Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 18, 2025 at 05:57 PM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - ३५. गेल्या दीड दोन महिन्यात दोन-तीन वेळा आनंदी फिलाडेल्फियाला जाऊन आली. खोली सोडली. मैत्रिणींचा निरोप घेतला. आबीच्या गळी पडून खूप रडली. चित्र हरवल्याची सांगितल्यावर आबीला काहीच वाटल्याचे दिसले नाही. आनंदी विव्हल झाली. मावशीकडे गोपाळकांची वाट पाहणे एवढेच काम होते. लवकर येण्याबद्दल दोन-तीन पत्र लिहिले. जुजबी उत्तर आले. त्यात डंक आणि विखार नेहमीप्रमाणेच होता. हल्ली लांब पत्र नसायची. पण विंचवाच्या नांगी प्रमाणे वाक्य असायचीच. तुम्ही आता मोठ्या विद्वान झालात. तुमच्यापुढे माझी काय लायकी? मी काय बोलावे बोलू नये हे तुमच्याकडून शिकण्याची वेळ आली. तुम्ही कार्पेटर बाईकडे फुकट खाता म्हणून लाचार आहात तसा मी नाही... मी सत्वस्य ब्राह्मण आहे. अमेरिकन लोकांची पर्वा करायचे मला कारण नाही. अमेरिकन वेसवा हिंदू स्त्रियांच्या पायाशी देखील बसण्याची लायकी नाही. येणार किंवा नाहीही. मी लवकर यावे असे वरवर म्हणता, मी तुमचे अंतरंग जाणतो. असेच वेडेवाकडे कुत्सित विचाराने भरलेले पत्र ते सारखे पाठवीत असे. आनंदीला किती घायाळ करू, तिला किती जखमा करू, वर्मी घाव कसा घालू, असे त्यांना झाले होते. त्यांच्या लिखाणातले विष आता भराला आले होते. आनंदीने ठरवले मनाला लावून घ्यायचे नाही. ती शरीराने, मनाने अगदी खचून गेली होती. जसे शंकरांनी विष पचवले, तसे आपण नवऱ्याच्या पत्रातला विखार पचवला तरच जगू शकू.. मावशीला त्यांच्या पत्राबद्दल काहीच माहित नसायचे. त्यांनी चेष्टा मस्करी केली तर उसणे हास्य आणून वेळ निभावून घ्यावी लागत असे. गोपाळराव कधी येतील माहित नव्हते. त्यांची व्याख्याने अमेरिकन स्त्रियांवर, ख्रिस्ती धर्मावर, टीका चालूच होती. ती प्रेमाने ओथंबलेली पत्र लिहीत. त्यांची उत्तरे ते चमत्कारिक पाठवत असे. रमाबाईंना बोलावल्याबद्दल विचारल्यावर शिव्यांची लाखोली वाहिलेले पत्र आले. वरून नेहमीप्रमाणे विखराने भरलेले पत्र आले. त्या दिवशी आनंदी खोलीत खूप रडली. मी यांच्या प्रत्येक आज्ञा पाळते. शब्द झेलते. तरी यांचे समाधान नाही. यांचे मी काय वाकडे केले म्हणून असे छळतात? आसपासची जोडपी पाहिली त्यांचा आनंद, श्रृंगार, रसिकपणा पाहिला की कुठेतरी मनात कळ उठत असे. यांनी लग्न कशासाठी केले? आपल्या न कळत्या वयात, आपल्याला समजही नव्हते, तेव्हा शारीरिक सुख ओरबडून घेतले. आपल्याला आनंदा व्यतिरिक्त त्रासच होत होता. अगदी धास्ती घेतली होती. पुढे त्यांनी अशा प्रकारचे सुख कधी घेतलेच नाही. माझ्या मनाचा विचार करण्याचा स्वभावच नव्हता. कोणत्याच हिंदू पुरुषाचा नसतो. तिथे असताना सतत त्यांच्या दडपणात असल्याने त्या सुखाची कधी इच्छाच झाली नाही. पण इथे वातावरण पाहिल्यावर मन कधी कधी फार अस्वस्थ होई. रोसेलला कंटाळल्यासारखे