
Yuti's Hub Library
June 21, 2025 at 11:30 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - ४१.
एके दिवशी कोल्हापूर दरबारातून छत्रपतींचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते, हिंदुस्थानात लवकर परत या. आणि कोल्हापूरच्या दवाखान्याचा चार्ज घ्या. कोल्हापूर नोकरीत येणार असलात तर येण्याचा खर्च देण्यात येईल. या पत्राने पुन्हा खळबळ उडाली. काय करावे ठरेना. कोल्हापूरची जागा चांगली होती. अधिकाराची होती. शिवाय संगमनेरहून सासूबाईंना आणता आले असते. तिकडे त्यांचे फार हाल चालले होते. पण इकडचे शिक्षण थांबले असते.
कोणीतरी म्हटले, हवा पालटाने बरे वाटेल. शिवाय रमाबाईंना व गोपाळरावांना नायगारा धबधबा पाहायचा होता. मिसूरी संस्थानात गेल्याने गुण येईलसे वाटत होते. पण मावशीला मान्य नव्हते. आनंदीच्या अशा अवस्थेत इतक्या लांबचा प्रवास झेपणार नाही असे त्यांना वाटत होते. पण आनंदीच्या हट्टापुढे त्यांचा नाईलाज झाला.
धबधबा पाहून न्युयार्कला आल्यावर तब्येत आणखीच बिघडली. खोकलाही वाढला. दिवसभर अंथरुणावरच पडून राही. गोपाळांचा ठाव सुटला. फिलाडेल्फियाला स्त्रियांच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आले.
हॉस्पिटलमध्ये आठ-दहा दिवस ठेवण्यात आले. सर्व प्रकारच्या परीक्षा झाल्या. पण गुण येईना. प्रतिदिन शरीर खचत चालले होते. बॉडलेबाई रोज भेटून जात होत्या. त्या दिवशी मोठे डॉक्टर तपासून गेले. बाॅडले बाई गंभीर झाल्या. त्यांनी गोपाळरावांना बाजूच्या खोलीत बोलावून म्हटले, इथली हवा आनंदीला मानवत नाही. इथे ती दुरुस्त होऊ शकणार नाही. डॉक्टर बाॅडले बाईंनी मोठ्या प्रयासाने चेहऱ्यावरचे भाव लपवले. म्हणाल्या, इथे तिला बरं वाटणार नाही हे नक्की. मग कुठे वाटेल?
कोणत्याही रोगाला स्वदेशी हवा चांगली. तुम्ही लवकरात लवकर हिंदुस्थानात परत जा. तिथे तरी बरे वाटेल का? त्या गंभीरपणे म्हणाल्या, मी लपवून ठेवत नाही. तुम्ही तिला सांगू नका. एकच गोष्ट चांगली आहे की, रोग फुफ्फुसापर्यंत पोहोचला नाही. गोपाळराव लहान मुलांसारखे रडायला लागले. डॉक्टर बाॅडलेंनी त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या, परमेश्वरावर विश्वास ठेवा. कधीकधी मायदेशाच्या हवेने मोठे रोग बरे होतात.
स्वतःला सावरून गोपाळराव बाहेर आले. आनंदी जवळ जाऊन म्हणाले, आज मी कोल्हापूर दरबारला पत्र टाकले. आनंदी म्हणाली, पण माझी तब्येती अशी.. ते म्हणाले, अगं! हे गोरे डॉक्टर मूर्खच! आपण पुण्यात जाऊ. बापूसाहेब मेहेंदळेंचे औषध घेऊ. ते नक्की तुला बरे करतील. मग लवकर चला. कधी एकदा मेंहेंदेळेंचे औषध घेते व दुरस्त होते असे झाले.
गोपाळरावांना रडू आवरे ना. उठून ते व्हरांड्यात गेले. उपरण्याने डोळे पुसत राहिले.
सर्व मंडळी रोसेलहून न्यूयॉर्कला पोहोचली. तिथूनच इंग्लंडला जाण्याची बोट होती. मावशी फार बेचैन होती. तिला आनंदीकडे बघवत नव्हते. ही मुलगी बरी होणार नाही असे त्यांचे मन सांगत होते. न्यूयॉर्क पर्यंतचा दोन चार तासाच्या प्रवासानेच आनंदी विलक्षण थकली. खोकल्याची ऊबळ सुरु झाली. अंथरुणावर पडून राहावेसे वाटू लागले. डोळे जळजळत होते. हाता पायात कळा येत होत्या. पण आनंदीने कुणालाच सांगितले नाही.
