर गेले का, एवढ्या पल्ल्याचा विचार करणारे आबासाहेब प्रत्यक्ष औरंगच्या भेटीस आग्ऱ्यात? आणि पडते कशासाठी अडकून कैदकोठीत?
झाली नसेल कधी, आम्हाला आबासाहेबांची होते तशी आमच्या पेशवे निळोपंतांना त्यांच्या वडिलांची कधी याद? कधीच का केला नाही मोरोपंतांचा निसटतासुद्धा उल्लेख आमच्याशी बोलताना त्यांनी? की खांद्यावर जोखीम पडताच तोडूनच टाकावी लागतात माणसास नाळेची नाती? मोरोपंत, रायगडाच्या मंत्रिवाडीतील तुमच्या राहत्या वाड्यावर चौकीपहारे बसविताना काय वाटले आम्हास ते आमचे आम्हालाच ठाऊक! आपल्याच सही हाताने आपलाच डावा हात कलम करायची अशी नौबत औरंगवरही येऊ नये या पुढच्या हयातीत! पंतांची जोखमीची जागा दिली आम्ही त्यांचेच पुत्र निळोपंतांस – पण – पण – नाही भरून निघाली कधी त्या क्षणी झाल्या कोंडीची जखम. पंत, तुम्ही, आबासाहेब, गोदावरी यांची मनापासून माफी मागण्यासाठी ‘माणूस’ म्हणून तडफडतेय आमचे हे मावळमन. पण तुम्ही – तुम्हीच सारे हात डोलवून ‘नको, नको’ का म्हणताय या क्षणाला? का? का?
राजांनी गदगदून गर्दन हलवली. साकळल्या रक्तथेबांत थटलेले त्यांच्या चेहऱ्यावरचे घामाचे थेंब त्यामुळं इकडे-तिकडे टपकले.
खाचा झाल्या, रक्तसाकळल्या, नाकाम डोळ्यांसमोर अण्णाजी उभे ठाकले त्यांच्या! अण्णाजी – अण्णाजी! कसल्या ॠणानुबंधाची होती असामी? आबासाहेबांच्या काळात धाराबंदीचे काम चोख करणारे अण्णाजी – आमची मात्र मुस्कटदाबी करायला धजावलेच कसे? अण्णाजी – गोदावरी – रामराजांच्या मासाहेब. कसला त्रिकोण हा आमच्या पावलापावलांत अडकत गेलेला? गोदावरीची माफी मागण्याचेसुद्धा विचार उठतात मनात. मग अण्णाजी, मासाहेबांची मात्र माफी मागण्याचे का नाही घेत मन? अगदी या क्षणीसुद्धा!
आणि गोव्याच्या मांडवीखाडीत आमचा वाहतीला लागलेला घोडा अटीतटीने थोपवून आम्हास प्राणदान देणाऱ्या खंडोजींचे जन्मदाते बाळाजी! आबासाहेबांचे नेक कलमबाज! कलम! हत्यारापेक्षा कारीगर होणारे हत्यारांचेही हत्यार! कसे रोखले त्यांनी ते मासाहेबांच्या भिडेस पडून आम्हाविरुद्ध? त्यांचे पुत्र असूनही कधीच केला नाही निळो-खंडोजींनीसुद्धा आमच्याशी बातचीत करताना त्यांचा उल्लेख? कसा धजावला त्यांचा हात त्यांच्या, आमच्या प्राणांपेक्षाही प्रिय दौलतीचा तुकडा थेट शहजादा अकबरास तोडून देण्याची लिखावट करण्यास? नसतेच पाठवले अकबराने त्यांनी रेखलेले खलिते आम्हांकडे पन्हाळगडावर? होताच त्यांचा – अण्णाजींचा, मासाहेबांचा आमच्यावरच्या विषप्रयोगाचा कटाव फत्ते तर? तर – होता आमच्या श्वासांचा क्षणात शेवट याहून कमी वेदनांनी. पण या क्षणी या वेदनासुद्धा वेदना का नाही वाटत?
