Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 18, 2025 at 05:55 PM
*!!!डॉ. आनंदीबाई जोशी भाग-३३!!!* रोसेल स्टेशनवर आनंदीला घ्यायला पमिला आली होती. तिने हात देऊन आनंदीला डब्यातून खाली उतरवले. फलाट चढून आनंदी बाहेर आली. तेवढ्यानेही आनंदीला दम लागला होता. जीवाची काहीली झाली. पमिलाने तिला गाडीत बसवले. गाडी घरी पोचमध्ये उभी राहिली. पमिला आनंदीचा हात धरून उतरताना पाहून, मावशीला एकदम भडभडून झाले. आनंदीचे तेव्हाचे रूप आठवले. एकदम पुढे होऊन मावशीने तिला मिठीत घेऊन स्फुंदुन स्फुंदुन रडू लागली. अश्रू भरल्या नेत्रानीच आनंदीने हसण्याचा प्रयत्न केला. ते हास्य कसेसेच होते. मावशीला अशुभ वाटले. मावशीने व पामिलाने आधार देऊन आनंदीला घरात आणले. सोप्यावर बसवल्यावर आनंदी चाचरत म्हणाली, मावशी तुला एक बातमी सांगायची आहे. सांग की ग! अगंऽ! मिस्टर जोशी अमेरिकेत पोहोचले. अगं मग त्यांना आत्ताच पत्र पाठव. म्हणावं, रोसेलाच या. इथे महिना दीड महिना राहतील. नाही तरी मला अजून जावई आला नाही. त्यांची सरबराई करायची सवय तरी होईल. आनंदीला खूप हसू आले. संस्कृत मध्ये "जमातो दशमो ग्रहः।" म्हणतात. जगातल्या इतर जमातांचं काय असेल कुणास ठाऊक? पण मावशीला हा जावई मात्र दशमंग्रहापेक्षा खडतर नक्कीच वाटेल. खाणे पिणे झाल्यावर आनंदी तिच्या खोलीत आली. गोपाळरावांना पत्र लिहायचे होते. तिने पेटी उघडली. रात्रीचा आबी बरोबरचा प्रसंग आठवला. तिला ते अपूरे भरतकाम मखमली कपड्यावरची चित्र दाखवले होते. ते इथे पूर्ण करायचे होते. तिने पेटीत शोधले. सर्व वस्तू होत्या. पण त्या अपूर्‍या चित्राचे कापड नव्हते. सगळीकडे शोध घेतला. जणू तो सुंदर निळा पक्षी उडून गेला होता. कापडावरचा हंस एकटाच राहिला होता. एक मन वाटे परत फिलेल्डिफियाला जाऊन ते चित्राचे कापड शोधावे. आबीला पत्राने विचारावे. पण तिने तो विचार बाजूला सारला. आबीला कदाचित त्या भावना कळणारही नाही. खांतवलेल्या मनाने आनंदी अंथरुणावर पडली. अंग गरम झाले. खोकल्याची उबळही सुरू झाली. अर्ध्या तासाने आनंदीने मन स्थिर केले. चित्र अपूर्णच राहायचे होते. आयुष्यात सगळेच चित्र पूर्ण होत नाही. तिने गोपारावांना पत्र लिहायला सुरुवात केली... आपण अमेरिकेत येऊन पोहोचल्याचा मला अत्यानंद झाला. माझे आता एकटे पण संपले. आपण लवकरात लवकर रोसेलला यावेत. तुमच्याशिवाय माझा खरंच निभाव लागणार नाही. आपणास एक सूचना करायची आहे. या देशात कोणी रिपोर्टर भेटला तर आपले मत कोणात्याही विषयावर व्यक्त न करावे. धर्माविषयी जपून बोलावे. आपण काही बाही बोललात तर परिणाम अनिष्ट होऊ शकेल. म्हणून स्पष्ट लिहिण्याचे धाडस केले. अन्यथा घेऊ नये. दुसरी गोष्ट आपण बरेच दिवसानंतर भेटणार आहात. भेटीच्या वेळी मी कसे वागावे याबद्दल कळवावे. इकडच्या स्वागताच्या पद्धती वेगळे आहेत. माझी प्रकृती तितकीशी ठीक नाही. आपण आलात की माझी सर्व दुखणे ठीक होईल. तेवढ्यानेच आनंदी इतकी थकली की, नुसती पडून