
Yuti's Hub Library
June 18, 2025 at 05:58 PM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - ३७.
आनंदीची विकलावस्था पाहून, गोपाळराव तिच्याजवळ आले. तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिले. उबळ थांबल्यावर तिने त्यांच्या डोळ्यात बघितले. ते स्वच्छ, निर्मळ, तिच्याविषयीच्या प्रेमाच्या करुणाईच्या भावनेने ओथंबलेले होते. इतकी वर्ष लग्नाला झाली पण अजून खरे गोपाळराव सापडलेच नव्हते, समजलेच नव्हते.
कुत्सिक वाकडेतिकडे लिहिणारे, बायकोकडून अभ्यासाशिवाय दुसरी कुठलीही अपेक्षा न ठेवणारे, अभ्यास केला नाही तर वेताच्या छडीने निष्ठूरपणे फोडून काढणारे, बायकोच्या प्रकृतीच्या काळजीने विव्हळ, व्यग्र होणारे ,कोणते गोपाळराव खरे? हेच तिला कळेना. मनुष्य स्वभाव चमत्कारिक परस्परविरोधी विचारांचे धागे गुंफलेले असतात हे तिला माहीत होते. परंतु एकाच माणसांमध्ये विविध रंगाचा शिडकाव असू शकतो हे एक आश्चर्य आहे.
गोपाळरावांनी तिचा चेहरा निरखून न्याहळला. तो अशक्त, रक्त विहीन चेहरा पाहून त्यांना भडभडून आले. पाठीवरून हात फिरवत म्हणाले, तुझी अगदीच दशा झाली. तू मला कळत होतीस पण मीच खरे मानले नाही. आणि स्वतःला शिव्या देऊ लागले. स्वतःच्याच गालफाटात मारून घेऊ लागले. आपल्याच नादात राहिलो. तुझ्या तब्येतीची चौकशी केली नाही. वगैरे.. वगैरे...
आनंदीला एकदम गहिवरून आले. दोन-तीन वर्षाचे श्रम, उपासमार सारे एका क्षणात विसरली. मन सुखावले. ती त्यांच्याजवळ गेली. मराठीतून तिला खूप बोलायचे होते पण जिभेवर मराठी शब्दच येईना. पराकाषटा केली पण जमेना. मग इंग्रजीत म्हणाली, असं नका हो बोलू... तुमचा काय दोष? ऐकले मात्र आणि गोपारावांचे डोळे बदलले. पत्रातील कुत्सिक भाव त्यात होते. ती घाबरली. ते कुत्सित हसत म्हणाले, अरे वाऽ! छानऽ.. बायको नवऱ्याची इंग्रजीत बोलते. आमच्या पितरांची आत्मे खरोखर स्वर्गात प्रसन्न होतील. अहोऽ, काय करू? मराठी शब्द जिभेवर येत नाही. वाऽ! तुमचे नवीन नवीन एक एक थेरच आहे. स्वतःची मातृभाषा तुम्ही विसरलात? मोठ्या विद्वान डॉक्टर बाई तुम्ही!
आनंदी पुन्हा दरीत कोसळली. भीतीने मन हादरत होते. अंग शहारत होते.
तेवढ्यात पमिला जेवायला बोलायला आली. दोघेही गंभीर चेहर्याने खाली आले. आनंदीच्या शाकाहारी जेवण्याचे पान वेगळे होते. गोपाळरावां करिता फळाचा रस होता.
जेवणे चालू असताना दुपारी तुटक वागणारे गोपाळराव आता निरनिराळ्या कोट्या करून मुलींना हसवत होते. प्रवासातल्या, हिंदुस्थानातल्या, चीन मधल्या गमती जमती सांगितल्या. कॉर्पोरेट मावशीचे सांधे धरतात त्यावर आयुर्वेदिक उपाय सांगितला. पुरातन काळापासून चालत आलेल्या आयुर्वेदाची महती गाईली. जेवणाची बैठक चांगली रंगली. जावई दिसायला बावळा, बोलायला चमत्कारिक असला तरी, अंगी नाना कळा असल्याचा प्रत्येय मावशीला आला.