बंदरावर जाण्याची वेळ झाली. तिचा उजवा डोळा सारखा लवत होता. ती गोपाळरावांना म्हणाली, लक्षण ठीक दिसत नाही. उजवा डोळा सारखा लवतो. आणि स्फुंदून स्फुंदुन रडू लागली. ते करड्या आवाजात म्हणाले, डोळा लवते तर लवू द्या. काही होणार नाही. रडण्याचा तमाशा नको.
तिने स्वतःला आवरले. कपडे केले. गाड्या आल्या होत्या. मावशींच्या गळी पडून रडली. मैत्रिणींनी मोठा पुष्पगुच्छ दिला. मावशी रडल्या. पण आनंदीने निग्रहाने डोळ्यात पाणी येऊ दिले नाही. निर्जीव पुतळ्याप्रमाणे निश्चल उभी राहिली. खूप रडायचे होते.... पण ....
गाड्या बंदरावर पोहोचल्या. सामान खाली उतरवले. एवढ्यात पमिला जवळ असलेली पिशवी कशी कोणास ठाऊक खाली पडली. पिशवीतले कॉड लिव्हरची ऑइलच्या बाटल्या फुटल्या. ऑइलने पिशवीतील सगळे सामान भिजून गेले. आणि आबीने दिलेली तसबेरीला तडा गेला. तसबीरीवर ऑइल ओघळले. आबीने दिलेले चित्र खराब झाले. आनंदी म्हणाली, अपूर्ण चित्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं पण ते असं नष्ट व्हायचं होतं. माझं नशीबही तसच आहे.
मावशीने तिच्या पाठीवरून हात फिरवून सांत्वन केले. तिला धायमकडून रडायवेसे वाटत होते. पण गोपाळरावांच्या धाकामुळे शक्य नव्हते .चित्राची अवस्था पाहून आनंदीच्या मनात काळा कुट्ट अंधार दाटला.
बोटीवर चढण्याची घंटा झाली. आनंदीने मावशीला व मिस्टर कार्पेटरांना हिंदू पद्धतीने खाली वाकून नमस्कार केला. मुलींना मिठीत घेतले. काही न बोलता मान खाली घालून बोटीत चढली. गोपाळरावही चढले.
बोट सुरू झाली. ज्ञान संपन्न होऊन देशाचे भले करण्यासाठी परत जायचे होते. यश मिळवले होते. पण दृष्टावले होते. आनंदीचे फर्स्ट क्लासचे तिकीट होते. गोपाळराव सेवक म्हणून खालच्या वर्गात होते. ते मधून मधून येऊन जात. सगळ्या वेळा तिला एकटीनेच काढावी लागे. रोगाशी लढणे फार कठीण होऊ लागले. दोन-तीन दिवस असेच गेले. आता पायातून कळा येत होत्या. छातीत कफ दाटला होता. गोपाळराव सारखे तिच्या शेजारी बसून होते. चौथ्या दिवशी समुद्र एकदम खळवळला. तुफान सुरू झाले. लाटांनी बोटीची पार दशा करून टाकली होती. बोट क्षणात बर्फावर चढे. क्षणात दरीत कोसळे. आनंदीचा ताप वाढला होता. केबिनमध्ये अंधार पसरला. आनंदीचे भान गेले. कुणीतरी राक्षस आपल्याला दरीत लोटतोय असे स्वप्न पडू लागले. आनंदीचा धीर सुटला. ती ओक्सीबोक्सी रडायला लागली. गोपाळरावांच्या पायाला मिठी मारून म्हणाली, माझा अंतकाळ जवळ आलाय. मी आता चाललेय. मावशीला नमस्कार कळवा.
गोपारावांनी तिला थोपटत म्हणाले, वेडी आहेस का? निघाल्यापासून रडली नाही. आता मोठ्याने रडतेस. असं काय करावं बरं?
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
😢
😮
4