Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 21, 2025 at 11:30 AM
!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - ४३. त्या बोटीच्या मेडिकल ऑफिसरने क्वीनाईनचा डोज पाठवून दिला. आनंदीने नाही घेतला. तिला खोकल्याची मोठी उबळ आली. म्हणाली, यांचे असे वागणे सहन होत नाही. ती रात्र वाईट गेली. आनंदीने औषधच सोडून दिले. प्रकृती जास्त बिघडेल असे वाटले. पण तसेच झाले नाही. तिला भारतीय जेवणाची भूक लागली होती. बोटीवरचे पाव लोणी घशाखाली उतरत नव्हते. पत्र लिहिण्याची ताकत अंगात नव्हती. तरीही तिने सासूबाईंना पत्र लिहिले. आपल्या देशात येऊन कधी एकदा चांगले जेवण जेवेनसे झालेय! एक पत्र लिहून थोडे दमल्यासारखे झाले. तरी तिने दुसरे पत्र लिहायला घेतले.. मावशीला सुरुवात केली... लांबलचक पत्र लिहिण्याची मला ताकद नाही. खोकला पाठ सोडत नाही. ब्राॅंकायटीसपासून फार त्रास होत आहे. सारखी बोट लागत असल्यामुळे खाणे पिणे व्यायाम वगैरे काहीच होत नाही. अंथरुणावरच पडून आहे. तुम्हाला सोडल्यापासून एक क्षणही तुमच्या सर्वांच्या आठवणी शिवाय गेला नाही. इतके लिहून ती फार दमली. गोपाळरावांना म्हणाली, आता पुढचं तुम्ही लिहा... गोपाळरावांनी आनंदीच्या तब्येतीबद्दल खरखरी माहिती कळवली. गोऱ्या लोकांनी बोटीवर पैसे देऊनही जो त्रास दिला त्याचे वर्णन केले. पुढे लिहिले.. मी सर्वसाधारण गोऱ्या लोकांबद्दल लिहिले. अपवाद असतातच. तुम्ही आहात. आणखी आहेत. या बोटीवर आमचा अतिशय छळ झाला. काळे नेटिव्ह म्हणून पदोपदी हिनवण्यात आले. खाणे पिण्याचेही हाल केले. ही सर्व हकीगत बोटीवरच्या एका गोऱ्या माणसाला कळली. त्यांनी निरोप पाठवला पैशाची अडचण असेल तर माझ्याकडून घेऊन जा. जमेल तेव्हा परत करा. असा परोपकारी माणूस परत भेटणार नाही. त्याच्या उदात्तपणाने भारावून गेलो. दिवस जात होते. उद्या मुंबई बंदराला बोट लागणार होती. आज रात्री दोघे जागे होते. सकाळी नऊ वाजता बोट धक्क्याला लागणार. गोपाळरावांनी पहाटेच स्नान केले. आनंदीनेही हट्टाने केली. म्हणाली, आज छान नटणार. कितीतरी दिवसांनी स्वदेश दर्शन होणार. तिने काळी चंद्रकळा नेसली. नाकात नथ, कानात कुडी, गळ्यात मोहनमाळ घातले. चांगले ठळक कुंकू रेखाटले. तिच्या सौंदर्याने गोपाळराव मुग्ध झाले. अंगावर काश्मिरी शाल पांघरलेली ती साक्षात सरस्वती सारखी दिसत होती. दोघेही डेकवर येऊन बसले. क्षणाक्षणांनी मुंबई जवळ येत होती. बोट बंदराला लागली. आनंदीने भक्ती भवाने नमस्कार केला. तिला अश्रू आवरत नव्हते. गोपाळराव स्तब्ध होते. खाली उतरून बंदरावर आली तेव्हा पण दहा-पंधरा नातेवाईक स्वागताला आले होते. तपश्चर्या पूर्ण झाली. नातेवाईकांनी गाडीतून त्यांना गोपाळरावांच्या मावसभावाकडे पोहोचवले. तिथे भेटायला येणाऱ्यांची गर्दी उसळली. वर्तमानपत्रांनी खास अग्रलेख लिहून आनंदीचे अभिनंदन केले. गोपाळरावांच्या मावसभावाच्या चाळीत दोन खोल्या होत्या. जमीनीला ओल होती. घरात माणसं खूप होते. सगळ्या तऱ्हेच्या संकोच होता. तिथून हलने भाग