
Yuti's Hub Library
June 21, 2025 at 11:30 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - ४२.
आनंदी पुटपुटत म्हणाली, माझ्या मनावर फार ताण पडलाय होऽ! कळायला लागल्यापासूनच आहे. रोसेलहून निघाले तेव्हापासून रडावेसे वाटत होते. मावशी दिशेनाशी झाली तेव्हा तर हंबरडा फोडावासा वाटला. पण.. पण.. तुमची फार भीती वाटते. त्या धास्तीने रडली नाही. पण आता शेवटची वेळ आली. आता धास्तीही संपली. ती मोकळेपणे रडू लागली.
गोपाळरावांनी डोळे पुसले. बायकोला थोपटत राहिले. बाहेर लाटांचा धिंगाणा चालू होता. वादळाचा वेग भयंकर होता. बोट खाली वर होत होती. गोपाळराव तिचे कपाळ चेपीत होते. तिला ग्लानी आली. किती वेळ गेला कुणास ठाऊक? वादळ संपले होते. लाटांचे तडाखे थांबले होते. लाटा शांत झाल्या होत्या. खूप वेळाने ती जागी झाली. उन्हे पडली होती. मनाला फार प्रसन्न वाटत होते. गोपाळराव म्हणाले, तुला छान झोप लागली होती.
ती म्हणाली, आज मला बरं वाटतंय! आता मी मरत नाही. मी नक्की जगेन.... गोपाळरावांनी तिच्या चेहऱ्याकडे बघितले. एक वेगळीच टवटवी दिसली. त्यांचे मन चरकले. चेहरा टवटवीत होणे बरे नाही. व्यथित मनाने त्यांनी औषधाचा डोज दिला. म्हणाले, स्वस्थ पड.
ती म्हणाली केसांच्या किती जटा झाल्या. केस विंचारायला हवेत. गोपाळ रावांनी फणी काढून तिच्या जटा काढू लागले. पण जमले नाही. केस तुटायला लागले. मग ती म्हणाली, मला उठून बसवा. मीच विंचरते. तिने हट्ट केल्यामुळे उठून बसवले. ती फणीने जटा काढू लागली. पंधरा-वीस मिनिटातच ती भयंकर थकली. छाती वाजायला लागली. फणी हातात तशीच ठेवून अंथरुणावर कलंडली. तिला ब्रांडीचा डोस दिला. स्वस्थ निजण्यास सांगितले.
नंतरचे पंधरा-वीस दिवस बरे गेले. ताप होताच. शरीर थकले होते. पण तिच्या मनाला उत्साह होता. डेकवर आराम खुर्चीत बसून पुस्तक वाचण्यात वेळ जात होता. बोट एकदाची लिव्हरपुलला लागली. तिथे दोन-तीन दिवस मुक्काम झाला. तब्येतीमुळे कुठे हिंडणे फिरणे झाले नाही. आबीला पत्र पाठवले होते. पण गाठ पडली नाही. हेनझाबा बोटीवर हिंदुस्थानची तिकिटे रिझर्व केली होती. बोट लगेच निघणार होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदीसह गोपाळराव हेनझाबा बोटीवर चढले. बोट प्रशस्त होती. आनंदीबाई चे तिकीट फर्स्टक्लास होते. केबिन दुसऱ्या मजल्यावर छान हवेशीर होती. हिंदुस्थानात पोहोचेपर्यंत काळजी नव्हती. दोन तासांनी बोट सुटणार होती. आनंदी केबिनमध्ये कॉटवर पडली होती. शेजारी गोपाळराव उभे होते. दुसऱ्या कॉटवर कोण्या मोठ्या लष्करी अधिकाऱ्याचे सामान पडले होते. थोड्या वेळात सहा फूट उंचीचा गोरापान लालबुंद लष्करी अधिकारी केबिनमध्ये आला. त्याचे लक्ष काॅटवरील विकलांग, दारिद्री स्त्रीवर पडली मात्र, त्यांनी आरडा ओरडा करून सगळ्यांना जमा केले. मग पर्सल, कॅप्टन आले, एखादे घाणेरडा गलिच्छ जनावराकडे पहावे तसे हे तीन गोरे अधिकारी या काळ्या जोडपाकडे बघत होते. कॅप्टन पुढे होऊन त्यांची तिकीट तपासली. म्हणाला, कोणा गाढवाने या बोटीची तिकिटे तुम्हाला दिली?