अण्णाजी, बाळाजी, शामजी, हिरोजी यांना काय वाटले असेल हत्तींच्या पायी चितचुराडा होताना? खंत? असह्य वेदना? अपार यातना? छेऽ तपशील आला होता, डोंगराएवढा बोजा अंगावर पडतानासुद्धा ते शांत होते असा. समजू-उमजून केल्या करणीने कचदिल होतात, ते कसले खंदे शूर? त्यांच्या मनात येऊन पाऽर दूर गेलेले काळे क्षण आज आमच्यासमोर कसे उभे आहेत? का धडपडताहेत ते आपले काळेपण उजळ करण्यासाठी! जखडबंद असले तरी त्यांना इजाजत देण्यासाठी का उठताहेत आमचे हात?
पुरे अंग घुसळून वर उठवण्यासाठी म्हणून राजांनी दोन्ही हातांना झटका दिला. पुन्हा कचला भक्कम तख्ता-कुलाह त्यांच्या मनगटात!
निरुपयाने राजे देही शांत राहिले; पण मन फडफडतच राहिले – त्या फडफडीतूनच आवाज उठू लागले – ‘‘प्रल्हादपंत – न्यायाधीश!” एकदा गफलत झाली तरीही त्यांच्याच हाती न्यायाधीशाची सूत्रे देताना आम्ही म्हणालो होतो, ‘‘मुलखात जसे डोंगरकडे तसे न्यायाधीश! आल्या वादळवाऱ्यानं झाडंझुडपं डुलली-हेलावली एवढंच काय उन्मळून पडली तरी समजू शकतं. पण – पण डोंगरकडेच पायीचा धर सोडून लटलटू लागले तर?” अगदी निर्वाणीचा म्हणून औरंग दौलत डुबवायला चालून येताच खुद्द न्यायाधीशांनीच हातमिळवणी करावी शिर्क्यांशी? त्यासाठी त्यांनाच दस्त करण्याचा आखरी हुकूम सोडावा लागला आम्हास? आणि – आणि आज तर खुद्द आमच्याच बाबीने ‘न्यायाधीश’ होण्याची संधी मिळावी औरंगजेबास? शेवटी काळ आणि नियतीच असते का, प्रत्येकाचा न्यायाधीश? औरंगने अन्याय नाही, न्यायच दिला आहे आम्हास, असे पुन्हा पुन्हा का वाटते? याहून गैर कोणताही निवाडा केला असता त्याने, तर दिल्लीच्या चांदणीचौकात नेताजी पालकरांचा मुहम्मद कुलीखान करणारा तो, आमचे मामासाहेब बजाजी निंबाळकर यांच्यावर अफझलच्या स्वारीत गुदरला तसा प्रसंग गुदरता औरंगमुळे आमच्यावर तर?
औरंगने तोही विचार नक्कीच केला असणार म्हणूनच तर त्याने रुहुल्लाच्या सवालास आमच्या सामनेच तडकावून दिले – ‘‘ये नहीं पढेगा नमाज कभी.’’
औरंग! आलीच नसती नौबत तर – राजहवसेपोटी ढोंग म्हणून तू हयातभर पुढे धरलेला इस्लाम न पत्करताही पढलो असतो आम्ही नमाज! एवढ्याचसाठी की, तुझ्या अल्लातालाने मेहर होऊन आपल्याच बाप-भावांची अघोर कत्तल करणाऱ्या, आपल्याच बेटीला कैदेत टाकणाऱ्या, लाखो गोरगरीब हिंदूंना जीवे मारणाऱ्या, शरण आलेल्यांना इस्लामी करणाऱ्या, त्यातल्या ताकदवरांना मनसबी बक्षून लाचार करणाऱ्या तुला एकदा तरी माफ करून ‘परवरदिगार’ असल्याची खातर पटवावी त्याने यासाठी!
जसजशा दिवसरात्रीच्या, कुणासही सोडविता न येणाऱ्या चावरमिठ्या कडकडून पडत होत्या तसतशी राजे-कुलेश दोघांचीही मने साकळून, एकवटून, थळी करून येत होती – एकाच विचारावर – ‘‘सोनं झालं आहे जिवाचं!”
त्या पुऱ्या तळावर चमत्कारिक विचारांचे जाळेच जाळे पसरले होते. दोघेही जबान, नजर गमावलेले कैदी एकमेकांबद्दल विचार करीत होत. त्यांची मन अडकलीच मागे तर एकाच विचारात अडकत होती – ‘महाराणी एकल्या आहेत मागं. या इथून तिथवर पसरल्या दौलतीबाबत, रयतेला धीर-दिलासा देऊन उभं करण्यासाठी कशा बांधतील त्या मन? कोण देईल त्यांना घरोब्याचं पाठबळ?’