होते. शेठ माधवदास रघुनाथदास कापडियांनी फारच आग्रह केल्यामुळे काही दिवस त्यांच्या बंगल्यात राहणे झाले. शेठजींच्या उपकाराचे ओझे वाटू लागले. शिवाय आनंदीच्या प्रकृती उतार पडेना. नुसता हाडांचा सापळा उरला होता. बोलण्याचेही श्रम होत होते. माधवदासांकडून आनंदीने हट्ट करून आग्र्यांच्या वाडीत खरेंकडे गेले. गोपाळरावांना अशी हलवाहलवी पसंत नव्हती. पण तिच्या हट्टापुढे काही चालत नव्हते. खऱ्यांकडेही नातेवाईकांची गर्दी जमा झाली. आजी, आई, बहिणी, भाऊ, सासू, दीर सगळे सुश्रुषा करण्यासाठी आली. जवळचे पैसे संपले होते. प्रवासात कर्ज झाले होते. आवक कुठूनच नव्हती. कोल्हापूर दरबाराची रुजू होण्याबद्दलची आज्ञापत्रे सारखी येत होती. रुजू झाल्याशिवाय पगार सुरू होणार नव्हता. तोपर्यंत खडखडाटच होता. आलेल्यांना पोसणे जिक्रीचे झाले होते. प्रकृती बिघडतच चालली होती. प्रथम वाटले, श्रमाचा ताप असेल. परदेशात झालेल्या हेंडसाळीमुळे शरीर थकले असेल. पण तसे नव्हते. ताप, खोकला, अशक्तपणा वाढतच होता. मुंबईच्या डॉक्टरांनी आनंदीला क्षय झाल्याचे निदान केले. त्यांच्या मते रोगमुक्त होणे कठीण आहे. देशी वैद्य म्हणाले हा क्षय नाही. हा एक प्रकारच्या खोकला आहे. तो नक्की बरा होईल. गोपाळरावांची अवस्था अडकित्तात सापडल्यासारखी झाली होती. एका रात्री फारच तगमग झाली. उलटी झाली. आतून शरीर सोलवटून निघाले. छातीत भयंकर कळा येत होत्या. क्षणाचा भरोसा नाही अशी अवस्था झाली. तिच्याजवळ धाकटा दीर, सासूबाई, गोपाळराव बसले होते. क्षीण आवाजात आनंदी म्हणाली, आपण पुण्याला जाऊन महेंदळेंचे औषध घेऊ. घेऊन चलाल? गोपाळराव म्हणाले, मी व्यवस्था करतो. उद्या निघू. सासूने कपाळाला हात मारला. अमेरिकेतून एवढी मोठी वैद्यकीय पदवी मिळवून आलेली आपली सून वैद्याच्या औषधासाठी जीव टाकत आहे. चमत्कारिकच आहे. गोपाळरावांनी सहजी जाऊ म्हटल्यावर आईने त्यांच्याकडे आश्चर्याने बघितले. मुलाच्या विक्षिप्त स्वभावाचे तडाखे जन्मभर आईने सोसले होते. मुलाने आक्रस्ताळी स्वभाव सोडला. सुतासारखा सरळ झाला हे महद् आश्चर्यच होते. अमेरिकेतून आल्यापासून गोपाळराव पूर्ण बदलल्याचे तिच्या लक्षात आले. आई काही बोलणार हे लक्षात येताच, गोपाळराव शांतपणे म्हणाले, आई, तुम्ही दोघे सकाळच्या गाडीने पुण्याला पुढे जा. राव बहादुर भिड्यांना त्यांच्याकडे व्यवस्था करायला सांगा. आम्ही परवा सकाळी निघू. ठरल्याप्रमाणे गोपाळराव व आनंदी तिसऱ्या दिवशी पुण्याला निघाले. भिडेंकडे उत्तम व्यवस्था होती. घर मोठे होते. पैशाची सुबत्ता होती. सरकार दरबारी वजन होते. एक-दोन दिवस गेले. खोकला फारच जोरात होता. सारखी तहान लागत होती. धड झोपवतही नव्हते, ना बसवत होते. जिवाची तगमग चालली होती. तिच्या मनाने बापूसाहेब मेहेंदळेंचा ध्यास घेतला होता. दोन दिवसांनी गोपाळराव बाळशास्त्री माटे वैद्याकडे गेले. सर्व हकीगत कथन केली कसेही करून महेंदळेंना आणण्याविषयी माटेंना गळ घातली. क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.
👍 😂 🙏 4

Comments