Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 21, 2025 at 11:29 AM
!!! डाॅ. आनदीबाई जोशी !!! भाग - ३९. कोळ्याच्या घरात कशीबशी सोय झाली. आनंदी सारखी बडबडत होती. थंडीचा कडाका वाढला होता. परका देश, आजारी बायको, जवळ पैसे नाही. गोपाळराव हादरले. ती सारखी मृत्युविषयी बोलत होती. कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी काढत होती. ब्रुकलीन मधील मृतात्म्यांच्या घराविषयी बोलत होती. त्यांनी तिच्या अंगावर पांघरून गुंडाळले. देवाचे नाव घेत तिला थोपटत राहिले. तिचे मरण त्यांना दिसत होते. फार अस्वस्थ झाले. आपण आयुष्यभर हिला नाना प्रकारांनी छळले. सुखाचा, सहानुभूतीचा कधी एक शब्द दिला नाही. याचीच त्यांना खंत वाटली. आयुष्यात प्रथमच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरारले. रात्र कशीबशी गेली. उशिरा रात्री तिला झोप लागली. सकाळी खूप उशिरा तिला जाग आली. म्हणाली, आज छान वाटते. ते म्हणाले, रात्री मी गडबडून गेलो होतो. सर्व दिवसभर आनंदी उत्साहात राहिली. बोट चारला येणार अशी नक्की बातमी मिळाली. चारला दोघे बंदरावर आले. हळूहळू बोट धक्क्याला लागली. रमाबाई मुलीसह बाहेर येताना दिसल्या. जन्मजन्मांतरीची ओळख पटली. गोपाळराव पुढे होऊन त्यांच्याशी बोलायला लागले. आनंदी खाली मान घालून निर्जीव पुतळ्यासारखी उभी होती. तोल सावरत रमाबाई जवळ गेली. आणि हिंदू पद्धतीने नमस्कार केला. रमाबाईंनी तिचे हात हातात घेतले. रमाबाई सफाईदार इंग्रजीत आनंदीशी बोलत होत्या. तिच्याबद्दल माहिती विचारत होत्या. आनंदी जुजबी माहिती देत होती. तेवढ्यानेच तिला थकवा आला. अशक्तपणा वाटू लागला. गोपाळरावांनी गाडी ठरवली. आनंदीने रमाबाईच्या खांद्यावर मान टेकली. तिसऱ्या दिवशी पदवीदान समारंभ होता. रमाबाईंनी फिलाडेल्फिया शहरात विविध संस्थांना भेटी दिल्या. स्त्रियांच्या प्रश्नावर माहिती जमवली. डीन बाॅडले बाईने जेवणाची व्यवस्था केली होती. पण आनंदीने त्यांना लँड लेडीकडे घेऊन गेली. रमाबाई व छोटी मनोरमा मांसाहारी होत्या. एमिलीने पानात फारच थोडे पदार्थ वाढले. आनंदीने पानातले पदार्थ संपवले. परत ती कधी मागत नसे. तशीच बसून राहिली. रमाबाईचे बोलणे आणि जेवण चालले होते. त्यांच्या पानातले सूप संपले. त्यांनी खुणावले. एमिने लक्ष दिले नाही. त्या किंचित मोठ्याने मार्दव युक्त आवाजात म्हणाल्या, किती थोडं वाढले? माझे तर सोड माझ्या मुलीचे सुद्धा पोट भरणार नाही. एमीने तडफडत संपलेले पदार्थ वाढले. त्या झपाट्याने जेवत होत्या. मुलीलाही आग्रह करून खायला लावत होत्या. जेवन संपतांना आनंदीला मराठीत म्हणाल्या, तू आदर्श हिंदु स्त्री आहेस. त्यांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला नाही. त्या म्हणाल्या तू खरी खरी ब्राह्मण कुटुंबातील सासूरवाशीण आहेसत. कशी? अगं! जेवणासारखी रोजची आवश्यक गोष्ट. ही बया किती कमी वाढते? आणि तू संकोच्याने मागत नाहीस. कसं मागायचं? धीरच होत नाही. आपल्याला कोणी वाईट म्हणायला नको. तुला काय म्हणावे तेच कळत नाही. जेवणाचे तू भरपूर पैसे देते. तू फुकट जेवते असे नाही. तुझ्या जोड्याशी उभे राहायची यांची