Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 21, 2025 at 11:28 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - ३८. पहाटे आनंदीला जाग आली. तेव्हा खूप बरे वाटत होते. ताप निघाला होता. अशक्तपणा होता. तो तर जन्मालाच लागला होता. गोपाळराव उठले होते. मोठे मोठ्याने स्तोत्र म्हणत होते. मोठ्याने म्हणू नका असे सांगावेसे वाटले. पण ती बोलली नाही. उपयोगही नव्हता. स्तोत्र संपल्यावर ते खोलीत फेऱ्या मारू लागले. एकदम थांबून विचारले, तुझा पदवीदान समारंभ अकरा मार्चला ना? होय! म्हणजे फक्त २२ दिवसच राहिले. पुढच्या दोन आठवड्यात मावशीने अनेक नामवंत स्थळे दाखवली. गोपाळराव सध्या बरे वागत होते. ब्रुकलीन जवळील ग्रीन वूड कंट्री पाहायला गेले. या ग्रीनवूड कंट्रीची कल्पना मजेशीर होती. परलोकवासी लोकांसाठी ते गाव वसले होते. तिथे छोट्या टुमदार बंगल्या होत्या. तिथे मेलेल्या माणसांचे आत्मे राहतात असा समज होता. जिवंतपणी माणसाने त्यातील एक घर निवडून ठेवायचे. व मेल्यानंतर आत्म्याने तिथे राहायचे. सगळ्यांना ग्रीन वूड कंट्री बघून खूप मजा आली. आनंदी मात्र गंभीर झाली. हे घर... इथे राहायचे. पण शरीराने नाही. आत्म्याने. आनंदी व गोपाराव दोघेच पुढे चालले होते. तिच्या मनातून ते घर जात नव्हते. ती म्हणाली, माझ्या आत्म्याला राहायला इथे एखादे घर घेतले तर...? कदाचित त्या घराचा उपयोग करायची वेळ लवकरच येईल. गोपाळरावांनी चमकून तिच्याकडे पाहिले. कृष शरीराची, अंगावरचे मास झडलेली, निस्तेज चेहऱ्याची आनंदी त्यांना नव्याने दिसली. त्यांचे अंतःकरण हलले. ही अशी का बोलते? असे विचार का तिच्या मनात येतात? खरेच ही आपल्याला सोडून जाईल का? क्षण मात्र त्यांचे मन थरारले. विवाहपासूनचे सगळे दिवस नजरेखा घालून सरकले. हिला आपण कोणतेच सुख दिले नाही. सारखा अभ्यासाचा जाच केला. अभ्यासाची चूड हिला लावली. ती जळत गेली.... ती मरेल का? हिचे व आपले श्रम वाया जाईल का? त्यांना घाम फुटला .असे व्हायला नको आहे.... ब्रुकलेनहून सर्वजण रोसेसला परत आले. आनंदीला श्रमाचा ताण पडला होता. पदवीदान समारंभापर्यंत पाच-सहा दिवस विश्रांती घेणे आवश्यक होते. दोन दिवसानंतर गोपारावांच्या नावे पत्र आले. फोडल्याबरोबर त्यांच्या झालेला कावराबावरा चेहरा पाहून, आनंदीने विचारले, कोणाचे पत्र आहे? अपराधी चेहरा करून म्हणाले, पंडिता रमाबाईचे. आनंदी ताडकन उठून बसली. तुमचा त्यांचा पत्रव्यवहार आहे? अगं, त्यांना मी सानफ्रान्सिस्कोहून पदवीदान समारंभाला येण्याविषयी पत्र पाठवले होते. बाॅडले बाईशी पत्रव्यवहार करून त्यांनी दिलेला चेक रमाबाईंना पाठवला. तुम्ही मला बोलला नाहीत. सांगितलं नाही का? मला वाटले बोललो असेल. कदाचित गडबडीत विसरलो असेल. तिला फार खंत वाटली. म्हणाली, माझं नशीबच फुटकं आहे. का काय झाले? मला माणूस धार्जीणं नाही. सुख माझ्या नशिबातच नाही. असं बोलू नकोस गं! ती म्हणाली, प्राक्तणापुढे कोणाच