
Yuti's Hub Library
June 16, 2025 at 08:50 AM
आज पासून सुरू करणार आहे.एक भयकथा
" त्रिकाल सत्य - एक गुपीत"
भाग १
आज परचुरे वाड्यात गडबड चालू होती. सगळ्यांची धावपळ चालू होती. कारणही तसंच होतं. आज सुभानराव परचुरेचीं सुन बाळांत होणार होती. धोन्या मांत्रिकाने आणि जगत गुरुजींनी सांगितलेले भाकित खरे ठरणार होते.परचुरेनां नातू मिळणार होता.मांत्रिक आनंदीत होता पण परचुरेची सुन शुभदा आणि जगत गुरुजी चितेंत होते.येऊ घालणारे हे मुल अशुभाची चाहूल घेऊन येणारे होते.याच्या जन्मा नंतर काय काय बदलणार आहे हे काळचं ठरवणार होते.
सुभानरावांना दोन बायका होत्या. राधाबाई आणि आशाबाई राधाबाईंना सतत लागून आठ पोरी झाल्या. त्यातल्या चार वाचल्या तर चार गेल्या. शेवटी सुभानरावांनी मुलासाठी दुसरी बायको केली.तिलाही आधी दोन मुली झाल्या मग खूप जपतप करून ,नंतर मांत्रिकाला हाताशी धरून कसल्यातरी पुजा केल्या आणि दोन वर्षानीं त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव सुभाष ठेवण्यात आले. सुभाष अतिशय लाडाकोडात वाढला.पण अचानक तो सोळा वर्षांचा झाल्यावर रात्री गायब राहू लागला.परचुरेंनी मुलावर लक्ष ठेवण्यास सुरवात केली आणि त्यांना अस कळाले कि तो मांत्रिक रात्री त्यांना स्मशानात बोलावून काहीही शिकवू लागला होता.सुभाष ने अनेक काळ्या विद्या शिकून घेतल्या होत्या. त्यासाठी हळूहळू गावातील जनावरे गायब होऊ लागली होती.हे बंद करण्यासाठी मग परचुरेनी मांत्रिकला मारून गावातून हाकलून दिलं आणि एकविस वर्षाच्या सुमाषचं लग्न आपल्या ओळखीच्या पाहुण्यातील गरीब शेतकऱ्याची गोंडस व सुंदर मुलगी शुभदा बरोबर लग्न लावून दिले.त्यांना वाटले तो आतातरी सुधरेल पण नाही.सगळ्या समोर जरी शांत व घरात रहात असला तरीही रात्री तो अशा अनेक पुजा करत असे.शुभदा तशी सुंदर असल्याने तो नेहमी तिच्या मागे पुढे करत असे.अठरा वर्षांची शुभदा जेंव्हा घरात आली तेंव्हा सुभाष तिला पाहतच राहिला. नाजूक गोरीपान ,चाफेकळी नाक,छोटीशी जिव्हणी ,लांब सडक केस .झुबकेदार वेणी पाठीवर पडलेली.तिच हे रुपतर सुभानरावही किती वेळ न्याहाळत होते.राधाबाईच्या लक्षात येताच.देवाच्या पाया पडायला आत घेऊन गेली.त्यावेळी सुभाष देवघरात गेला नाही.शुभदा ला जरा वेगळं वाटलं पण राधाबाईंनी तिला सांगितल कि तो देव मानत नाही. पण खरं तर ज्यावेळेला राधाबाईंनी दोघांना आत बोलावलं तेंव्हा सुभाषने आपले डोळे पुर्ण लाल केले होते. ते लाल रक्ताळलेले डोळे फक्त राधाबाईच पाहू शकत होत्या. त्या घाबरून वळल्या.
" अहो चला आत जोडीने पाया पडू."
" नको तुचं जाऊन ये.माझा विश्वास नाही. "
शुभदा अचंभित होऊन आत गेली होती. तिला कोठे माहित होतं कि आपला नवरा वेगळं काही आहे.पुढे यांना सतत तीन मुली झाल्या. तेंव्हा सुभान राव व सुभाष यांनी शुभदाला सांगितलं होतं कि आता मुलगा झाला नाही तर या मुलीला मारलं जाईल आणि दुसरं लग्न केले जाईल.शुभदा पुर्ण पणे घाबरून गेली होती आणि आपल्या सख्ख्या सासूच ऐकून चोरून मांत्रिकाला भेटली होती. मांत्रिकाने आपला बदला पुर्ण करण्यासाठी एका भयानक अतुप्त आत्म्याला तिच्या पोटात परत जन्म घेण्यासाठी सोडला होता. त्यामुळे जेंव्हा पासून शुभदा गरोदर होती तेंव्हा पासून अनेक अपशकून घडत होते.अनेक अशुभ घडत होते. तिला रात्री वेगवेगळे अनुभव येत होते.आज ती बाळांत होणार होती आणि बाहेर कुत्रे जोरजोरात विव्हळत होती .गाढवे जोरजोरात ओरडत होती.कावळ्यांची कावकाव वाढली होती. गिधाडे घरावर घिरट्या घालत होती.टिवटीव्या ओरडत फिरत होत्या. गावातील लोकांना काहीतरी अशुभ आणि अभद्र घडणार आहे हे जाणवत होते. सुभाष मात्र शांत होता. कारण तो याला घाबरत नव्हता.राधाबाई व आशाबाई बैचेन होत्या. मंदिरात जगत गुरुजी जप करत बसले होते. येणारे अभद्र काय वादळ आणि संकट घेऊन येणार आहे हे त्यांना जाणवत होते. पण ते काही करू शकतं नव्हते.पण ते जन्मताच येथून निघून जावे यासाठी ते जप करत होते.पण ते कितपत शक्य होणार आहे, हे जाणून होते आणि पुढचे भविष्यचं सांगणार होते.
क्रमशः
सौ हेमा येणेगूरे पुणे
👍
❤️
😮
11