आनंदी उठून बसली. सर्वांग कापत होते. लज्जा, राग, अपमान अनेक संमिश्र भावना मनात उमटल्या होत्या. कॅप्टन म्हणाला, तुम्हाला उतरावं लागेल. ही बोट काळ्या लोकांसाठी नाही. गोपाळरावांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पैसे भरले. बायको अतिशय आजारी आहे. बोटीतून चढ उतार करणे व लंडनच्या थंडीत राहणे शक्य नाही. असे विनवले. पण ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत कोणीच नव्हते. कॅप्टनने नोकरांकरवी सामान धक्क्यावर फेकून दिले. शर्मिंदे देऊन दोघांनाही बोटीवर उतरणे भाग पडले.
हा आघात जबरदस्त होता. सुतकात बसावी तशी दोघेही एकमेकांकडे बघत बसली होती. दुसऱ्या दिवशी गोपाळरावांनी खटपट करून पी. अँड. ओ. कंपनीच्या पेशावर बोटीत जागा मिळवली. याही बोटीत हेनझाबा बोटीसारखाच प्रकार होता. गोऱ्या उद्दाम नोकरांच्या कृपेवर जगणे भाग होते.
पोर्ट सैद बंदरा पासून ताप चढला. खोकला सुरू झाला. अंगात मुळीच त्रास नव्हते. त्यामुळे तिला गोपाळरावांची सारखी मदत लागे. ते फर्स्ट क्लास मध्ये येऊन बसले की, नोकर कुरकुर करत. त्यांना जाण्यास सांगत. आंघोळीला पाणी देत नसत. जेवणात शाकाहारी पदार्थ नसत. पाव लोणीने ओकारी येई. एखाद्या वेळी भूक लागली, दूध मागितले तर शिल्लक नाही असे सांगितले जाई. पैसे देऊन सुद्धा उपासमार सहन करावी लागे.
बोटीवरच्या डॉक्टरचे नाव केर हार्डी होते. त्याला काळ्या लोकांबद्दल अतिशय तिरस्कार वाटे. त्याची वैद्यकीय शास्त्राची पदवी तिसर्या दर्जाची होती. त्याला कशी तरी या कंपनीत नोकरी मिळाली होती.
एके दिवशी आनंदीच्या छातीत इतका कफ दाटला की, श्वास घेणे दुष्कर झाले. अंग तापाने फणफणले होते. गोपाळराव फार घाबरले. नाईलाजाने डॉक्टरला बोलवायला गेले. डॉक्टर त्यावेळी केबिनमध्ये एका स्त्रीबरोबर मद्य प्राशन करीत होता. गोपाळरावांचे विद्रूप ध्यान पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अशा आनंदी क्षणी काळ्या स्त्रीला बघायला जाणे त्याच्या जीवावर आले. पण कपाळाला आठ्या घालून आनंदीच्या केबिनमध्ये आला. तपासल्यासारखे केले. म्हणाला हा मलेरिया आहे. क्वीनच्या गोळ्या घ्या. आनंदी म्हणाली, हा मलेरिया नाही. डॉक्टर म्हणाला, कोणासमोर बोलती आहेस? मीही डॉक्टर आहे. इंडियन? गोपाळराव म्हणाले, ती अमेरिकन विश्व विद्यालयाची एम.डी. आहे इंग्लंड मधल्या कोणत्याही कॉलेजपेक्षा श्रेष्ठ आहे.
केर हार्डी ताडकन उभा राहिला. म्हणाला, मी या बोटीचा मेडिकल ऑफिसर आहे. मला तुम्ही शिकवू नका. काळ्या लोकांनी मध्ये मध्ये बोललेलं मला चालणार नाही.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
👍
😮
🙏
3