
Yuti's Hub Library
June 18, 2025 at 05:57 PM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - ३६.
आनंदी बाह्यतः आनंदात असल्याचे दाखवत होती. पण त्यात जीव नव्हता. मेजवानण्या झडत होत्या. पण त्यात तिला आनंदापेक्षा दुःखच जास्त वाटत होते, पण आतल्या आत. वरून हास्य दाखवावेच लागत असे. दुसऱ्यांकडे जाण्याचे ती सहसा टाळत असे. पण त्या दिवशी मावशीच्या मैत्रिणीने पार्टी ठरवली. तिला नकार देणे शक्यच नव्हते. मनावर मोठे ओझे घेऊन पमिला बरोबर पार्टीला गेली. मावशी नव्हती आली.
नेहमीप्रमाणेच पार्टी झाली. भाषणे, खाद्यपदार्थ, हास्यविनोद होत होते. आनंदीला कशातच रस नव्हता. पण वरवर दाखवावे लागत होते. संध्याकाळच्या सुमारास पमिला व आनंदी घरी परतल्या. कणकण वाटत होती. असे किती दिवस चालायचे? किती दिवस मावशीकडे निरोद्योगी राहायचे? मन कुरतडत होते.
दोघी घरात आल्या. सगळीकडे दिव्यांचा झगझगाट पाहून तिला आश्चर्य वाटले. मावशीला दिव्यांचा झगमगाट आवडत नाही हे आनंदीला माहीत होते. घरातले सारखे काहीतरी गुपित लपवत असल्यासारखे वाटत होते. तिला वाटले, आपल्या मनाचा भ्रम असेल. थकून ती डायनिंग टेबलवर बसली. मावशी जवळ येऊन म्हणाली, थकली असशील खोलीत जाऊन पड. जेवणाचं झालं की, बोलावते. तिलाही पडावेस वाटत होते. ती आपल्या खोलीत गेली. दिवा लागलेला पाहून तिला आश्चर्य वाटले. खोलीत भगव्या वस्रात कुणीतरी असल्याचा भास झाल्यासारखे वाटले. तोच तिला दारातच खोकल्याची मोठी उबळ आली. पाठमोरा उभ्या व्यक्तीने मागे वळून बघितले. दृष्ट्टादृष्ट झाली. अग बाईऽ! गोपाळराव होते .
ते हळूहळू चालत तिच्यापर्यंत आले. तिला कळेना. कसे वागावे? ती खाली वाकली. हिंदू स्त्रिया पतीला नमस्कार करतात तसा तिने केला. गोपाळराव काहीच बोलले नाही. तिक्ष्ण नजरेने पाहत राहिले. दारात मावशी, तिन्ही मुली, मिस्टर कार्पेटर मोठ्याने हसत टाळ्या वाजत उभे होते. आनंदीने तिरप्या नजरेने नवऱ्याकडे पाहिले. त्यांना ते हसणे, टाळ्या वाजवणे पसंत नाही स्पष्ट दिसले.
खाली मान घालून व्यस्थित मनाने विचार करीत राहिली. एकीकडे पूर्व होती दुसरीकडे पश्चिम. दोन भिन्न संस्कृतीच्या पाटात आनंदी मात्र चेंगरली होती.
आनंदीच्या चित्तवृत्ती बधीर झाल्या होत्या. एकीकडे नवरा आल्याचा आनंद... एकाकीपणा संपल्याची जाणीव, पण मनात कुठेतरी खटकतही होते.
मावशी व तिच्या घरच्यांना काय वाटत होते हे त्यांच्या डोळ्यात वाचता येत होते. गोपाळरावांच्या दर्शनाने त्यांचा हिरमोड झाला होता. भगवी वस्त्रे, अशक्त लहानखोरे शरीर, गाल बसलेले, डोक्यावरची शेंडी, समोरचे दोन दात पडलेले, त्यामुळे ते खूपच वृद्ध दिसत होते.