काही चालत नाही. लहानपणी आईने छळले. घोड्याच्या चाबकाने मारायला तिने कमी केले नाही. नव्या वर्षी लग्न झाले. तिचा वसा तुम्ही घेतला. तुमच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी आयुष्यभर झटले. पण मला तुमचा साधा विश्वासही संपादन करता आला नाही. गोपाळरावांना गलबलून आले. हिला आपण जन्मभर अतोनात त्रास दिला. नाना प्रकारे छळले. याची जाणीव त्यांना तीव्रतेने झाली. ते म्हणाले, अगऽ, चुकलं माझं. मी तुझी क्षमा मागतो. त्यांनी स्वतःच्या थोबाडात दोन-चार मारून घेतल्या. हे खरं म्हणजे त्यांनी मनापासून केले होते. पण आनंदीला ते नेहमीसारखेच नाटक वाटले. काही वेळाने आनंदीने विचारले, काय आहे पत्रात? ब्रिटिश प्रिन्सेस या जहाजातून रमाबाई मुलीसह इंग्लंडहुन निघाल्या आहेत. तीन-चार दिवसांनी बोट फिलाडेल्फीया बंदराला लागणार आहे. मी असं ठरवलं, रमाबाईंना घ्यायला मी पुढे जातो. तू दोन-तीन दिवसांनी ये. ते का? तुला थंडीचा त्रास होईल. आधीच तुझी तब्येत ठीक नाही. क्षणभर थांबून आनंदी म्हणाली, मीही तुमच्याबरोबर येणार. मलाही त्यांना भेटायची उत्सुकता आहे. ते म्हणाले, माझे ऐक. तू येऊ नकोस. ती म्हणाली, मी आजपर्यंत कधी हट्ट धरला नाही. आज धरते. कदाचित शेवटचाही असेल. येणार म्हणजे येणारच! आवाक होऊन ते बायकोकडे बघतच राहिले. त्यांनी समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला. पण ती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. ११ तारखेला पदवीदान समारंभ. आठ तारखेला आनंदी व गोपाळराव रवाना झाले. मावशी, मुली आणि मिस्टर कार्पेट वेळेवर येणार होते. फिलाडेल्फीया स्टेशनवर आबी आली होती. डीन बाॅडलेही आल्या होत्या. आबीने आपल्या घरी चालण्याचा आनंदीला खूप आग्रह केला. पण तिने ऐकले नाही. डीन बाॅडलेंनी दोन खोल्या तयार ठेवल्या होत्या. तिकडेच गेली. एवढ्याशा प्रवासानेही आनंदी खूप दमली होती. मनही बेचैन झाले होते. तिने नवऱ्याबद्दल त्यांच्या रंग रूपा बद्दल कोणाला काहीच सांगितले नव्हते. त्यांना पाहून आबीची झालेली निराशा आनंदीपासून लपली नाही. डीन बाॅडलेकडे दिवस गडबडीत गेलाय. बोट रात्री बंदराला लागणार होती. जेवण झाल्यावर आनंदी व गोपाळराव बंदराकडे निघाले. वारा झोंबरा होता. आनंदीचा खोकला वाढला होता. पण बंदरावर जाण्याचा हट्ट कायम होता. रात्री दोघे बंदरावर पोहोचले. आनंदीच्या नाकात तोंडातून पाणी गळत होते. मुर्च्छा येऊन पडते की काय असे तिला वाटू लागले. बंदरावर चौकशी केल्यावर बोट कधी येणार कोणालाच माहीत नव्हते. परत घरी जाणे शक्य नव्हते. भाड्याच्या पैशाचा प्रश्न होता. इथेच मुक्काम करायचे ठरवले. गोपाळरावांनी चौकशी केल्यावर एका कोळ्याकडे अगदी कमी पैशात राहण्याची सोय झाली. आनंदीचे अंग तापले. खोकला वाढला. ती भ्रमात असल्यासारखी बडबडत होती. सारखी मृत्यू विषयी बोलत होती..... क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.
😢 👍 🙏 4

Comments