राहिली. दोन-तीन दिवस आनंदी पडूनच होती. वाचणे, काही करण्याची इच्छाच होत नव्हती. मावशीने डॉक्टरची औषध सुरू केले. दुसऱ्या दिवशी सकाळी टपाल आले. वर्तमानपत्राचा एक अंक होता. सानफ्रान्सिस्को मधील ते एक छोटेसे वर्तमानपत्र होते. ती वाचायला लागली.. एका भगव्या वस्त्रधारित गोपाळराव जोशींच्या भाषणाचा वृत्तांत होता. "आदर्श स्त्री" हा भाषणाचा विषय होता. त्यांची बायको "फिली " ला वैद्यकीय कॉलेजमध्ये शिकत आहे. हाही उल्लेख होता. त्यात गोपाळरावावर बरेच ताशेरे ओढले होते. आनंदी ज्या मरणाला भीत होती तेच उभे राहिले होते. शरमेने तिचा जीव गोळा झाला. " आदर्श स्त्रीची" व्याख्या करताना गोपाळरावांनी खूप तारे तोडले होते. अमेरिकन स्त्रियांची यथेच्छ निंदा केली होती. त्यांना वेश्या प्रमाणे म्हटलं होते. त्यांचा पोशाख, रहनसहनवर भरपूर टीका केली होती. या उलट हिंडू स्त्रिया किती विनयशील, पतीच्या अर्ध्या वाचनात असतात, उंबऱ्या बाहेर त्यांचे पाऊल पडत नाही. लुगड्यामुळे त्यांच्या शरीराचा कोणताही भाग उघडा पडत नाही... वगैरे... वगैरे... सीता सावित्री द्रोपदी यांची उदाहरणे दिली होती. आनंदी वेड्यासारखी त्या वर्तमानपत्राकडे पाहत होती. सगळी विचारशक्तीच नष्ट झाली होती. मावशीने चहासाठी बोलावले म्हणून ती आत गेली. खिन्नपणे खुर्चीवर बसून राहिली. तेवढ्यात तेच वर्तमानपत्र घेऊन पमिला आली. आनंदी थरथर कापायला लागली. पमिलाने ते वर्तमानपत्र आई-वडिलांना, बहिणींना मोठ्याने वाचून दाखवू लागली. गोपाळ रावांनी अमेरिकन स्त्रीचे वर्णन केले ते सर्व मावशी प्रमिलाला लागू होत होते. म्हणून का त्या अपवित्र होत्या? त्या सीता सावित्री पेक्षा कुठेही कमी नव्हत्या. आनंदीच्या डोक्यात घणाचे घाव होत आहेसे वाटले. असह्य कळ्या आल्या. मावशी गंभीरपणे ऐकत होती. आनंदीला तिथे बसणे अशक्य झाले. ती हेलपटत खोलीत येऊन पलंगावर धाडकन अंग टाकले. प्रश्नांची भुतावळी तिच्या नजरेसमोर नाचत होती. पाच दहा मिनिटांनी मावशीने घेऊन तिच्या कपाळावर हात फिरवला. तिचे मन शर्मिंदे झाले होते. काय हे? मावशी वेश्या, पामेला.. तिला इतका कढ आला की, मावशीला मिठी मारून ओक्सीबोक्सी रडूं लागली. कार्पेटबाई अनुभव होत्या. त्यांनी जग पाहिले होते. स्त्रीचे हे नवीनच रुप त्या बघत होत्या. गोपाळरावांच्या भाषणाने कोणत्याही सुशील स्त्रीला राग येईल असेच होते. पण आनंदीची अवस्था पाहून, त्यांनी स्वतःला सावरले. मोकळेपणे तिच्या पाठीवर थोपटत राहिल्या. म्हणाल्या, तुझ्या नवऱ्याने छान भाषण दिले. आम्हा सर्वांना खूप मजा आली. म्हणजे? मावशीला, प्रमिलाला त्या भाषणांने काहीच वाटले नाही? त्यांनी ते सर्व भाषण थट्टेवारी नेले. मावशी तिला थोपटत इतर विषयांवर बोलत राहिल्या. आनंदीने अविश्वासाने मावशीकडे बघितले पण तिला थांग लागला नाही. *क्रमशः* संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख. ************************************************
👍 🙏 2

Comments