जेवण झाल्यावर गोपाळराव आनंदी आपल्या खोलीत आले. गोपाळराव म्हणाले, इथे एकच काॅट दिसतो. ती म्हणाली इकडे तशीच पद्धत आहे. पण मी संन्यास घेतला आहे. थोड्या वेळ ती उभी राहिली. गोपाळराव झोपल्याशिवाय तिला निजने प्रशस्त वाटत नव्हते. तिला तिचेच आश्चर्य वाटले. तीन वर्षाने नवरा भेटला आहे. पण मन फुलत कसं नाही? मग तिचे तिलाच जाणवले. मनात वीज चमकली. या पुरुषा बद्दल मी कधी बहरलेच नाही. मनात तसली पालवी कधी फुललीच नाही.... अंतरमनाला तसा फुलोरा कधी आलाच नाही...
तिला खूप थकल्यासारखे वाटत होते. अंथरुणावर केव्हा पडू असे झाले होते. धीर धरून म्हणाली, आता निजावं... तुम्ही निजा. तुम्ही निजल्याशिवाय मी कशी निजणार? वाऽ वाऽ वाऽ मोठ्या आर्य ललनाच लागून गेलात.... दुसरं अंथरून घालाव म्हणतो... तिला कळमळल्यासारखे झाले. आता अगदीच तिला उभे रहावे ना. अंग तापले. डोळे दुखायला लागले. ती म्हणाली, काय हवं ते करा. मी झोपते. दिवा मालवायला गेली तर म्हणाले, तुम्ही झोपा. दिवा राहू दे. मला वाचायच आहे.
तिच्या डोळ्यांची भयंकर जळजळ होत होती. ती अंथरुणावर पडली. डोळ्यावर दोन्ही हात दाबून धरले. गोपाळरावांनी मोठमोठ्याने गीता वाचायला सुरुवात केली. उद्देश हा की, कार्पेटर पती-पत्नींना ऐकू जावे. आणि दुसऱ्या दिवशी त्याबद्दल विचारावे. ग्लानीमध्ये ती तशीच पडून राहिली.
कितीतरी वेळाने तिला जाग आली. जवळ गोपाळराव होते. त्यांचा हात अंगावर होता. तिला मोठ्याने ओरडावेसे वाटले. शरीर शहारले. तो जुना स्पर्श तिला भयंकर वाटला. तिला कल्याण मधल्या पहिल्या शरीर संबंधाची आठवण झाली. डोके विलक्षण दुखायला लागले. खोकल्याची मोठी उबळ आली. त्यांनी तिच्या पाठवर हात फिरवला. म्हणाले, मी तुझी फारच हयगय केली.
तिला त्यांची किव आली. बायकोने जे सुख द्यायचे असते ते आपण यांना कधीच दिले नाही. उपाशीच ठेवले. त्यांचा स्पर्श आता तिला वेगळाच वाटत होता. त्या स्पर्शातला विकार संपला होता. खोकला दाबित म्हणाली, तुमची निराशा झाली. ते म्हणाले, छे! छे! स्वस्थ पडून राहा. आधी तुझी तब्येत सुधारायला हवी. वात्सल्याने तिच्या अंगावर हात फिरवत राहिले. ती म्हणाली, एक विचारू? विचार की! बापूसाहेब मेंहेंदळेंशी तुमचा ओळख आहे? आहे थोडी. का?
माझ्या तब्येतीमध्ये फरक पडत नाही. इथली औषधी लागू पडत नाही. मी मरते असे वाटते. वेडी की खुळी! अगं, साधा थंडी ताप असेल. श्रमामुळे, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे तब्येत बिघडली असेल. म्हणून काय कोणी मरतं का?
तुम्ही जेवताना मेंहेंदळेंचा उल्लेख केला. माझी मावशी जलोदराने मरण्याच्या दारी गेली होती. त्यांचे औषधाने ती परत आली. मी जर त्यांचे औषध घेतले तर...?
गोपाळराव मोठ्याने हसले. काय झाले हसायला? हसू नको तर काय करू? तुम्ही इतक्या लांब येऊन डॉक्टर झालात. तुम्ही दुसऱ्यांना औषध द्यायची तर त्या मेहेंदळ्याचे काळे चूर्ण घेणार? अहोऽ, ते मोठे म्हणजे काय? " गावढ्या गावात गाढवी सवाष्ण " वैद्या जवळची जुनी औषधे... काय पण विचार करते. मगाशी बोललो ते या साहेब लोकांना बनवण्यासाठी...
गोपाळराव कुत्सितपणे हसले. तिच्या अंगावरचे पांघरुण नीट केले. कपळाला हात लावला तर ते तापले होते. तिला झोप येत नव्हती. अंगाची लाही लाही होत होती. तशीच पडून राहिली. गोपाळराव काही वेळाने झोपी गेले...
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
🙏
👍
😢
7