औरंग तर आपल्या शामियान्यात, कधी दोघा कैद्यांचा, कधी ‘सेवाचा’ बगावती मुलूख कसा डुबवावा, याचा विचार करताना हातची माळ ओढत, मध्येच थांबून छताला निरखत सारख्या पायफेऱ्या घालीत होता. बेटी झीनत त्याला वाळामिश्रित लिंबूशरबत मधून-मधून स्वत: देताना धाडसाने विचारत होती – ‘‘कैसी है तबियत अब आब्बाजान?” खरे तर आपल्या आब्बाजाननी कैद्यांना सुनावलेली सख्त सजा तिच्याही स्त्रीमनात रुपत-सलत होती.
औरंगलाही घोर पडला होता, हिंदोस्थानच्या सल्तनतीला आपल्या मागे कोण सांभाळेल याचा! खरोखर सत्तेची राज्ये साम, दाम, दंड, भेदाने उठविणे सोपे आहे, पण त्यात जीव अडकणे केवढे अवघड आहे.
तळावरचे सारे सरदार, हशम जथ्याजथ्याने दबक्या कुजबुजीत विचार करीत होते तिघांचाच – दोन कैदी आणि शहेनशहा यांचा. तो तळ नव्हताच, होते मनामनांचा मेळ-गैरमेळ पडलेले विचारच विचार यांचे एक गुंतवळ झालेले प्रचंड जाळे!
नवा दिवस उगवला होता. कैद्यांचे झाले एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत, म्हणूनच ताबेदार इखलासने नवे जल्लादी पथक कैद्यांसमोर घेतले!!
दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदूषकी कुर्तेही त्या पथकाने टराटर ओरबाडून काढले. उरले तख्ता-कुलाह आणि साखळदंडाखाली अडकून पडल्याने न ओरबडता आलेले फक्त चुकार तुकडे.
‘‘देखते क्या हो? फेंक दो कुत्तोंपर वो नमकीन पानी – छाल उखाडकर इनकी!” बावरल्या-बावचळलेल्या हबशी जल्लादांवर इखलास ओरडला.
पथकातले, सापते घेतलेले जल्लाद पुढे झाले. त्यांनी नारळाचे खोबरे किसावे तसे धारदार सापत्यांनी दोन्ही कैद्यांची जागजागी साल सोलायला सुरुवात केली! जल्लादच आता पुरे हैराण झाले. दोन्ही कैद्यांपैकी एकही कैदी अंग सोलवटून निघत असतानाही हूँ की चूं करीत नव्हता. जल्लादांनी आजवर कैक माजोर कैद्यांची साल अशी सोलवटून काढली होती. त्यांचा तडफडाट आणि किंकाळ्या ऐकताना तर नेहमी जोषच संचारत आला होता जल्लादांच्या अंगी. पण आज? काय ताज्जुब बघत होते ते! त्यांचेच हात थरथरू लागले सापते ओढताना!
राजे आणि कुलेशांचे देह आता मानवी दिसेनातच. ते झाले होते, जयंतीच्या दिवशी अंगभर शेंदूर फासलेल्या हनुमंताच्या मूर्ती!
सापतेधारी मागे हटले. तख्तासारखी, तांब्याची भगुणी घेतलेले हबशी पुढे झाले. त्या भगुण्यात भरले होते मीठपाणी! तावल्या धावेवर लोहाराने चारी बाजूंनी पाणी शिपकारावे, तसे त्या हबशांनी हातच्या भांड्यांतील मीठपाणी राजे-कुलेशांच्या सोलवट रक्ताळ देहांवर शिपकारायला सुरुवात केली. लोहाराच्या पाण्याची ‘चरचर’ भोवतीच्यांना ऐकायला येते, या मीठपाण्याची चरचर तशी कुणालाच ऐकू येत नव्हती. उभ्या अंगाला शेकडो सुया भोसकल्यागत वाटत होते, ते फक्त, राजे- कुलेशांना! देहांचे आगडोंबी कुंड झाले होते त्यांच्या. गच्च मिटून होणाऱ्या वेदना मिटवाव्यात तर डोळेही नव्हते. तरीही लाटाच लाटांवर डुचमळत्या तळ्याकडे बघत, शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्या पक्षी काठच्या फांदीवर बसावा, तसे ते देहाच्या वेदनांकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत त्याच्या काठावर शांत बसले होते.
