
Yuti's Hub Library
June 21, 2025 at 11:29 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - ४०.
जेवण झाल्यावर रमाबाई आपल्या खोलीत गेल्या. थोड्या वेळात बाहेर येऊन आनंदीला हाक मारून म्हणाल्या, डॉक्टर जरा खोलीत चला. मनोरमेचे अंग तापाने फणफणलय! आनंदी पटकन आत गेली. छोटी मनोरमा कन्हत होती. ताप चढत होता. आनंदीने तिला नीट तपासले. म्हणाली, ही माझी पहिली केस. उद्या परवा ताप जाईल. पण दुसऱ्याही दिवशी ताप उतरलला नाही. तिने अबीकडे येत नसल्याचा निरोप पाठवला. ती दिवसभर मनोरमा जवळ बसून राहिली. मनोरमा ग्लानीत होती. तोंडचे पाणी पळाले. रमाबाई वरवर धैर्य दाखवत होत्या. पण बेचैनी लपत नव्हती. आनंदी तहान भूक विसरून सारखी मनोरंजवळ बसून होती. क्षणाची झोप नव्हती. तिची ही पहिलीच केस होती. मनोरमाचे काही बरे वाईट झाले तर फार मोठे अपयश पदरी येणार होते.
सात दिवस उलटले. मध्यरात्री मनोरमाच्या जीवाची तगमग व्हायला लागली. रमाबाईच्या डोळ्यात पाणी तरारले. त्या स्तोत्र म्हणू लागल्या... स्तोत्र ऐकत असताना आनंदीने मनोरमेची नाडी तपासली. डोळे चकाकले. थोडा घाम आला होता. तिचा चेहरा उजळला. रमाबाईची प्रार्थना चालू होती. त्यांच्याजवळ जाऊन हलक्या आवाजात म्हणाली, घाम आला. आता काळजी नाही. रमाबाईंनी डोळे उघडले. मुळातले हिंदू संस्कार जागे झाले. त्यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. आणि रडायला लागल्या.
घाम जास्तच सुरू झाला. उजाडता उजाडता ताप पूर्णपणे उतरला. आनंदी समाधानाने आपल्या खोलीत जाऊन पडली. अंग जळजळत होते. छाती दुखत होती. खोकल्याची उबळ जोरात सुरू झाली. पूर्ण शक्तिपात झाला होता.
दिवसभर ती तशीच पडून राहिली. त्या पाच-सात दिवसात ती स्वतःला पूर्णपणे विसरली होती. परंतू शरीरात रोगाचे जाळे विणण्याचे काम चालूच होते. यातना असह्य होत होत्या. गोपाळराव तिच्या उशाशी बसून तिचे अंग चेपत होते. त्यांचा धीर सुटला होता. आठ दहा दिवसांची जागरण अंगावर आले होती.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आबी आली. हातात छोटी बॅग होती. आनंदीच्या शेजारी बसली. निस्तेज, पांढुरंका चेहरा बघून तिचा जीव गलबलला. गोपाळ रावांकडे तिच्या तब्येतीची चौकशी केली. आनंदी गोपाळरावांना म्हणाली, तुम्ही जरा मनोरंजवळ जाऊन बसा.
गोपाळराव गेल्यावर दोघीच खोलीत होत्या. आबी म्हणाली, उद्या इंग्लंडला जात आहे. आनंदीने विचारले, पुन्हा कधी भेटशील? मग तीच म्हणाली, भेट कशी व्हावी? आबी काही न बोलता नुसती रडत होती. आनंदी म्हणाली, तू भेटली नसतीस तर बरं झालं असतं. आजचे ताटातुटीचे दुःख सहन करावे लागले नसते. तू असं नको बोलूस गं!
आबीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपली मैत्रीण पुन्हा आपल्याला दिसणार नाही याची खात्री होती. तिने रडत रडत बॅग उघडली. आतून एक तसबीर काढली. आनंदी समोर धरली. ते तेच चित्र होते, जे आनंदी कडून अपुरी राहिले होते. नंतर हरवले होते. रोग पळाला. आनंदी उठून बसली. आबीला तिने मिठी मारली. अश्रू पुसत गदगदल्या स्वरात आबी म्हणाली, त्यादिवशी हे चित्र अपूर्ण राहून राहू नये म्हणून मीच पळवले. ते मी पूर्ण केले.
