
Yuti's Hub Library
June 15, 2025 at 11:55 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - ३२.
जेवण करून हळूहळू आनंदी खोलीवर चालत आली. डोक्यावरून पांघरून घेऊन स्वस्थ पडून रहावसं वाटत होते. कशाची इच्छा, कसलाच रस उरला नव्हता. खोलीत एका बाजूला पत्र पडलेले दिसले. पत्र पाहून अंग शहारले. घशाला कोरड पडली. पत्रात काहीतरी भयंकर असावे असे उगीचच वाटले. एक वेळ वाटले पत्र तसेच ठेवून द्यावे. पण मन मानेना. गेल्या दोन-तीन पत्रात गोपाळरावांनी वेगळ्याच सूर लावला होता. नोकरी सोडून द्यावीशी वाटते. सर्व हरामखोर आहेत. भगवे कपडे घालायला सुरुवात केली होती. कच्चे कणकेचे गोळे व कच्च्या भाज्या खायला सुरुवात केली. तिने मन विचलित होऊ दिले नाही. अभ्यास सांभाळून उत्तर लिहिली होती. नोकरी सोडू नये. खाण्यापिण्याची हाल करू नये. चार लोकांसारखे नीट वागावे असे परोपरीने लिहिले होते. पण सगळे प्रयत्न फुकट जाणारसे वाटत होते.
तिने हलक्या हाताने पत्र उघडले. पहिल्या दोन तो तीन ओळी वाचल्या. काहीच अर्थबोध होईना. तिने पत्ता पाहिला. पत्र शांघायहून आले होते. अरे देवाऽऽ! कुठे आहे शांघाय? दोन्ही तळहात घामेजले. खोकल्याची मोठी उबळ आली. छातीवर हात दाबून वर पत्र वाचू लागली.... शांघायला येऊन पंधरा दिवस झाले. आजारी आहे. हॉस्पिटलमधे पडून आहे. तुम्हाला माझ्याविषयी कसली काळजी? तुमची इच्छा असो वा नसो. मी अमेरिकेत यायचे ठरवले. कदाचित तुमची अडचण होईल. पण नाईलाज आहे. हिंदुस्थानचा भयंकर विट आलाय. त्या देशाचे पुन्हा तोंड देखील पाहायची इच्छा नाही. इतकेच काय त्या देशातील एक पैसा देखील बरोबर घेतला नाही.
आनंदीला भोवळ आल्या सारखे झाले. दोन-तीन मिनिटे स्तब्ध बसली. मग पुन्हा पत्र वाचू लागली... अगदी खालच्या दर्जाच्या मजुरांनी भरलेल्या बोटीतून बसून रंगूनला आलोय. रंगूनला मोलमजुरी करून पैसा मिळवला. चीनमध्ये आलो. इथे आजारी पडलो. इथले लोक त्याला पिवळा ताप म्हणतात. सात आठ दिवसांपासून ताप उतरत नव्हता. जवळ पैसा नाही. भाषा वेगळी.ओळखीचे कुणी नाही. अशा अवस्थेत शांघायला दिवस काढतोय. एक पोरसवदा डॉक्टर औषध देत होता. गुण देईना. राकेल प्याल्याने ताप जातो असे कुठेतरी वाचले होते. त्याची प्रचिती घेतली. अर्धी पाऊण वाटी रॉकेल प्यालो. त्यामुळे खूपच त्रास झाला. रागावून डॉक्टरने औषध देणे बंद केले. पाच सात दिवस धर्मशाळेत पडून होतो. आता बर आहे. उद्यापासून मोलमजुरी करून पैसा जमा झाला की अमेरिकेत सानफॅन्सीस्कोला उतरेल. तुम्ही पत्र पाठवू नका. अर्थात तुम्हाला बरेच आहे म्हणा...
मी हिंदुस्थानातून निघताना पाच सात महिने पुरतील इतके पैसे पाठवले होते. ते मिळाले असतीलच. आपण मजेत राहावे. खूप अभ्यास करावा. दुसरा कोणताच विचार करू नये. तुमच्या पास होण्याकडे मी चातकासारखी नजर लावून आहे. तुम्ही यश मिळवले तर स्त्रीची आणि हिंदुस्तानची मान उंचावेल. पत्र हातात धरून ती कितीतरी वेळ सुन्न अवस्थेत बसून राहिली. काय माणूस आहे... यांचा झपाटाच विलक्षण... वादळच आहे नुसतं... यांना कशाची भीतीच वाटत नाही. सरळ उठतात नी जीव झोकून देतात. विचार करून भोवळ येईलसे वाटले. कितीतरी वेळ बेशुध्दावस्थेत होती.