बघ्यांचा कालवाही खरोखरच ‘शैतान’ वाटावेत असे कैदी समोर बघून थरकल्याने आता चिडीचाप झाला होता. ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेबच असता तर! तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सरदारांच्या खिल्लती खेचून आणायचा हुक्म करून त्याने त्याचेच कफन इतमामाने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता! कधी, कधीच नव्हती एवढे हालहाल करणारी सजा त्याने हयातीत कुणालाही फर्मावली.
लटपटलेल्या काळजांचे बघे आता एक-एक करता काढत्या पायांनी आपापल्या राहुट्यांकडे परतू लागले. सापते आणि मीठपाण्याची तस्तीभांडी तिथेच फेकून जल्लादी पथकही निघून गेले. इखलास तेवढाच उरला. त्याच्यावर सोपविलेल्या सजेची एक जोखीम त्याच्यापुरती आता बाकी होती. कैदी पुरते गतप्राण होताच, दोघा ताकदीच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघा कैद्यांची मस्तके धडावेगळी करणे! भाल्याच्या टोकावर ती खोचती ठेवून, वाजतगाजत उभ्या तळभर ती सर्वांना दाखवून त्यांचीही नाचवत धिंड काढणे. शेवटी, धडे एकीकडे साखळदंडात पडलेली; ती मुंडकी तळाबाहेर कुठेतरी, कोल्ह्या-कुत्र्यांनी खावीत म्हणून भाल्यांसह फेकून देणे. पण या इखलासच्या आखरी जोखिमेला अद्याप अवकाश होता.
सजा दिल्याच्या तणावाने इखलास एवढा थकला होता की, क्षणभर त्यालाच वाटले, आपणही जखडलो गेलोत न दिसणाऱ्या एका खांबाला! तो दोन्ही कैद्यांकडे तसाच बघत राहिता. आता फक्त त्याच्या खिदमतीचे पाच-दहा हशमच होते बाकी त्याच्या भोवती. काय वाटले त्याचे त्यालाच; कुणास ठाऊक. संथ पावले टाकीत तो राजांच्यासमोर आला. भयाण दिसणाऱ्या मरहट्टयांच्या बागी सुभेदाराला त्याने पायांपासून लाकडी टोपीपर्यंत निरखले. इखलासची एरव्ही क्रूर, मगरूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली. राजांच्या देहभर फिरत ती त्यांच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखडबंद झाली. फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटला – ‘‘दे दो हमे ये सुबेदार।’’ त्याने त्या रक्त, मीठपाणी, घाम यांनी न्हाऊन निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हातच घातला!
‘‘अॉऽऽ ऑऽऽ ऑऽऽ” राजे मरणावरच पडलेली कुडी सगळे बळ एकवटून आता तडफडती हलवू लागले. ती हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागले. खांब हिंदकळू लागला.
जसा पुढं गेला तसाच इखलास हातची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला. का पाहिजे होती त्याला ती? एवढ्या पहाडी सूरम्याची एक तरी यादगीर म्हणून जपणार होता ती इखलास! त्यासाठीच देहभर निरखून राजांची फक्त घेता येण्याजोगी माळच शिल्लक होती. ‘‘नको – घेऊ नकोस ती.” हा संकेत त्याला कळला होता.
आपल्या खिदमती पथकाच्या हशमांवर तो कसातरीच ओरडला – ‘‘सब चले गये नजारा देखनेवाले नाबकाऽर लौंडे यहाँसे! तुम क्यों रुके? निकल जाऽव.’’ आणि स्वत: इखलासच आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला.
आता वर निळेभोर आभाळ, पायांखाली वढू बुद्रुकाची कितीतरी पुराणी मावळमाती, न दिसणाऱ्या, पण जवळच, खांद्याला खांदा मिळवून संथ वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा, त्यांच्या काठांवर जगाला एकले वाटावेत, असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि छंदोगामात्य कवी कुलेश राहिले! आता राजांचा स्वत:चा स्वत:च्या मनाशी चाललेला वादही थांबला. सुरू झाला – सुरूच झाला फक्त जिवाचा शिवाशी चाललेला आखरीचा शांत, संथ जाबसाल!