आनंदी म्हणाली, मला मला फार चुटपुट लागली होती. आज मला फार आनंद झाला. तू ते चित्र पूर्ण केलेस. आबी, मी काय म्हणाले होते आठवतय? काय गं?
आनंदी म्हणाली तुझी आजी माझ्यासारखी होती. माझी नात तुझ्यासारखी होईल असे म्हटले होते. पुढे कधी माझी नात तुला इंग्लंडमध्ये भेटली तर तू तिथे तिची आजी हो!
आबी थोड्यावेळ बसून तसबीर खुंटीवर अडकवून निघून गेली.
आनंदीच्या तब्येतीमुळे फिलाडेल्फियाला पाच-सात दिवस थांबावे लागले. पुढचा बेत ठेवायचा होता. गोपाळरावांचे निश्चित असे काही ठरत नव्हते. कधी म्हणायचे, अमेरिकन स्थायीक होऊ. की लगेच विचार बदले. कधी म्हणायचे हिंदुस्थानात लवकर जाऊन तिथे दवाखाना काढायचा.
आनंदीला अमेरिकेत राहणे पसंत नव्हते. इतके परिश्रम करून ज्ञान मिळवले त्याचा फायदा आपल्या देश बांधवांना व्हावासा तिला वाटे. देशाची थोडीफार परिस्थिती सुधारता आली तरच ज्ञानाचा उपयोग. कधी तिला वाटे, इथल्या मोठ्या दवाखान्यात नोकरी करुन वैद्यकीय शास्त्रातील मोठमोठ्या विद्वानांकडून ज्ञान संपादन करून एक दोन वर्षानने जावे...
अजून नक्की काहीच ठरत नव्हते. ताप उतरत नव्हता. अशक्तपणा इतका वाढला होता की दैनंदिन कामे करणेही शक्य होत नव्हते. थोडा ताप उतरल्यावर आनंदी व गोपाळराव रोसेलला परत आले. आठ पंधरा दिवस विश्रांती घेतल्यावर तिला थोडे बरे वाटू लागले. पण डोके दुखत होते. श्रमामुळे होत असेल असे वाटल्याने बोस्टनला जायचे ठरले. तिथलं वातावरण छान होतं. तिथे वेड्यांचे मोठे हॉस्पिटल होते. तिथलं ज्ञान संपादन करायचा तिचा विचार होता.
बोस्टनलाही तिला बरे वाटले नाही. गोपाळराव बेचैन झाले. वेगवेगळ्या डॉक्टरांचे औषध चालू होते. रोगाचे निदान होत नव्हते. प्रॉन्हीडम्स, हर्टफोर्डलाही जाऊन आले. पण गुण आलाच नाही. खोकल्याने पाठ सोडली नाही.
मावशीला तिचे लक्षण ठीक दिसेना. दिवसें दिवस आनंदीची प्रकृती खालावत असलेली पाहून त्या वेड्यापिस्या झाल्या. आनंदीवर त्यांनी स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम केले होते. तिची हुशारी, जिद्द, रुप सारे त्यांना आवडत होतं. त्यांचा थरकाप झाला. काय करावे म्हणजे हिला बरे वाटेल कळत नव्हते.
पुढचे निश्चित होत नव्हते. तिच्या यशाच्या बातम्या हिंदुस्तानातील वर्तमानपत्रात ठळक अक्षरात दिल्या होत्या. पुढाऱ्यांनी, नातेवाईकांनी, इष्ट मित्रांनी पाठवलेल्या अभिनंदनाच्या पत्रांचा पाऊस पडला होता. हिंदुस्थानात लवकर परत येण्याबद्दल लिहिले होते. पण नक्की काही ठरत नव्हते. एके दिवशी.....
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
👍
🙏
3