पाच सहा महिने अभ्यासाच्या धांदलीत गेले. बारीक ताप, खोकला, अशक्तपणा, दारिद्र्य, गोपाळ रावांची पत्रे, कशाकडे लक्ष द्यायचे नाही ठरवले. एकाग्रतेने अभ्यास करू लागली.
अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. मन धास्तावले होते. रोगाने शरीर पोखरले होते. उमेद खूप खचली होती. पराजय पत्करायचा नाही असा दूर निश्चय होता.
आठ-दहा दिवस परीक्षा चालली. पेपर उत्तम गेले. पास होण्याची खात्री वाटली. त्यादिवशी आनंदी घरी आली तोच अंगात फणफणून ताप घेऊनच. घशाला कोरड पडली होती. खोकल्याने थैमान घातले होते. आबीला कल्पना होती, हिचा उत्साह केवळ परीक्षा आटोपेपर्यंतच. ती दोन मैत्रिणींना सोबत घेऊन रात्रभर आनंदी जवळ थांबली. आनंदीला अशा बिकट अवस्थेत टाकून जायचा धीर होत नव्हता. दोन दिवस तसेच गेले. ताप थोडा कमी झाला. पण शरीर पांढुरके, निस्तेज पडले होते. डोळे मुलूल, उदास होते. आबी घरी जाऊन परत आली. आनंदी खोलीत एकटी पडली होती. हातात पाकीट होते. आबीने घरून आणलेले टोमॅटोचे सूप पाजले. कुणाचे पत्र? माझ्या नवऱ्याचे. ते अमेरिकेत पोहोचले.
आबी म्हणाली, वाऽ! फारच छान! त्यांना इकडेच ताबडतोब बोलावून घे. आपण सगळे मजा करू. तुझे आजारपण गेलाच म्हणून समज.
आनंदी काहीच बोलली नाही. आबीकडे खोल नजरेने बघत राहिली. हिंदू स्त्रीचा नवरा कसा असतो हे ते या अमेरिकन मुलीला कधीच कळणार नाही. आनंदी म्हणाली, ते सानन्सिस्कोला आलेत. इकडे कधी येतील माहित नाही. मी मात्र फिलाडेल्फिया सोडणार. अग पण, अजून एक प्रॅक्टिकल राहिले आहे ना? त्यासाठी परत येईल. माझी प्रकृती अशी, अशक्तपणा वाढतोय. दगदग झेपत नाही. केव्हा एकदा मावशीकडे जाऊन निवांत पडेलसे झालेय! आनंदीचा कापरा आवाज आबीला काही निराळे सांगत होते.
आनंदी हळूच उठली टेबलावरच्या खणातील एक रेशमी चौकोनी कापड काढला जेव्हा पासून आबीशी मैत्री झाली होती तेव्हा तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून रुमालावर कशीदा काढून भेट द्यायचा विचार होता. पण अभ्यासामुळे व तब्येतीमुळे ते पूर्ण झालेच नाही. तिला हुंदका आला. काय करू गंऽ? चित्र अपूर्णच राहिले. पूर्ण करण्याची ताकदच नाही. तुझी माझी ही मैत्रीही अशीच आहे. तू मला प्रेम दिलस...
आनंदीने मावशीला पत्र लिहिले उद्या, परवाकडे तुझ्याकडे येईल. तेवढ्याणेही तिला थकवा आला. आनंदी डोळे मिटून पडून राहिली. आबी तिला थोपटत राहिली. तिला झोप लागल्यावर आबी निघून गेली.
दुसऱ्या दिवशी झोप पूर्ण झाल्यामुळे तिला बरे वाटत होते. त्याच दिवशी तिने रोसेलला जायचे ठरवले. गोपाळकांचे पत्र टेबलावर पडले होते. उत्तर लिहायची इच्छा नव्हती. दुपारी रोसेलची गाडी होती. थोडी बांधा बांध केली. काही आवडीचे पुस्तक घेतली. अर्धवट राहिलेले भरतकामाई घेतले. संध्याकाळी गाडी रोसेलला पोहोचली.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
👍
❤️
😢
🙏
9