‘राजा म्हणजे कोण? सजा भोगणारा राजा म्हणजे कोण?’ यांसारख्या सवालांची उत्तरे शोधत संभाजीराजे भोसले या माणसाचा ‘जीव’ मनही मागे टाकून ‘शिव’ मुठीत पकडायला आपल्या उभ्या हयातीचा कानाकोपरा धुंडाळू लागला.
‘कोण होत्या आम्हास जन्म देत्या मासाहेब? का नाही याद येत त्यांचा चेहरा? का नाही वाटलं कधी आम्ही अंधारातून जन्मास आलो असं?’ आली असेल नक्कीच आबासाहेबांसह थोरल्या आऊंची याद अखेरच्या क्षणी. आणि – आणि नक्कीच येईल शेवटच्या क्षणी, एवढा कठोर आणि हवस असलेला असला तरी औरंगलाही त्याच्या जन्मदात्या आऊंची याद! कोण होते आबासाहेब? कोण आहे औरंगजेब?
आबासाहेब म्हणजे आमच्या मावळमातीने, डोंगरदऱ्यांनी फेकलेला उष्ण श्वास! मरगळलेल्यांना जगण्याची, कष्ट करत मानाने जगण्याची ऊब देणारा. न होते तेच तर? औरंगला दख्खनेत उतरायची नौबतही ना येती.
केवढे पल्ल्याचे बोलले होते ते अखेरच्या भेटीत पन्हाळ्यावर – ‘‘एवढीशी असते डोळ्याची पापणी, पण ती सुद्धा नाही घेत कधी साधं कस्पटसुद्धा डोळ्यांत. तुम्ही तर आजचे युवराज आहात – उद्याचे राजे. बरे ध्यानी ठेवा. अगोदर मरतात ती मनं आणि मग मरतात ती माणसं! राजे होऊ नका मावळा व्हा.” आबासाहेबांच्या बोलांनी जसा त्या भेटीच्या वेळी उसासला होता युवराज म्हणून, तसा आता एक मावळा म्हणूनच उसासला त्यांचा जीव.
आम्हाला, मनाचे क्षणाक्षणाला टवके उडावेत म्हणून अशी प्राणकठोर सजा देणारा, आता पार बुढा झाला तरी पिळदार मनाचा औरंग कोण? पुरा हिंदोस्थान इस्लाम करायला निघालेला, माणुसकीला फुंकरीने विझवू बघणारा. उभा केला असाच, आत्ता या क्षणी त्याच्याच बापाने उठविलेल्या सफेद ताजमहालासमोर त्याला तर! तर याच्या नजरेची वीज अंगी पडताच काळीठिक्कर पडून जाईल, ती देखणी कबरसुद्धा!
नाही. आबासाहेब आणि औरंग यांची तुलनाच नाही होऊ शकत. आम्ही नाही, रायगडाच्या सातमहालातल्या आमच्या एकाही मासाहेबांनी नाही, कुणीच नाही पारखले आबासाहेबांस. असेलच पारखले त्यांना तर फक्त तिघांनीच. एक थोरल्या आऊसाहेबांनी आणि दुसरे समर्थांनी आणि... आणि होय, तिसऱ्या फक्त औरंगजेबाने!
आम्ही – आम्ही कोण या तिघांत? थोरल्या आऊ आणि समर्थांच्या दृष्टीने आबासाहेबांची फक्त सावली आणि औरंगच्या दृष्टीने? त्याच्या दृष्टीने तर आबासाहेब नेमके कोण होते, हे नीट पारखता यावयासाठी या क्षणी त्याने नजरेसमोर धरलेला एक दर्पण! पडले असेल आमच्या देहाच्या दर्पणात, त्या हिंदोस्थानच्या शहेनशहास नीट नजरेला आमच्या आबासाहेबांचे असली रूप? असता त्याचा एकही शहजादा अशा आमच्या जागी तर?