झाले होते. गोपाळराव अमेरिकेत येऊनही बायको पासून इतके लांब राहतात याबद्दल मावशीच्या घरात कुजबूत चाले. निकालाचा दिवस जवळ आला होता. बेचैनी आणखीच वाढली. निकालाच्या दिवशी आनंदी खोलीत एकटीच विचार करत बसली होती. खाणे पिणे सुचले नाही. काय असेल निकाल? अंधारात उडी घेऊन जीव झोकून दिला होता. जर यश मिळाले नाही तर जगभर हसे होईल. पण पैशापरी पैसे गेले. प्रकृतीचे मातेरे झाले. सर्वच संपेल. आनंदी विचारांच्या बेहोशीत असतांना, धावत एमिली आली. आनंदीला गदागदा होती. तोच मावशी, पमिला, मिस्टर कार्पेट तिच्या खोलीत आले. सगळे आनंदात होते. तीच फक्त निराळी एकाकी अवस्थेत होती. मावशीने तिच्या पाठीवर थोपटले. गदगदून म्हणाली, अग आनंदी! तू पास झालीस. तिने डोळे विस्फारुन मावशीकडे पाहिले. पास झाले? यश मिळाले? सगळ्या कष्टाचे चीज झाले? आनंदाने नाचावेसे वाटले. पण हास्य बाहेर येईच ना! ती तशीच बघत होती. मावशी म्हणाली, अगंऽ! तू पहिल्या वर्गात पास झालीस. तू डॉक्टर झालीस. मावशीचे शब्द लांबून कुठून तरी ऐकू येत होते. मिस्टर कार्पेटन म्हणाले, डॉक्टर आनंदी जोशी, मी तुमचे अभिनंदन करतो. डॉक्टर आनंदी जोशी...? खरंच का? डॉक्टर.. डॉक्टर....डाॅक्टर आनंदी जोशी... होय! खरे आहे. तिन्ही मुली टाळ्या पिटून आनंद व्यक्त करीत होत्या. नाचत होत्या. डॉक्टर आनंदी जोशी असा जप करीत खोलीतभर हुंदडत होत्या. आनंदी भानावर आली. मन सैल झाले. शिळेला प्रभू रामचंद्राचे पाय लागले. ताप कुठल्या कुठे पळाला. उभी राहत म्हणाले, मावशी, खरच का? अगं खरच ....अगदी खरंच..! हे बघ, तू डॉक्टर झाल्याची तार आली. आनंदी गहीवरुन म्हणाली, मावशी, या यशाचे सारे श्रेय तुझे आहेत. म्हणत मावशीच्या गळ्यात अर्धवट हसत अर्धवट रडत म्हणाली. मिस्टर कार्पेटच्याही डोळ्यात पाणी तराळले. रुद्ध कंठाने म्हणाले, आमचं कसलं श्रेय? ही तुझी मेहनत आहे. तू रात्रंदिवस अभ्यास केला. श्रम घेतलेस, प्रतिकूल परिस्थितीशी झगडलीस. यश मिळवलेस. तुझ्यामुळे आमची मान उंचावली. मला तुझा फार अभिमान वाटतो. मावशी गंभीरपणे म्हणाली, तुझा नवरा इथे असता तर... आनंदीचे मन कोमेजले. हिरमुसली. खोटे हसत म्हणाली, अगं मावशी, येतील ते. मी डॉक्टर झाल्याशिवाय माझे तोंड पाहायचे नाही असा त्यांनी पण केला होता. मग सारे जण खाली गेले. आनंदीला हत्तीचं बळ आलं. शेजाऱ्या पाजारांच्या अभिनंदनाच्या वर्षावात न्हाऊन निघाली. पमिलाला सोबत घेऊन पोस्टात गेली. गोपाळरावांना रोसेलला येण्याबद्दल तार केला. दोन-तीन दिवस गेले तरी तारेला उत्तर आलेच नाही. तिला कान कोंडल्यासारखे झाले. मावशी व तिचा नवरा आपल्याकडे चमत्कारिक नजरेने बघत असल्याचा भास व्हायला लागला. एवढे मोठे यश मिळाले पण नवऱ्याच्या शाबासकीचा हात पाठीवर फिरवायला इथे नसावे हे विलक्षण होते. यशाचा आनंद नासवणारी घटना होती. क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.
😢 👍 🙏 5

Comments