लायकी नाही. आनंदी म्हणाली, माझ्या घरचे वळण आहे. वाढणाऱ्याने भरपूर वाढावे. कसलं वळण घेऊन बसलीस? पैसे देऊन तीन वर्षे उपाशी राहिली. स्वतःचे हाल केले. शरीर बेचिराख केलेस. आनंदी काहीच बोलले नाही. दिवसभर ती रमाबाई बरोबर हिंडत होती. रमाबाईच्या बोलण्यात तथ्यांश होता. आपण संकोचलो नसतो तर शरीराचे असे हाल झाले नसते. अकरा मार्च उजाडले. सकाळी कार्पेट कुटुंब हजर झाले. सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत कार्यक्रम होता. आनंदीने गोपाळरावांना विचारले, मी पोशाख कसा करू? गोपाळराव गंभीर झाले. दोन चार दिवस ते विशेष बोलले नाहीत. सुतासारखे सरळ वागत होते. ती म्हणाली, गुजराती पद्धतीचे लुगडे नेसलेले तुम्हाला आवडत नाही. आज तुमच्या आवडीचे नऊवारी नेसते. वाऽ फारच छानऽ! आनंदीने जरी काठी पांढरे बनारसी लुगडे व मद्रासी रेशमी पोलका घातला. ते म्हणाले, मोहनमाळ, पाटल्या, कुड्या, नथ पण घाल. गोपाळराव तिच्याकडे बघतच राहिले. ती म्हणाली, माझं ऐकाल? तिला खात्री नव्हती ऐकतील म्हणून. बोला.. काय म्हणणं आहे? आपण घरंदाज हिंदू पोशाख करावा. बरं बुवा! तिच्या म्हणण्यानुसार त्यांनी धोतर, लॉंग कोट, कोशा परिधान केला. आनंदी बघतच राहीली. आज आश्चर्य घडले होते. अग्नी ज्वाला शितल झाली होती. वेळ होत आली. सगळेजण समारंभाच्या हॉल कडे गेलेत. डीन बाॅडले बाईंनी रमाबाईचे स्वागत केले. त्या गोऱ्या मुलींमध्ये नथ घातलेली शुभ्रवस्त्रावृत्ता आनंदी उठून दिसत होती. शेकडो लोक जमले होते. सर्वांचं लक्ष आनंदी कडे व रमाबाईकडेच होते. भाषणाला सुरुवात झाली. आनंदीच्या एका बाजूला रमाबाई व दुसऱ्या बाजूला गोपाळराव बसले होते. आबी व रमाबाईंची मुलगी मनोरमा पलीकडच्या खुर्चीवर बसल्या होत्या. अध्यक्ष बोलू लागले... म्हणाले, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. या कॉलेजच्या इतिहासात आजचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. हिंदुस्थानातल्या मिसेस आनंदी जोशींनी हिंदुस्थानची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान पटकावला आहे. टाळ्यांच्या कडकडाट्याने सभागृह दुमदुमून गेले. लोक उभे राहून तिच्याकडे कौतुकाने बघायला लागले. आनंदी लाजेने चूर झाली. शेवटी अध्यक्षांनी पदवीचा करंडक तिच्या हाती दिला. समारंभ संपला. जमलेल्या स्त्री पुरुषाने आनंदीभोवती एकच गर्दी केली. निरनिराळे आहेर, नजराने तिला दिले. बातमीदारांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं. प्रतिष्ठित खानदानी कुटुंबांनी पार्टीसाठी घरी येण्याची गळ घातली. घरी परतायला बराच उशीर झाला. आबीने निरोप घेताना म्हणाली, मी तुला काहीच दिले नाही. आनंदी म्हणाली, जरूरी नाही. तू पण माझ्यासारखी पास झाली आहेस. आबी म्हणाली, मी तुला एक गंमत देणार आहे. घरी कधी येते सांग. तुझ्याकडे यायला मुहूर्त लागत नाही. आबी म्हणाली, पण माझी एक अट आहे. तू एकटीनेच यायचे. सोबत कोणी कोणी नको. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यायचे आनंदीने कबूल केले. मग सर्वजण घराकडे परतली. क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.
👍 🙏 3

Comments