का वाटले आमचे कोंडाजी, सरलष्कर, म्हलोजीबाबा गेले तेव्हा आमचे एकेक अवयवच गेले असे? का केली प्राणपणाने आमची सोबत निळोजीपंत, खंडोजी, रामचंद्रपंत, हरजीराजे, रूपाजी, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे आणि – आणि एवढ्या दूरच्या कनोजदेशीच्या कुलेशांनी? आम्ही केवळ राजे होतो म्हणून? नाही – नाही.
माणसे फक्त भाकरीच्या तुकड्यासाठी लाचार नसतात. तळहातावर जिवाची ज्योत घेऊन कुरवंडीसाठी सिद्ध होतात, ती अशी सुखासुखी नाही. ज्यांनी साथ दिली आबासाहेबांच्या या श्रींच्या नावे उठलेल्या गोरगरीब रयतेच्या राज्याला राखण्यास त्यांचा अभिमान वाटतो, या क्षणी आम्हास. जे फितवेखोरीने पाठमोरे झाले त्यांची एवढीसुद्धा खंत नाही वाटत. खरेच आहे, राजा म्हणजे उपभोगपारखा स्वामी. आणि – आणि वेळोवेळी कटावांच्या काट्यांतून चालत गेलेला, आपलीच माणसे पाठमोरी झाली असताना, औरंगसारख्या माणसाच्या हाती फसलेला, ही अशी सजा अंगांगावर पेलणारा आमच्यासारखा सजेचा राजा म्हणजे कोण?
सजेचा राजाही असतो, पण ‘स्वामी’ नव्हे तर ‘सेवक.’ वेदनांचेच उपभोग करून जित्या देही भरपेट भोगलेले असतात, ते त्याने! सजा घेणारा राजा म्हणजे वेदनांचे उपभोग भोगणारा पहिला सेनापती आणि शेवटचा सेवक!!
केवढे हायसे आणि भरून पावल्याचे समाधान वाटले राजांना आता.
वढूची मावळी सांज आता उतरली. पण दोन्ही कैद्यांना एवढीसुद्धा कल्पना नव्हती की, आता सांज आहे, सकाळ की दुपार? आता त्या दोघांनाही पुरते कळून चुकले की, हयातीच्या दौडीचा शेवटचा मुक्कामी तळ जवळ येत चालला आहे. मांडाखालचे हात, पाय, डोळे, जबान यांचे जनावर पाऽर फेसाळलेय, थकदिल झालेय ते. त्याला टाच मारावी असेसुद्धा नाही वाटत आता.
दिवसभर आभाळाची दौड करून थकावटीला आलेली मावळकिरणे मायेने जवळ घेत, त्यांच्या थकल्या पाठवानांवरून, आपल्या असंख्य लाटांचे हात फिरवीत शांतसंथ वाहतच होत्या, फक्त इंद्रायणी आणि भीमा!
राजे आणि कुलेश यांचे डोळे-जबान काढल्यापासूनचा बारावा दिवस उगवला. हालहाल झालेले छंदोगामात्य कुलेश मध्यरात्रीच केव्हातरी गतप्राण झाले होते. मरण्यापूर्वी त्यांनी “प्रणाऽम स्वामी!” म्हणण्यासाठी केवढ्यातरी
मोठ्याने “ऑऽऽ ऑऽऽ” केला होता. त्या चमत्कारिक आवाजाने कैद्यांभोवती गस्त देत फिरणारे, पेंगुळलेले गस्तेही दचकले होते. “ऑऽऽ अॉऽऽ’’ करत राजांनी कुलेशांना प्रतिसाद दिला. छंदोगामात्य आता छत्रपतींना प्रतिसाद देऊच शकत नव्हते. काय झाले असावे, हे राजांनी मनोमन ताडले.
कवी कुलेशांच्या जिंदगीचा छंद परमात्म्याच्या महाकाव्याला जाऊन मिळाला होता. त्यात एकरूप झाला होता.
बारावा दिवस! राजांना कल्पनासुद्धा नव्हती की, असेच रायगडी मंचकावर पडलेले रुग्ण आबासाहेब बाराव्या दिवशीच अनंतात लय पावले होते, त्या दिवशी पायांच्या नखांपासून डुईच्या केसावळीपर्यंत एक-एक अवयव गार पडत होता त्यांचा.
आज असे काय होते आहे? आमचा पायांच्या नखांपासून डुईच्या केसावळीपर्यंत गेल्या दहा-बारा दिवसांत नव्हता असा अवयवन्अवयव का पेटून उठतो आहे?