मावशीने दोघांनाही खाली आणून दिवाणखान्यात बसवले. त्यांच्यापुढे खाद्यपदार्थांच्या बशा ठेवल्या. पदार्थाकडे पाहून, तुटतपणे गोपाळराव म्हणाले, मला हे खाता यायचं नाही. मि. कार्पेटांनी विचारलं, का? आज एकादशी आहे. आम्ही हिंदू लोक काही खात नाही. मावशीचा हिरमोड झाला. तिने फळांची डिश पुढे केली तर, म्हणाले ,हेही खात नाही. मी अस्सल हिंदू आहे. त्यांनी फक्त चहा घेतला. हिंदू धर्माबद्दल, एकादशी, शिवरात्र, सोमवार वगैरे उपासांबद्दल, आपल्या थोर धार्मिक परंपरेबद्दल सारखे बोलत होते. जीव गेला तरी बेहतर. पण धर्म टिकलाच पाहिजे. असे आपले मत प्रतिपादन करीत होते.
तिन्ही मुली केव्हाच बाहेर निघून गेल्या होत्या. त्यांनी गेल्या महिन्यापासून आनंदीचा नवरा आल्यावर बरेच बेत आखले होते. पण त्यांचा हिरमोड झाला. चहा पाणी आटोपल्यावर दोघेही आपल्या खोलीत आले. आनंदी बरीच सावरली होती. गोपाळराव बॅगेतले कपडे काढत होते. आनंदी म्हणाली, फळे खायला काय हरकत होती? आणि एकादशी कधीपासून करायला लागलात? हिंदुस्तानात तर तुम्ही एकादशी, सोमवार करत नव्हता. उलट थट्टा, टवाळकी करत होता. अगंऽ! हिंदुस्थानात करत नसलो तरी अमेरिकेत करायला काय हरकत आहे? आपल्या धर्माचा स्तोम आपणच वाढवायला हवा. आणि मोठ्याने हसले. त्या तुझ्या कार्पेटरला कसं चमकावला बघितलंस? आपण हिंदू कमी नाही हे त्यांना कळायला हवं.
आनंदी फार गंभीर झाली. शरीरातील उमेदच मावळली. हातपाय थरथरायला लागले. डोकं भयंकर दुखायला लागले. त्यांचे कपडे काढणे चालूच होते.
आनंदीने विचारले, भगवे कपडे कशासाठी? हसत म्हणाले, मी संन्यास घेतला. पण संन्यास घ्यायला बायकोची परवानगी लागते. बायको... बायको राहिली तरच परवानगीची जरूर... असं नका हो बोलू... खरं तेच बोलतोय! आता तुम्ही डॉक्टर झालात. विद्वान झालात. आम्ही काय साधे पोस्टेय! आमच्याशी बायकोचं नातं तुम्ही कसे पाळाल? तिला खोकल्याची उबळ आली.
शिवाय अमेरिकेत तीन वर्षे एकट्या राहिल्यात.... तिने डोळे विस्फारुन नवऱ्याकडे बघितले. त्यांचे शब्द सर्वांग जाळत गेले. ते म्हणाले, प्रत्यक्ष सीताबाई बद्दल लोकोपवाद होता. इथे तर काय सगळी सुखे हात जोडून उभी.... जोरात खोकल्याची उबळ आली. कपाळावरच्या शिरा तडतडल्या. मनातून त्यांना आपल्याविषयी तसं काहीच वाटत नाही याची तिला पक्की खात्री होती. पण दुसऱ्याला छळण्यात, दुखवण्यात, घायाळ करण्यात त्यांना अत्यंत आनंद वाटत होता.
खोकला दाबीत, छातीवर हात ठेवत आनंदी म्हणाली, आता हे भगवे वस्रे टाकून द्या. आणि पॅंट घाला किंवा आपला पारंपारिक हिंदू पोशाख घाला. त्यात काय मजा? चमत्काराशिवाय नमस्कार नाही. अगं! सानफ्रान्सिस्कोला काय मजा आली ...माझ्या भोवती बातमीदारांचा घोळका जमा झाला. एका दिवसात मी प्रसिद्ध झालो. म्हटलंच आहे....
" प्रसिद्धः पुरुषो भवेत्।"
आनंदीला खोकल्याची मोठी उबळ आली. थांबता थांबेना. जीव कासावीस झाला. चेहरा पांढरा फटक पडला....
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
🙏
👍
😢
4