Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 21, 2025 at 09:59 AM
साबू ............. कौस्तुभ केळकर नगरवाला. लहान असताना कधी कधी चाचा चौधरी वाचायचा योग यायचा. रेल्वेनं कुठतरी गावाला जायचं असलं की, रेल्वेच्या बुकस्टाॅलवर हमखास चाचांशी भेट व्हायची. या चाचा चौधरीचा एक असिस्टंट असायचा , परग्रहावरून आलेला. पंधरावीस फूट ऊंच ,तगडा वगैरे वगैरे. त्याचं नाव होतं साबू. मला भेटलेला तो दुसरा साबू. पहिला साबू माझ्या आजीच्या शब्दसंग्रहात कायम असायचा. आंघोळीच्या साबणाला ती साबू म्हणायची. साबूनं अंग खसाखसा घास रे , साबू पाण्यात भिजत घालू नकोस ,असं तिचं सारखं सांगणं असायचं. आज ऐकदम साबू आठवला ,आणि ऐकदम साबणाविषयी प्रेम दाटून आलं. बेदींग सोप या शब्दाला काही स्कोप नाही. तो आपला डेली सोपसारखा रटाळ वाटतो. कोरडा ठणठणीत. साबूला कसा प्रेमाचा सुगंध आहे. आठवणींचा ओलावा आहे. मला ऐकदम ती रविवार सकाळ आठवली. आधीच ऊठायला ऊशीर झालाय. आज ग्राऊंडवर खुन्नसमॅच आहे. पण आंघोळीचा व्हिसा घेतल्याशिवाय, घराबाहेर ऊड्डाण करता येत नाहीये. बाहेर गँगचं शीळवादन सुरू झालंय. घाईघाईनं मी बुचकळून घ्यायला बाथरूममधे घुसतो. पाण्याची बादली अंगावर ऊपडी केली की झाली आंघोळ. जाताना साबण ओला करून जायचा . चीटींगचा हा आनंद, ईंन्जीनिअरींगवाल्यांच्या जी.टी.पेक्षा सुद्धा मोठा असायचा. या साबूंमध्येसुद्धा क्लास असतात. मोती, मैसूर संडल, अनुनाद ,वगैरे मंडळी फर्स्टक्लासवाली. ऊच्चमध्यमवर्गीय. दिवाळी अंकासारखी. दिलखुष. वर्षभराची कसक ऐका दिवसात धुवून काढणारी. आपल्या काॅलेजातली ऐखादी रोजक्वीन, दिवाळसणाला माहेरी आलीय आणि हा माझा खास मित्र ,अशी नवरोबाला माझी ओळख करून देतेय , अशा गुदगुल्या अनूभूती देणारी ही साबु मंडळी. अभ्यंगस्नानाची खरी प्रसन्नता अनुभवावी ती यांच्याबरोबर. डोव , पिअर्स हा साबुवर्ग ऐखाद्या छोट्याश्या , न ताणलेल्या पण भारी डेली सोपसारखा. त्या ऐका लग्नाची दुसरी गोष्ट टाईप. रोज सुंगध देणारा पण भसकन संपणारा. आमच्यासारख्यांना न परवडणेबल. मार्गोसारखी मंडळी ऊत्सवस्पेशल. पूर्वी हटकून गुडीपाडव्याला मार्गो वापरायचो. कडुनिंब स्पेशल. लिंबोणीच्या झाडाखाली आंघोळ केल्यासारखं अल्लड वाटायचं. लिरिल हा सगळ्यात रोमॅन्टिक साबु. ऊगाचच लाला...लाला..करत धबधब्याखाली बदाबदा बादल्या ओतत भिजत रहावसं वाटायचं. लक्स , संतूर वगैरे मंडळी टिपीकल मध्यमवर्गीय. नटनट्यांची स्वप्ने चघळत , दीड बादलीत स्वतः ला बुचकळून घेणारी. कष्टाने थकलेला देह आणि रापलेला चेहरा प्रत्येक क्षणाला , आपल्याला म्हातारा करीत असला ,तरी आम्ही म्हणायचं, ऊमर का पताही नही चलता.! हमाम, लाईफबाॅय हे साबु आमच्यासारख्या कष्टकरी वर्गाचे. आंघोळीलासुद्धा नाईलाज म्हणून हजेरी देणारे. आजचा दिवस ढकलायचा बाकी पुढचं पुढे. परवा अकोल्याला जायचा योग आला. ट्रॅव्हल्सची गाडी ऐका धाब्यावर पहाटे पहाटे थांबली होती. जवळच ऐक मोठा हौद होता. ऐक ट्रकवाला साबणाच्या फेसाने पांढराफट्ट होवून ,गार पाण्याने आंघोळ करत होता. साबण कुठलाय याच्याशी त्याला काही देणघेणं नसावं. दिवसभर ट्रक चालवायचाय. त्याला ऐनर्जी देणारी आंघोळ करत होता. वाटलं ,साबु कुठलाही असो, कठल्याही रंगाचा ,आकाराचा. रोजच्या जगण्याच्या लढाईला ऐनर्जीचा फेस मिळाला की झालं. मग रोजच्या आंघोळीचेही सोहळे होतील. प्रसन्न वाटलं. साबुविषयी मन वढाय वढाय झालं .आंघोळीला पळालो. साबु ओला करायला... ...बाहेर आलो. मित्राचा फोन आला. तुझी गाडी हवीय. साबुंना आणायला जायचंय. साबु म्हणजे सासरेबुवा. मला भेटलेला हा तिसरा साबु. त्याविषयी पुन्हा कधीतरी. ............
😂 ❤️ 👍 12

Comments