गेल्या थोरल्यांनी ऊरफोड करून इथल्या माणसामाणसाला जगण्यातला अर्थ पटवून सांगितला होता. जाते धाकले आज इथल्या माणसामाणसाला प्रसंग पडलाच, तर मरावे कसे याचा अर्थ पटवून देणार होते.
‘शिव’ आता ‘जिवा’च्या अगदी नजरटप्प्यातच दिसू लागला राजांना.
आबासाहेब गेल्यानंतर हितोपदेश म्हणून लिहिला समर्थांचा खलिताच शब्दबर दिसू लागला, त्यांच्या जीवज्योतीला –
‘शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा साक्षेप।
शिवराजाचा आठवावा प्रताप। भूमंडळी।।
शिवराजाचे कैसे बोलणे। कैसे चालणे। सलगी देणे। कैसी आहे।।
याहून विशेष ते करावे। जीवित तृणवत मानावे।”
धर्मातून राजकारण मार्गी लावणारे समर्थ आणि राजकारणाच्या धामधुमीतही धर्मकारण मार्गी लावणारे आबासाहेब! केवढे पारखले होते त्यांनी परस्परांस!
‘‘जीवित तृणवत मानावे। – ” समर्थखलित्यातील हितोपदेश राजांच्या कानामनात – उभ्या देहात घुमू लागला.
आता तर त्यांना उभ्या मराठी दौलतीचाच केवढातरी भव्य ‘गोंधळचौक’ समोर मांडल्यागत दिसू लागला. हंबीरराव, खंडोजी, निळोपंत, बहिर्जी, कोंडाजी फर्जंद, म्हलोजीबाबा, कृष्णाजी कंक, रामचंद्रपंत, कुलेश – गेलेले – असलेले कितीतरी लोक हाती संबळ तुणतुणी घुमवीत मिटल्या डोळ्यांनी उदोकारच उदोकार उठवीत होते – ‘‘उदं गं अंबे उदं” केवढा भव्य हा, आम्ही यापूर्वी कधीच न बघितलेला आई जगदंबेचा गोंधळ! सगळ्याच मानकऱ्यांच्या माथी भंडाऱ्याचा मळवट भरलेला साफ दिसतो आहे आम्हास! दिसत नाही फक्त तुळजाभवानी! कुठे आहे ती? हे काय चमत्कारिक दिसते आहे? हा भास तर नाही? ही जगदंबेचीच मूरत दिसते आहे. फक्त तिचा मुखडा थोरल्या आऊंगत दिसतो आहे. तिच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी आबासाहेब आणि समर्थांच्या मुद्रा दिसताहेत! जगदंबमूर्तीच्या मळवटाच्या आडव्या दुबोटी रेघांत दिसताहेत आमच्या श्रीसखी आणि रामराजांच्या ताराऊ. रामराजांच्या मुद्रेचा पसरता भंडारा या दुबोटी मळवटामागे खडा दिसतो. पण – पण असे का होते आहे? या एवढ्या भव्य जगदंबमूर्तीत आम्ही – आम्हीच कसे नाही दिसत कुठे? का? का?
आता या क्षणी राजांना सभोवर मांडल्या भव्यच भव्य गोंधळातले आपल्या जीवज्योतीचे नेमके, रसरशीत, स्पष्ट-स्पष्ट मानकरी स्थानच दिसू लागले. इथून तिथवर पसरलेल्या, रंगावल्या, नादभरल्या आभाळाने तेजाळ सूर्यगोळ्याला केवढ्यातरी भरल्या डोळ्यांनी नुसते निरखावे, तसे शंभूराजांचे डोळे हरवलेल्या देहाचेच सारे अवयव त्या जीवज्योतीला भरून पावल्या डोळ्यांच्या भावनेने बघू लागले –
ती ज्योत आरोपित संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले नव्हती –
‘‘उभा सह्याद्रीच जिंकण्यास येऊ आलो तर!” म्हणणारी, दिलेरला मिळणारी, भिरमिटलेली, खुद्द त्या ज्योतीलाही कायदे न आवरता आलेली, बेलाग उधळलेली भ्रमचित्त जवानीची ऊर्मी नव्हती –
ती कुणाची छत्रपती, स्वामी, धनी नव्हती.
