
Yuti's Hub Library
June 17, 2025 at 04:24 AM
"आय अॅम रेडी"
.......कौस्तुभ केळकर नगरवाला.
प्रिय आई बाबा ,
सा.न.वि.वि.
आश्चर्य वाटलं ना ?.
पण आज मनापासून वाटलं, की तुम्हांला पत्र लिहावं.
इतकं सविस्तर बोलणं नसतं जमलं मला.
पहिल्यांदा तुमच्या दोघांचं हार्दिक अभिनंदन.
हो...
तुमचा मुलगा ....मी काल दहावी उत्तीर्ण झालो.
82% मार्क्स मिळवून.
मार्कांच्या आकड्यांपलीकडे जाऊन तुम्ही माझा आनंद साजरा केलात , कुणालाही माझे मार्क्स सांगताना तुम्हाला कमीपणा वाटला नाही.
खरंच, मला तुमचा अभिमान वाटतो.
खरंच नशिबवान आहे मी.
माझे आईबाबा मला खरंखुरं ओळखतात.
माझी उडी ते ओळखून आहेत.
मी केलेल्या प्रयत्नांची त्यांना कदर आहे.
कुठल्याही अपेक्षांचं अवास्तव ओझं त्यांनी माझ्यावर कधीही लादलं नाही.
माझी कुणाशीही कधीही तुलना केली नाही.
किती भारी आहे हे सगळं.
म्हणूनच ...मी आज खरा आनंद साजरा करतोय.
खरं सांगू , माझ्या परीनं मी अभ्यास केला.
पण थोडं प्लॅनिंग परफेक्ट हवं होतं अजून.
अजून पाच सहा टक्के तरी वाढले असते.
बट आय प्राॅमिस , बारावीत ही कसर भरून काढीन.
तुम्ही मला वर्षभर काय सांगत आलात ?
माझा मुलगा कमी मार्कांनी पास झाला... चालेल मला.
पण माझा मुलगा प्रयत्नांना कमी पडला...
...तर नापास होतील त्याचे आईबाबा.
डोण्ट वरी.
....आई बाबा तुम्ही पास झालात.
थोडं टेन्शन आलंय खरं.
पण फिकर नाॅट.
तुम्ही पाठीशी असलात की अवघड गणितं सुद्धा सुटतात.
नाही सुटली तरी चालतील , प्रयत्नांना बळ मिळतं.
आई बाबा ,
आय अॅम रेडी...
मी तयार आहे.
पुढची लढाई लढायला.
सही में , मैं अब बड़ा हो गया हूँ.
सगळ्या काॅलेजसचा कट आॅफ काढलाय मी.
बहुधा जवळच्याच काॅलेजात मिळेल अॅडमिशन.
थोडी लांब मिळाली तरी चालेल.
तुम्ही काळजी करू नका.
ती सगळी धावपळ मी करणार.
काॅलेजचा ईश्यू नको.
अभ्यासाचा नक्की करणार.
डोनेशन भरून मला अॅडमिशन नको.
गाडी तर बिलकुल नको.
माझे मित्र निवडण्याची अक्कल बहुधा माझ्यात आली असावी...
एखादी निवड चुकलीच, तर बेलाशक कानपूर होवू द्यात.
वाकडं पाऊल मी टाकणार नाही.
आणि लास्ट बट नाॅट लीस्ट ,
तुमचा कुठलाही निर्णय माझ्या हितासाठीच असेल यावर माझा पुर्ण विश्वास आहे.
सो , गिव मी बेस्ट लक....
ईटस् स्टार्ट आॅफ माय न्यू लाईफ.....
मी काॅलेज मध्ये टेक आॅफ करताना , माझे पाय जमिनीवरच असू देत.
नजर तुमच्याकडेच राहू देत.
दिवसभरातली प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करण्याची चांगली सवय मी सोडणार नाही.
बाबा , सुट्टीतला तुमचा करिअर गायडन्स प्रोग्रॅम जाम आवडलाय मला.
तुम्ही तुमच्या प्रत्येक मित्राकडे ,एक एक दिवस पाठवलंत मला.
फेविकाॅलसारखा चिकटलो होतो दिवसभर त्यांना.
ते नक्की काय करतात, याची छान ओळख झाली.
प्रत्येक रोलमधे शिरून बघत होतो मी.
डाॅक्टर काका झाले .
अभिजीतकाकाची इंडस्ट्री झाली.
शंतनूकाकाची वकालत बघितली.
आठ दिवस..
आठ नवी फिल्डस्...
ग्लॅमरपलीकडची खरी ओळख.
पण शाहकाकांची फार्मसी मला खरी आवडली.
मला वाटतं ,त्या रोलमध्ये मी परफेक्ट दिसेन.
म्हणून मला वाटतं , मी बी.फार्मसी करावं.
फार्मसीचा मोठा डेपो उघडण्याचं स्वप्नं पडतंय मला..
अगदी जेनेरिक औषधांसकट.
फार्मसीच्या सीईटीची तयारी करणार आहे मी.
शाहाकाकांशी बोललोय मी.
ते पण बोलणार आहेत तुमच्याशी.
आपण सगळे मिळून निर्णय घेवू.
आता खूप बरं वाटतंय.
कुणी काहीही म्हणू देत.
काॅलेजच्या पहिल्या दिवशी तुम्ही माझ्याबरोबर रहायचं.
सगळ्यांना कळू देत , आमच्यात फक्त एज गॅप आहे .
जनरेशन गॅप नव्हे.
हाईड अॅन्ड सीक तर बिलकुल नाही.
खूप लिहून झालं....
चला आता कामाला लागतो.
डाॅक्युमेंटस्ची फाईल रेडी करायचीय.
रिझल्टचा असा आनंद, दोन वर्षांनी पुन्हा घ्यायचा आहे.
माझ्या प्रयत्नांच्या पेपरला तुमच्या आशीर्वादाची सप्लीमेंट जोडा म्हणजे झालं.
मार्क्स तो सबके अच्छे आते है...
'रिझल्ट' अच्छा आना चाहिये.
अच्छाही आयेगा.
हमेशा.
बाऽऽय
.........तुमचाच टेन्या.
.......कौस्तुभ केळकर नगरवाला.
👍
❤️
🙏
😮
27