कुणाचे बाशिंगबळ, कुणाचे आबा, कुणाचे भाऊ नव्हती –
आता ती जीवज्योत कुणा माणसाशी, मातीशी कसलेही नाते सांगणारी नव्हतीच.
“क्षत्रियकुलावतंस, सकळगुणमंडित, अखंड लक्ष्मीअलंकृत गोब्राह्मणप्रतिपालक, श्रीमन्महाराज राजा शंभू।’’ ही गेली अनेक साले धारण केलेली बिरुदावली अंगच्या रक्ताने त्यांनी केव्हाच धुऊन टाकली होती.
जमिनीपासून थेट आभाळापर्यंत आपल्या जिवाची एक नजर ठरणार नाही अशी भव्य, फरफरणारी ज्योत भासू लागली त्यांना.
‘‘कसे आहोत आपण?” ज्योतीने सवाल केला आपणालाच!
‘‘कसे? कसे?’’ शिवालयातल्या ऐकू येणाऱ्या घंटांनी केवढातरी घोष धरला आता. संबळ तुणतुणी शिगेला चढली. भंडाऱ्याच्या उधळल्या मुठी-मुठाींनी आभाळ कसे कोंदून गेले –
‘‘कशी दिसते आहे ही ज्योत?” भोवतीच्या पंचेंद्रियांना आपल्यातच ओढून घेतलेल्या त्या जीवज्योतीचा झाला होता, आई जगदंबेच्या मांडल्या या भव्य गोंधळचौकातील अंगभर पाजळलेला, फरफरता, पाचपेडी पोत!!!
संताजी-धनाजी यांनी तो आपल्या हातांत नाचविता धरला होता. त्यांच्या हातातून तो कैकांच्या हातात जात गोंधळचौकभर अखंड फिरू लागला.
जगदंबेचा तो पाचपेडी पाजळता पोत. क्षणभर त्याने फरफरता सवालच स्वत:ला केला. ‘‘जीवित तृणवत मानावे?’’ आपणच जाब दिला – ‘‘समर्थ, तृणाच्या पात्यालाही असतं जळून भस्म होण्याचं भय! आम्हास तेही नाही उरलं!!’’ त्या पोतालाच – पोतमाहात्म्य ऐकू येऊ लागले –
‘‘पंचेद्रियांचा जीवपोत हा – त्रिगुण गुणी वळला।’’
कानांतले चौकडे काढून टाकावेत, तसे त्या पोताने पाजळते होतानाच ‘त्रिगुण’ काढून केव्हाच दूर फेकले होते. पोताला आता काही-काही दिसेना. दिसू लागला फक्त इंद्रायणी आणि भीमेचा एकजीव झालेला पावन संगम! याच इंद्रायणीच्या काठी ज्ञानोबांनी आपल्या वारकऱ्यांना मऱ्हाटमोळी गीता सांगितली – ज्ञानेश्वरी! तुकोबांनी आपली गाथा रचली. आमच्यातून वाहून गेल्या रक्ताच्या करंजेलाने आज रेखली जाते आहे, एक ‘राजगाथा’, एक ‘शंभूगाथा ’, एक ‘शंभूभूषणम्!’
पोत फरफरून-फरफरून उठला. औरंगजेबाच्या हुकुमाने, जल्लादी पथकांच्या हाते इखलासने उद्ध्वस्त केलेला ‘शंभूदेह’ सोडून चालला.
समोरच्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या पावन संगमात तो आता डुबवला जाऊ लागला! डुबतानाही तो फरफरला – “जगदंऽब – जगदंऽब!”
‘‘चर्रर्रऽ’’ आवाज उठला.
जगदंबपोत उरात घेऊन इंद्रायणी आणि भीमा आज पहिल्याने माना वाकड्या करून काठावरच्या सजेच्या खांबाकडे बघत-बघत संथ वाहू लागल्या.
त्यांना दिसत होती, मान टाकलेल्या शंभूदेहाच्या छातवानावर अजूनही मावळतीच्या किरणांत, रक्ताने न्हाऊन गेलेली; तरी तळपणारी चौसष्ट कवड्यांची अशरण तळपती माळ आणि फक्त माळ!!
*समाप्त*
🔴🟠🟡🟢🔵⚪🟣🔴🟠
🙏
😢
❤️
😮
16